'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'या' मराठी चित्रपटाला पुरस्कार

'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'या' मराठी चित्रपटाला पुरस्कार


मराठी प्रेक्षकांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी ही एक खुशखबर आहे. मराठी दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे याच्या ‘दी डिसिपल' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलची शनिवारी सांगता करण्यात आली. यावेळी म्हणजेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुख्य स्पर्धेतील विजेत्यांची नावे ज्युरींनी जाहीर केली. ज्यामध्ये मराठी दिग्दर्शक चैतन्य ताम्हणेच्या 'दी डिसिपलला'ही गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’ हा एक मानाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा महोत्सव आहे. यावर्षी या महोत्सवामध्ये एका मराठी दिग्दर्शकाचे नाव झळकले आहे. चैतन्यच्या दी डिसिपलचा विषय आणि मांडणी दोन्ही सर्वोत्तम ठरली ज्यामुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला ‘दी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म  क्रिटिक्स’ या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. ज्यामुळे एका मराठी चित्रपट आणि तो दिग्दर्शित करणाऱ्या मराठी दिग्दर्शकाचे नाव जगासमोर आलं आहे. चैतन्यचा दुसरा चित्रपट आहे याआधी त्याच्या पहिल्या चित्रपटाला म्हणजेच कोर्टलाही असंच प्रेम प्रेक्षकांनी दिलं होतं. 

तब्बल वीस वर्षांनी व्हेनिसमध्ये मराठी चित्रपटाचा झाला गौरव -

व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 1937 साली ‘संत तुकाराम’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी दिग्दर्शकांने ही प्रथा पुढे सुरू ठेवली आहे. ज्यामुळे वीस वर्षांनी पुन्हा एका मराठी चित्रपटाचे नाव परदेशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये मानाने घेतले जात आहे. यंदा 'दी डिसिपल' हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत असून या चित्रपटात शास्त्रीय संगीत गायक आदित्य मोडक यांची प्रमुख भूमिका आहे. यामध्ये नायक त्याचे कलेची शुद्धता लोकांसमोर मांडतो असं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातील नायक त्याचे वडील आणि गुरू यांच्याकडून अनेक महान कलाकारांच्या कथा ऐकत मोठा झालेला आहे. ज्यामुळे त्याच्यावर कलेच्या शुद्धतेचे संस्कार झालेले दाखवण्यात आलेले आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणेच्या मते “दी डिसिपल या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास अतिशय खडतर आणि आव्हानात्मक होता. मात्र शेवटी त्याच्या या सर्व कष्टांचे चीझ झालं” खंरतर यापूर्वीही म्हणजेच 2015 सालीदेखील चैतन्यने दिग्दर्शित केलेला ‘कोर्ट’ हा चित्रपटही या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता.  कोर्ट हा चैतन्यने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट होता. चैतन्यच्या ‘कोर्ट’लाही ओरिजोती श्रेणीतील सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार त्यावेळी देण्यात आला होता. पहिल्याच चित्रपटात असं घवघवीत यश मिळवल्यामुळे चैतन्यच्या या दुसऱ्या चित्रपटाकडून भारतीयांना व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडलं जाण्याच्या अपेक्षा नक्कीच होत्या. शिवाय कोर्टनंतर चैतन्य नेमका कोणता चित्रपट दिग्दर्शित करणार याचीही वाट सर्वजण पाहत होते.  चैतन्यदेखील या अपेक्षांवर खरे उतरत एका अप्रतिम चित्रपटाची निर्मिती केली. ज्यामुळे त्याच्या दुसऱ्या चित्रपटालाही पुन्हा एकदा सातासमुद्रापार असं उत्तम यश मिळालं आहे. शिवाय यातून त्याच्या दोन्ही चित्रपटाचं नाव सातामुद्रापार परदेशातही चमकले आहे. भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे. आता चैतन्यबाबत फक्त मराठीच प्रेक्षकांच्या नाही तर संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहे. त्याच्या पुढील चित्रपटाची सर्वजण पुन्हा एकदा आतूरतेने वाट पाहत आहेत.