Bad News: दिया मिर्झा आणि साहिल सांघाने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

Bad News: दिया मिर्झा आणि साहिल सांघाने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

दिया मिर्झा ही बॉलीवूडमधील अभिनेत्री म्हणूनच नाही तर देशभरात तिच्या सामाजिक कार्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. दिया नेहमीच आपल्या सामाजिक कामांसाठी चर्चेत असते. पण यावेळी दिया एका वाईट बातमीसाठी चर्चेत आली आहे. दिया मिर्झाने 2014 मध्ये धुमधडाक्यात निर्माता साहिल सांघा याच्याबरोबर लग्न केलं होतं. पण आता दिया आणि साहिल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं दियाने आपल्या सोशल मीडियावरून जाहीर केलं आहे. 

कारण मात्र गुलदस्त्यात

दिया मिर्झाने अचानक आपण साहिलपासून वेगळं होत असल्याचा निर्णय सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शेअर केला आहे. या तिच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण अगदी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत साहिलच्या वाढदिवसाच्या दिवशीही दियाने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून फोटो पोस्ट केला होता. पंधरा दिवसात असं नक्की काय घडलं की या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला अशा चर्चेला आता जोर धरू लागला आहे. मात्र अतिशय शांतपणे आणि सौम्य शब्दात आपली भावना दियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मांडली आहे. ‘11 वर्षांच्या आमच्या एकत्रित आयुष्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच मित्र राहू आणि एकमेकांवर प्रेम करत राहू आणि आदरही करू. आमचे मार्ग जरी वेगळे झाले असले तरीही आम्हाला एकमेकांबद्दल असलेला आदर नेहमीच तसाच राहील. आमच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींनी आम्हाला नेहमी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि मीडियानेदेखील आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत. पण आता आम्हाला काही काळासाठी एकटं सोडा ही विनंती आहे’ अशा शब्दात दिया आणि साहिलने पोस्ट शेअर केली आहे. 

साहिल आणि दियाची लव्हस्टोरी होती चित्रपटाप्रमाणे

साहिल निर्माता आणि दिग्दर्शक असल्याने दियाला एक स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्यांची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत साहिलला दिया आवडली. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. साहिलने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान दियाला मागणी घातली होती. तिलाही साहिल आवडत असल्याने तिने लगेच होकार दिला आणि  या दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं. पहिले ही जोडी 2013 मध्ये लग्न करणार होती. पण साहिलच्या नातेवाईकांपैकी आजारी असल्याने यांचं लग्न पुढे ढकललं गेलं. 

साहिल आणि दिया चांगले मित्रमैत्रीण

साहिल आणि दिया हे एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण असल्याचं त्यांनी नेहमीच सांगितलं आहे. आता घटस्फोट घेतल्यानंतरही आपण ही मैत्री तशीच ठेवणार असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र इतक्या चांगल्या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात तसाच राहणार आहे. कारण दोघांपैकी कोणीही याचं खरं कारण नक्की काय आहे हे सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनातही ही रुखरूख नक्कीच लागून राहील. साहिल आणि दिया ही एका अप्रतिम जोडीपैकी एक होती. पण आता ही जोडीदेखील वेगळी होत असल्याने सर्वांनाच वाईट वाटत असल्याचं सोशल मीडियावरील कमेंट्सवरून दिसून येत आहे. सध्या तरी या जोडीने पुढे काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला असल्याने याबाबत जास्त कोणतीही माहिती मिळू शकणार नाही. पण पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये नात्याच्या बाबतीतील उणीव दिसून आली आहे.