'या' वीकेंडला काय करताय?, एन्जॉय करा ‘वरळी'महोत्सव

'या' वीकेंडला काय करताय?, एन्जॉय करा ‘वरळी'महोत्सव

नवीन वर्षाच्या जानेवारी महिना संपत आला आहे. दिवस कसे पटापटा गेले हे कळले देखील नाही. पण आता नव्या वर्षाची खरी मजा यायला सुरुवात होईल. कारण आता वेगवेगळे फेस्टिव्हल सुरु होतील. जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी वरळी फेस्टिव्हल येत आहे. येत्या २६ आणि २७ जानेवारीला हा महोत्सव होणार असून यंदा या फेस्टिव्हलचे पाचवे वर्ष आहे. ‘लाईफ सेलिब्रेशन’ ही यंदाची थीम आहे. त्यामुळे म्युझिक- फूड-फन अशी सगळी मजा तुम्हाला या महोत्सवामध्ये घेता येणार आहे.


संगीताची मेजवानी


महोत्सवाची थीमच लाईफ सेलिब्रेशन असल्यामुळे म्युझिक म्हणजे संगीत हे आलचं. संगीत प्रेमीसाठी तर हा महोत्सव पर्वणीच असणार आहेत. कारण ८ पेक्षा अधिक म्युझिक बँड या महोत्सवात परफॉर्म करणार आहेत.यात ‘बँड ऑफ बॉईज’, ‘युफोनी’, ‘चारु सेमवल’, ‘शिवानी कश्यप’, एन. कुलकर्णी, मोहीत कपूर, राहुल गोम्स असे अनेक कलाकार या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. आता तुम्ही हिंदुस्तानी संगीताचे चाहते असाल तर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे हा महोत्सव फुडीसोबतच संगीतप्रेमींसाठीही महत्वाचा असणार आहे. 


चविष्ट पदार्थांची रेलचेल


महोत्सव म्हटला की खानपान आलेच. यंदाचा महोत्सव खानपानाच्या बाबतीतही विशेष असणार आहे.कारण वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा यामध्ये समावेश असणार आहे. चमचमीत पदार्थ तुम्हाला चाखायचे असतील तर तुम्ही या महोत्सवाला भेट देऊ शकता आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला सी-फूडची विशेष आवड असेल तर खास कोळी पद्धतीचे मासे तुम्हाला या महोत्सवात खाता येणार आहे. बांगड्यापासून ते सुरमई, पापलेट, हलव्यापर्यंतचे सगळे मासे या महोत्सवात तुम्हाला चाखता येणार आहेत.


सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


संगीत कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील या महोत्सवात करण्यात आले आहे. वरळी म्हटला की आठवतो ‘समुद्र’. आणि समुद्राला देव मानणारे कोळी बांधव  त्याच्या नृत्यकलेतून त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत. त्यामुळे कोळी संस्कृतीची अधिक माहिती तुम्हाला या महोत्सवातून होऊ शकेल.


 


 समुद्राचा आनंद लुटा


मुंबईत अनेक जण समुद्राचा आनंद लुटण्यासाठी येतात. नरीमन पॉईंट,वरळी सीफेस,दादर, वांद्रे बॅण्डस्टॅड, जुहू बीच ही ठिकाणे नेहमीच सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी फुललेली असतात. जर तुम्हालाही समुद्र आवडत असेल. तर समुद्र एन्जॉय करायची ही छान संधी आहे. मस्त समुद्राचा आनंद घेत तुम्हाला तुमचा वीकेंड घालवता येईल. सलग पाच वर्षे हा महोत्सव वरळी कोळीवाड्यात आयोजित केला जात आहे. आतापर्यंत मुंबई आणि मुंबई लगतच्या लाखो लोकांनी या महोत्सवालला भेट दिली आहे.


महोत्सवाला होईल सुरुवात  


जानेवारी महिन्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या महोत्सवाला सुरुवात होते. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मिसळ महोत्सव, वर्सोवा फेस्टिव्हल, काळा घोडा फेस्टिव्हल, उपवन फेस्टिव्हल असे अनेक महोत्सव सुरु होतात. त्यामुळे हा महोत्सव म्हणजे सुरुवात आहे. आणखी बरेच असे महोत्सव पुढील काळात येणार आहे. ज्याचा आनंद तुम्ही लुटू शकणार आहात. त्यामुळे आता महोत्सवांवर नजर ठेवून राहा आणि तुमचे सगळे वीकेंड मस्त एन्जॉय करा. 


(फोटो सौजन्य-Instagram)