मोबाईलनंतर आता आमिरने सोडलं 'सोशल मीडिया' शेअर केली शेवटची पोस्ट

मोबाईलनंतर आता आमिरने सोडलं 'सोशल मीडिया' शेअर केली शेवटची पोस्ट

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चढ्ढा प्रदर्शित होईपर्यंत मोबाईल वापरणं सोडणार असं जाहीर केले होतं. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. मात्र आमिरने आता चाहत्यांना आणखी एक धक्का देण्याचं ठरवलं आहे. आता तर तो चक्क सोशल मीडिया वापरणंही सोडून देणार आहे. आमिरचा 14 मार्चला वाढदिवस होता. आमिरच्या वाढदिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला. शुभचिंतक, नातेवाईक, चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या होत्या. आमिरने या सर्व शुभेच्छांसाठी चाहत्यांचे खूप खूप आभार व्यक्त केले मात्र त्याने हे आभार व्यक्त करण्यासाठी जी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली ती पोस्ट आमिरची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे. हे ऐकून त्याच्या चाहत्यामध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे.

असं काय झालं की आमिरला सोडावं लागलं सोशल मीडिया

आमिर खान सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. जर तुम्ही त्याच्या पेजवरील जुने फोटो पाहिले तर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तो त्याच्या आई आणि कुटुंबासोबतचे क्षण या माध्यमातून शेअर करत असे. सामाजिक कार्यात सक्रिय असल्यामुळे त्या कार्याचे फोटो तो शेअर करत होता. सेटवर काम करताना तो कामाप्रती खूपच प्रामाणिक आहे. त्यामुळे काम करताना एकाग्रतेने आणि लक्षपूर्वकच काम करत असतो. मात्र काम झाल्यावर इतरवेळी मात्र तो सेटवर चांगलीच दंगामस्ती करतो, सहकारी कलाकारांची मस्करी करतो. त्यामुळे अशा गमतीशीर गोष्टीही तो त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करत असे. आता मात्र तो या माध्यमापासून दूर जाणार असल्यामुळे या सर्व गोष्टी चाहत्यांना पाहता येणार नाहीत. आमिरने 2009 मध्ये ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट सुरू केलं होतं. त्याच्या ट्विटरवर आज जवळजवळ 26 कोटी तर फेसबुकवर 18 कोटीहुन अधिक फॉलोव्हर्स आहेत. त्याने 2018 मध्ये इंन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं होतं. ज्याला आजवर साडे तीन कोटी फॉलोव्हर्स आहेत. मात्र असं असूनही आमिरने सोशल मीडिया माध्यमाला बाय बाय करण्याचं ठरवलं आहे हा चाहत्यांसाठी धक्काच आहे.

आमिरचा शेवटचा मेसेज

आमिरने त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक खास मेसेज शेअर केला आहे तो असा  की, " मित्रांनो माझ्या वाढदिवशी एवढं प्रेम देण्यासाठी आणि उत्साहासाठी खूप खूप धन्यवाद. हे पाहून आज माझं मन भरून आलं आहे. दुसरी गोष्ट ही की ही माझी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट असेल. कारण सध्या तरी मी या माध्यमावर जास्त अॅक्टिव्ह नाही. त्यामुळे मी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण एकमेकांशी संवाद साधू पण जसा पुर्वी करत होतो तसा. यासोबतच AKP(आमिर खान प्रॉडक्शन हे ऑफिशिअल चॅनल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला माझ्या चित्रपटांविषयी यातून अपडेट मिळत राहतील. सर्वांना खूप खूप प्रेम"

आमिर सध्या त्याच्या लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या वर्षी 26 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहुर्तावर तो हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. तोपर्यंत तो त्याचा मोबाईलदेखील वापरणार नाही. हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करत आहे. ज्यात त्याच्यासोबत करिना कपूर आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट हॉलीवूडच्या फॉरेस्ट हंप या चित्रपटाचा रिमेक असणार आहे.