ADVERTISEMENT
home / मनोरंजन
महानायकाने केला #weareone चा संकल्प, एक लाख मजुरांना दिला मदतीचा हात

महानायकाने केला #weareone चा संकल्प, एक लाख मजुरांना दिला मदतीचा हात

कोरोनाच्या संकटामुळे सध्या पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती नक्कीच चांगली नाही. सेलिब्रेटीजपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत सर्वांवर या आर्थिक संकटाचा परिणाम होत आहे. मात्र या संकटाचा सर्वात जास्त फटका बसत आहे तो तळहातावर पोट असलेल्या मजुरांवर. जे लोक दररोज कमवून आपलं आणि कुटुंबाचं  पोट भरतात अशा असंख्य लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांच्या मदतीसाठी सरकारने प्रयत्न नक्कीच सुरू केले आहेत. सरकारला यासाठी भरघोस मदत करणारे अनेकजण पुढेदेखील आले आहेत. मात्र या वेळी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा सर्वांनीच मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे. यासाठीच बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. अमिताभ पुढील महिनाभर देशातीस जवळजवळ एक लाख मजुरांसाठी रेशनचा पूरवठा करणार आहेत. यासोबत सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना घरी राहण्याचा संदेशदेखील दिला आहे.

We are one संकल्पाला कोणाकोणाची साथ

बिग बीने कोरोना महामारीच्या संकटापासून वाचवण्यासाठी We are one हा संकल्प केला आहे. या संकल्पाच्या माध्यमातून त्यांनी ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन  (All India Film Employees Confederation) या संघटनेशी निगडीत सर्व मजुरांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनेशी निगडीत जवळजवळ एक लाख मजुरांना महिन्याभराचे रेशन बिग बी पुरवणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या We Are One या संकल्पाला सोनी पिक्चर्स नेटवर्क आणि कल्याण ज्वेलर्स यांनीदेखील समर्थन दिलं आहे. अमिताभ बच्चन कल्याण ज्वैलर्सचे ब्रॅंड अॅम्बेसेडरदेखील आहेत. 

बिग बी कशी करणार मदत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संकल्पानुसार ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनशी  निगडीत मजुरांना यासाठी देशातील मोठ्या सुपरमार्केट्स आणि किराणाच्या दुकांनाचे डिजीटल बारकोड कूपन्स दिले जाणार आहेत. ज्यामुळे गरजवंतांना त्यांच्या जीवनावश्यक गोष्टी या माध्यमातून मिळू शकतात. संकटकाळात मदत करण्यासाठी प्रत्येकाजवळ खूप मोठी दानत असावी लागते. We are one या संकल्पामुळे महानायकाची दानत देशासमोर आली आहे. लॉकडाऊनच्या अमिताभ बच्चन सध्या त्यांची सर्व महत्त्वाची कामे सोडून कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कविता आणि  इतर अॅक्टिव्हिटीज करत ते सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र असं असलं तरी ते देशावर आलेल्या आर्थिक संकटात मदत करण्यात पुढेच आहेत. लवकरच अमिताभ ब्रम्हास्त्र, गुलाबो सिताबो, चेहरे आणि झुंड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या पैकी काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झालं असून काही चित्रपटाचे शूटिंग अजून बाकी आहे. त्यामुळे देशावरचं हे संकट लवकर दूर होवो आणि चाहत्यांना आपल्या महानायकाला पुन्हा एकदा चित्रपटातून पाहण्याची संधी मिळो हीच इच्छा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.    

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

ADVERTISEMENT
06 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT