21 व्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण नवी चेअरपर्सन

21 व्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण नवी चेअरपर्सन

दीपिका पदुकोणच्या नव्या वर्षाची सुरुवातदेखील धमाकेदार झाली आहे. गेल्यावर्षी वर्षाच्या सुरुवातीला दीपिकाने पद्मावतसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सुरुवात केली होती. या चित्रपटातील राणी पद्मिनीची व्यक्तीरेखा साकारून दीपिकाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. इतकंच नाही तर हा चित्रपट अनेक समीक्षकांनीदेखील वाखाणला. या सगळ्यात महत्त्वाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही दीपिकाचा समावेश होता आणि टाईम्समध्ये सर्वात प्रभावशाली सेलिब्रिटीमध्येही दीपिकाचं नाव घेण्यात आलं तर तिचं रणवीरबरोबर लग्नही झालं. दीपिका सध्या प्रसिद्धीच्या परमोच्च शिखरावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दीपिकाच्या मानात अजून एक तुरा खोवला गेला आहे. दीपिका यावर्षी 21 व्या मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये नवी चेअरपर्सन म्हणून दिसणार आहे.  अर्थातच हा खूप मोठा मान आहे.


deepika at mami


नवी चेअरपर्सन म्हणून दीपिकाची नियुक्ती


21 व्या मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणची नवी चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी हा फेस्टिव्हल ऑक्टोबरमध्ये होणार आहे. यासंदर्भात दीपिकाची मंडळ सभासदांबरोबर एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतरच दीपिकाचं नाव घोषित करण्यात आलं आहे. मामी फेस्टिव्हलने आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये झोया अख्तर, किरण राव, विक्रमादित्य मोटवानी, विशाल भारद्वाज, अनुपमा चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर आणि कबीर खान यांचा समावेश होता. मामि फेस्टिव्हलमध्ये नेहमीच चांगल्या चित्रपटांची रेलचेल असते. यावर्षी चेअरपर्सनचा मान दीपिकाला मिळाला आहे. दीपिकाने गेल्या दहा वर्षामध्ये बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला असून तिने स्वतःला बॉलीवूडमध्ये सिद्ध केले आहे. त्यामुळे मामि फेस्टिव्हलच्या चेअरपर्सनपदी तिच्या नावाची घोषणा होणे साहजिक होते. शिवाय दीपिकाने अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या असून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपले नाव केले आहे. आंतरराष्ट्रीय ठिकाणीदेखील दीपिका प्रसिद्ध आहे. 


दीपिका सध्या बायोपिकमध्ये व्यग्र


दीपिका सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. छपाक हा चित्रपट अॅसिड अटॅक झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. लक्ष्मीचं आयुष्य मनाला खूपच भावलं असल्यामुळे दीपिकाने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात दीपिकाबरोबर विक्रांत मेसीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाची निर्मातीदेखील दीपिका आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसअन्वये हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. त्यामुळे दीपिका आता केवळ अभिनेत्री नाही तर निर्माती म्हणूनदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे. दीपिकाने आतापर्यंत खूपच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी, मस्तानी, राणी पद्मिनी यासारख्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या भूमिकादेखील आहेत. आता या चित्रपटातून दीपिकाच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तर गेल्या वर्षभरात दीपिकाचा कोणताही चित्रपट आला नसून लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला चित्रपट असेल. शिवाय दीपिकाने आतापर्यंत एकाही बायोपिकमध्ये काम केले नाही. तर ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान दीपिकाने मध्यंतरी गँगस्टरच्या आयुष्यावरील चित्रपट नाकारून लक्ष्मीचा बायोपिक करण्यास होकार दिल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्यामुळे आता मेघना गुलजारबरोबर दीपिकाच्या कामाचा अनुभव आणि पडद्यावर कशाप्रकारे लक्ष्मी दाखवण्यात येणार याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.


laxmi agarwal


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम


हेदेखील वाचा -


'सावट' चित्रपटाचं चित्तथरारक टीझर प्रदर्शित


रेडीमिक्स मधील वैभव आणि प्रार्थनाचं 'का मन हे' रोमॅंटिक गाणं प्रदर्शित


भोजपुरी स्टारची मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण