स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचा दिमाखदार सोहळा

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचा दिमाखदार सोहळा

आजकाल चित्रपटाप्रमाणेच मालिकांचे कार्यक्रमही थाटामाटात पार पडत आहेत. असंच चित्र पाहायला मिळालं स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेच्या पत्रकार परिषदेला. या परिषदेत ऐतिहासिक थीम ठेवण्यात आली होती. जिथे जिजामातेची भूमिका करणाऱ्या अमृता पवारची एंट्री तुतारीच्या आगमनात झाली. तिने अगदी पारंपारिक वेशभूषेत अमृताने पत्रकार परिषदेत प्रवेश केला.

तर छोट्या जिजामातेच्या भूमिकेतील निष्ठा वैद्यची एंट्री मेण्यातून झाली. पाहा याची झलक

या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी मालिकेचे निर्माते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत आणि घनश्याम राव, जिजाऊंच्या भूमिकेतील अभिनेत्री अमृता पवार, छोट्या जिजाऊंची भूमिका करणारी निष्ठा वैद्य आणि सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत जिजाऊंची महती सांगणारं मालिकेचं शीर्षक गीतही लाँच करण्यात आलं. हे गीत तयार करणारे गीतकार मंदार चोळकर, संगीतबध्द करणारे सत्यजित रानडे अशी संपूर्ण म्युझिक टीमदेखील उपस्थित होती. दिग्दर्शक विवेक देशपांडे आणि मालिकेचे लेखक विवेक आपटे आणि प्रसाद ठोसरदेखील उपस्थित होते.

जगदंब क्रिएशन्सच्या दुसऱ्या निर्मितीबद्दल उत्सुकता

या मालिकेचा प्रोमो सुरू झाल्यापासूनच याबद्दल उत्सुकता आहे. मराठी प्रेक्षकवर्गाला इतिहासाशी जोडणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्सची ही दुसरी निर्मिती आहे. शहाजीराजांची स्वराज्य संकल्पना जोपासणाऱ्या माऊलीची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेची निर्मिती केल्याचं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. दरम्यान स्वराज्य जननी जिजामाता ही केवळ मालिका नसून हा एक संस्कार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

स्वराज्यजननी जिजामाता

ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 19 ऑगस्टपासून येत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श असलेली त्याची पहिली गुरु स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सूर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड झाली असावी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १४ वर्षांच्या बालशिवरायांना हाताशी घेऊन पुण्याच्या उजाड होत असलेल्या जमिनीत तिने सोन्याचा नांगर फिरवला आणि शहाजीराजांसह पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अशी 'अखंड स्वराज्याची सावली' असे जिचे वर्णन केले जाते ती राजमाता एक संवेदनशील माउली सुद्धा होती. ती कर्तव्यदक्ष पत्नी होती आणि उत्तम राज्यकर्ती, धैर्यवान वीरांगना होती आणि सहिष्णु न्यायदेवताही होती. इतिहासाच्या पानांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे छाप पाडणाऱ्या या १६व्या शतकातील स्त्रीशक्तीचं अष्टपैलू रूप म्हणजे जिजामाता. आपल्या गर्भातून केवळ एक कर्तृत्ववान बाळच नव्हे तर स्वराज्य जन्माला घालणाऱ्या मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत पाहायला मिळणार आहे .

स्वराज्याची संकल्पना रुजवणाऱ्या या मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ पहायला विसरू नका.