नव्वदीच्या काळातील 'देख भाई देख' मालिकेचं होणार पुनःप्रक्षेपण

नव्वदीच्या काळातील 'देख भाई देख' मालिकेचं होणार पुनःप्रक्षेपण

कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच सध्या घरात राहावं लागत आहे. एकवीस दिवसांच्या या सेल्फ क्वारंटाईनमध्ये नेमकं काय करावं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. टेलिव्हिजन हे घरात असताना मनोरंजन करणारं एकमेव माध्यम असतं. मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद असल्यामुळे टेलिव्हिजनच्या मालिकाचं प्रक्षेपण थांबविण्यात आलेलं आहे. यावर उपाय म्हणून अनेक मालिकांनी टेलिव्हिजनवर जुन्या मालिकांचं प्रक्षेपण करण्यास सुरूवात केली आहे. दूरदर्शनवर तर रामायण आणि महाभारत या पौराणिक मालिकांचे पुनःप्रक्षेपण करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर टिव्हीवर त्यांच्या आवडत्या जुन्या मालिका पुन्हा दाखवण्याचा हट्ट सुरू केला आहे. लोकांच्या आग्रहावरून आता दूरदर्शनवर आणखी एका लोकप्रिय मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण केलं जाणार आहे. नव्वदीच्या  काळात गाजलेली विनोदी मालिका ‘देख भाई देख’ आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देख भाई देख कधी दाखवली जाणार दूरदर्शनवर

देख भाई देख मालिका पुन्हा प्रक्षेपित होणार हिच चाहत्यांसाठी एक खूप मोठी खुशखबर आहे. विशेष म्हणजे दूरदर्शन वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवर याची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. या पोस्टमध्ये असं लिहीलं आहे की, " आता  दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर सांयकाळी 6 वा. पाहा तुमचा आवडता ऑयकॉनिक कॉमेडी शो ‘देख भाई देख’ ज्या शोमध्ये दिवाण कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे सुंदर आणि अनोखं बॉन्डिंग दाखवण्यात आलं होतं " या पोस्टमुळे आता चाहत्यांच्या आनंदाला  पारावार राहिलेला नाही.  

देख भाई देख नव्वदीच्या काळातील एक लोकप्रिय शो

देख भाई देख ही मालिका नव्वदीच्या काळातील एक लोकप्रिय मालिका होती. सर्व कुटुंबिय एकत्र बसून ही मालिका पाहत असत. या मालिकेमध्ये दिवाण कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र दाखवण्यात आल्या होत्या. एकत्र असूनही कुटुंबातील वयस्कर लोकांपासून अगदी लहानांपर्यंत सुंदर आणि अनोखं बॉन्डिंग दाखवण्यात आलेलं होतं. ज्यामुळे प्रत्येकाला ही मालिका स्वतःच्या घरातीलच वाटत असे. घरात छोट्या छोट्या गोष्टींतून घडणारे विनोद या मालिकेची खासियत होती. या मालिकेत शेखर सूमन, नवीन निश्चल, फरिदा जलाल, भावना बावस्कर, देवेन भोजानी, सुषमा शेठ, विशाल सिंग, नताशा सिंह, उर्वशी ढोलकिया यांच्या प्रमूख भूमिका होत्या. ही मालिका 6 मे 1993 साली टेलिव्हिजनवर दाखवण्यास सुरूवात झाली होती. या मालिकेचे त्याकाळी एकूण 65 एपिसोड प्रसारित करण्यात आले होते. या मालिकेचं शीर्षक गीतंही अनेकांचं अगदी तोंडपाठ होतं. या मालिकेची नव्वदीच्या काळातील लोकप्रियता आणि आता होणारी पुनःप्रक्षेपणाच्या मागणी यावरून दूरदर्शनने आता ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे.