ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी

ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी

ख्रिसमस म्हटलं की, फक्त आनंद. गिफ्ट्स आणि केक. फक्त लहान मुलंच नाही तर अगदी मोठ्यांसाठीही हा सण बराच आनंद, गिफ्ट्स आणि बरंच काही घेऊन येत असतो. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे घरातील गृहिणी आणि लहान मुलांच्या आईंना. बाहेरून केक आणायचा असेल तर आजकाल महागाई बरीच वाढली आहे. पण मुलांना केक तर द्यायचा आहे आणि प्रश्न बऱ्याचदा महागाईचाही नसतो. मुलांना हेल्थी अर्थात निरोगी असे घरात केक बनवून द्यायचे असतील तर काय करायचं? बऱ्याच जणी या ऑफिसमध्ये जात असतात मग केक बनवायला लागणारा वेळ त्यांना देता येतोच असंही नाही. पण त्यानाही आपल्या मुलांसाठी केक बनवण्याची इच्छा असते. अशाच आई आणि गृहिणींंसाठी शेफ मधुरा बाचल यांनी या ख्रिसमसला खास रेसिपी ‘POPxo मराठी’ सह शेअर केल्या आहेत. ज्या अगदी घरातील सामान घेऊन तुम्हाला झटपट बनवता येतील आणि ख्रिसमसदेखील अगदी मनासारखा साजरा करता येईल.


madhura bachal


मधुराच्या टीप्स


मधुरा बाचलने अगदी सहज सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रेसिपीज आपल्यासाठी दिल्या आहेत. यामध्ये या ख्रिसमसला खास आपल्यासाठी ‘रेड वेलवेट केक’, ‘कॅरट केक’ आणि ‘चॉकलेट बिस्किट्स’ च्या रेसिपीज तिने शेअर केल्या आहेत. अगदी सहज आणि पटकन बनणाऱ्या तसंच अगदी चविष्ट अशा रेसिपीजमुळे तुमची मुलंदेखील अगदी खूष राहतीत. ‘ख्रिसमसच्या वेळी साधारणतः केक आणि कुकीज या गोष्टींना सर्वांत जास्त मागणी असते. मुलांना केक खायला खूप आवडतं. त्यामुळे बाहेरून केक आणण्यापेक्षा घरच्या घरी पटकन बनवता येणाऱ्या रेसिपीज अगदी गृहिणींना आपलंसं करतात आणि आवडतात त्यामुळे, अशा रेसिपीजवर माझा जास्त भर असतो’, असंही यानिमित्ताने मधुराने सांगितलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांंना आवडेल आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही अशा या रेसिपीज आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंगही वापरण्यात आलेले नाहीत.Jingle bells, jingle bells


Jingle all the way..


हे गाणे ऐकताच सर्वांना ख्रिसमसची चाहूल लागते बरोबर ना ?? आणि ख्रिसमस म्हटलं की छान छान केक तर झालेच पाहिजेत नाही का ! जाणून घेऊया मग घरच्या घरी बनविता येतील अशा सोप्या व पौष्टिक अशा मधुराने दिलेल्या ख्रिसमस स्पेशल केक रेसिपीज् ..


1) रेड वेलवेट केक


red-velvet-cake
रेड वेल्वेट केक बनवण्यासाठी साहित्य


1/3 कप बटर


1/2 कप पिठी साखर


1/2 कप बीट प्युरी


1 कप मैदा


1/2 टी स्पून बेकिंग पावडर


1 टे स्पून कोको पावडर


1/4 कप दूध


1 टी स्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट


1/2 टी स्पून इनो फ्रुट साॅल्ट


फ्राॅस्टिंगकरिता साहित्य


1 कप क्रिम चीझ


2 टी स्पून बटर


1 टी स्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट


1 कप पिठी साखर


कृती


बीटचे वरचे साल काढून तुकडे कापून घ्या व नंतर 1/4 कप पाणी घालून कुकरमध्ये 2 शिट्टया द्या.मिक्सरमधून स्मूथ पेस्ट वाटून घ्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये बटर घ्या, त्यातच पिठीसाखर आणि क्रिम घालून एकत्र करा. बीट प्युरी घाला करा आणि मिक्स करा. आता या मिश्रणात चाळून घेतलेले मैदा ,बेकिंग पावडर आणि कोको पावडर घाला. मिश्रण चांगले फेटून घ्या. यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घ्या. आता त्यामध्ये दूध घाला आणि मिश्रण चांगले एकत्र करा. इनो फ्रुट साॅल्ट घालून त्यावर 1 टी स्पून दूध घालून चांगले मिसळा. आता हे सर्व मिश्रण ग्रिस्ड केलेल्या भांड्यात ओता आणि 350 डिग्री वर 30 मिनिटे बेक करावे.


क्रीम चीज फ्राॅस्टिंग करण्यासाठी कृती


एका वाटीमध्ये बटर घ्या. त्यात क्रीम चीज, पिठीसाखर आणि व्हॅला एक्स्ट्रॅक्ट घाला. गुळगुळीत आणि मलाईदार होईपर्यंत ढवळत रहा.


 


2) कॅरेट केक


carrot cake


कुकरमध्ये तळाशी  ठेवण्यासाठी मीठ


1/2 कप + 3 टी स्पून दूध (रुम टेंम्परेचरवर असणे गरजेचे आहे)


1/4 कप पिठीसाखर


1/4 कप ब्राउन साखर


1/4 कप तेल


1 कप गव्हाचे पीठ


1 टी स्पून बेकिंग पावडर


1 टी स्पून बेकिंग सोडा


1/4 टी स्पून जायफळ पूड


1/4 टी स्पून वेलची पावडर


1/2 कप किसलेले गाजर


2 टे स्पून चिरलेली अक्रोड


थोडे मनुके


कृती


तळाशी मीठाचा पातळ थर घालून कुकर मध्यम आचेवर 10 मिनिटे गरम करुन घ्या. एक बेकिंग ट्रे घ्या त्याच्या तळाशी वॅक्स पेपर लाऊन सर्व बाजूने तेलाचे ग्रिसिंग करुन घ्या. तेलाऐवजी तूप किंवा बटरही वापरू शकता. एका वाटीमध्ये रुम टेंम्परेचरवर असलेले दूध घ्या. त्यामध्ये ब्राउन साखर आणि पिठी साखर घाला. ब्राउन साखर नसेल तर पिठीसाखरच घातली तरी चालेल. त्यातच तेल घाला आणि पुन्हा चांगले मिसळा. जाडसर गव्हाचे पीठ त्यात घाला. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्यावे व चांगले मिक्स करावे. त्यातच जायफळ पावडर किंवा वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा. केकचे बॅटर व्यवस्थित अडजस्ट करण्यासाठी लागलेच तर अधिक दूध घाला. गाजर, अक्रोड आणि मनुका घाला. आपण अक्रोडऐवजी बादाम किंवा पिस्ता वापरू शकता.  पुन्हा चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता हे सर्व मिश्रण ग्रिस्ड केलेल्या भांड्यात ओता. आता गरम करायला ठेवलेल्या कुकरमध्ये कुकरसोबत जी जाळी येते ती ठेवा आणि त्यावर केकचे भांडे ठेवा. कुकरची रिंग व शिट्टी काढा आणि कुकरचे झाकण लावा. केक मध्यम आचेवर 30 ते 35 मिनिटे बेक करावे. केकच्या मध्यभागी सुरी किंवा टुथपिक घालुन केक शिजला आहे का हे चेक करा. केक सुमारे 10-15 मिनिटे थंड होऊ द्या. 10 मिनिटांनंतर, केकच्या बाजूंना सुरीच्या मदतीने रिकामे करा आणि एका ताटावर केक काढा. वॅक्स पेपर काढा आणि केक पूर्णपणे थंड झाल्यावर केकचे तुकडे करा. एगलेस कॅरेट केक रेडी आहे.


3) चॉकलेट बिस्किट्स केक


Chocolate biscuit cake
5 मिनिटात बनवा केक रोल


साहित्य
1/4 कप पाणी
100 ग्रॅम मारी बिस्किट्स
1 कप डार्क चॉकलेट
1/4 कप बटर
1/2 कप मिक्स ड्रायफ्रुट्स (पिस्ता, अक्रोड, काजू आणि बदाम)
1/4 टी स्पून वॅनिला इसेन्स
2 टी स्पून पिठीसाखर
2 टी स्पून इन्स्टंट कॉफी पावडर


कृती
मारी बिस्किट्सचे हातानेच बारीक बारीक तुकडे करुन घ्या. मध्यम आचेवर पॅन गरम करावे. त्यात पाणी आणि कॉफी पावडर घाला. चांगले मिक्स करुन ते मिश्रण उकळावे. कॉफी पावडर पाण्यात विरघळले पाहिजे. पाणी उकळण्यास सुरवात झाली की गॅस बंद करावा. त्यातच पिठी साखर घाला आणि चांगले मिक्स करा. व्हॅनिला इसेन्स घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात बटर आणि डार्क चॉकलेट घाला. चॉकलेट वितळून ते व्यवस्थित एकत्रित होईपर्यंत हलवा. त्यात सुरवातीला केलेला बिस्किटांचा चुरा घालून चांगले मिसळा. मिक्स ड्रायफ्रुट्स घालुन चांगले मिसळा. मिश्रण एका डिशमध्ये ठेऊन ते 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. 30 मिनिटांनी मिश्रण काढून घ्या आणि त्याचा रोल बनवा. एक प्लास्टिकचे कागद घ्या आणि त्यात चॉकलेट रोल व्यवस्थित रोल करा. दोन्ही बाजू बंद करुन एक घट्ट रोल करा. जर तुम्हाला रोल बनवायचा नसेल तर मिश्रण डिश मध्ये पसरवा आणि सेट झाल्यावर त्याचे हवे तसे तुकडे करा. एक ते दिड तास सेट करण्यासाठी रोल फ्रीजमध्ये ठेऊन द्या. फ्रिजमधून रोल बाहेर काढा आणि त्याचे वरचे कव्हर काढून टाका. आता सुरीने रोलचे हवे तसे तुकडे करा. चॉकलेट बिस्किट केक तयार आहे.


फोटो सौजन्य - युट्यूब