महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या 'या' पौष्टिक रेसिपी

महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या 'या' पौष्टिक रेसिपी

महाशिवरात्र... अनेकजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास करतात. महाशिवरात्री निमित्त घराघरात उपवासाचे पदार्थ नक्कीच केले जातात. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. त्यामुळे  दिवसभर उपवासाचे अनेक पदार्थ खाण्याची जणू संधीच मिळते. या दिवशी उपवासाच्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यास काहीच हरकत नाही. खरं तर उपवास म्हणजे ‘उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्य’ अर्थात आज आपण देवाच्या अधिक सानिध्यात असणे, देवाचं स्मरण करणे अपेक्षित आहे. यासाठीच जाणून घ्या महाशिवरात्री माहिती ज्यामुळे तुम्हाला या उपवासाचे खरे महत्त्व समजेल. पण देवाच्या स्मरणासोबतच पोटाचे लंघन करण्यासाठी तुम्हाला उपवास करायचा असेल तर तसे करण्यास काहीच हरकत नाही. मात्र यासाठी दिवसभर काहिही न खाता उपाशी राहू नका कारण रिकाम्या पोटी अॅसिडीटी वाढू शकते. शिवाय उपवासाचे पित्तकारक पदार्थ सतत खाण्याने तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो.


उपवासाच्या दिवशी फ्रेश राहण्यासाठी दिवसभर काहीतरी पौष्टिक आणि सात्विक पदार्थ खा. थोड्या थोड्या वेळाने पाणी, नारळपाणी, फळांचा रस, ताक, मसाले दूध घ्या. ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील आणि शरीरात अॅसिडीटी वाढणार नाही. शिवाय पोट रिकामे नसेल तर तुमचे मन देखील प्रसन्न राहील. वास्तविक उपवासाच्या दिवशी मन प्रसन्न असणं फार गरजेचं आहे.कारण मन प्रसन्न असेल तर तुम्ही देवाचे स्मरण शांत चित्ताने करू शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला आज करण्यासारख्या काही पौष्टिक पदार्थ रेसिपीज शेअर करत आहोत.


महाशिवरात्रीसाठी पौष्टिक पदार्थ


राजगिरा थालीपीठ


राजगिरामध्ये मिनरल्स, फारबर, प्रोटीन्सचे घटक असतात. ज्यामुळे तुमचे पोषण होते आणि पोटही भरते.


साहित्य-  दोन वाट्या राजगीरा पीठ, दोन चमचे दाण्याचे  कुट, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट,चवीपूरते मीठ आणि तूप


कृती - राजगीराच्या पीठामध्ये सर्व साहित्य टाकून पीठ पाण्याने मळून घ्या. मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ थापा. तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजा. गरमागरम थालीपीठ तुम्ही दही, ओल्या नारळाची चटणी अथवा उपवासाच्या लोणच्यासोबत नक्कीच खाऊ शकता.


वाचा - महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा


mahashivratri thalipith


रताळ्याचे कटलेट-


रताळी शरीरासाठी फार पौष्टिक असतात. रताळी आणि राजगिरामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते.


साहित्य- एक ते दोन रताळी, राजगिऱ्याच्या लाह्या, मिरचीचा ठेचा, चवीपूरते मीठ, तूप


कृती- रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. रताळ्याचा गर काढून त्यात राजगिऱ्यांच्या लाह्या, मिरचीचा ठेचा  चवीपूरते मीठ टाका आणि या मिश्रणाचे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या. कटलेट पॅनवर शॅलो फ्राय करा आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खा.


mahashivratri cutlet


साबुदाण्याची खीर


साबुदाण्यामुळे तुमचे पोट दिवसभर भरलेले राहील. पण आज नेहमीप्रमाणे साबुदाणा खिचडी अथवा वडे करण्यापेक्षा आज साबूदाण्याची खीर करा ज्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही.


साहित्य- एक वाटी भिजवलेला साबुदाणा, दूध, वेलदोडा पूड, चवीप्रमाणे साखर आणि मीठ


कृती - दूध उकळून त्यात वेलदोडा पूड घाला. उकळण्यापूर्वीच त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे टाकावेत. साबुदाणा शिजताना त्यामध्ये चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालावी. साबुदाणा पारदर्शक झाला की तो शिजला समजून गॅस बंद करावा. खीरीच्या सजावटीसाठी त्यामध्ये सुकामेवा आणि केसर घालावे.


mahashivratri sabudana kheer


रताळ्याचा किस


साहित्य- रताळी, तूप, मिरची, जिरे, ओलं खोबरं, चवीपूरतं मीठ आणि साखर


कृती - रताळी स्वच्छ धुवून त्याचा किस करून घ्या. एका कढईत तूप गरम करून मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यात किसलेलं रताळं टाका. वरून चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून चांगलं परतून घ्या. ओलं खोबरं पेरून वाफेवर किस शिजवून घ्या.


mahashivratri ratalyacha kees 1


मखाणा चिवडा


मखाणा म्हणजे कमळाचे बी. हे वजनाला हलकं आणि अतिशय पौष्टिक असतं


साहित्य - मखाणा, शेंगदाणे, काजू, मनूका, हिरवी मिरची, हळद लिंबू आणि मीठ


एका पॅनमध्ये मखाणा भाजून घ्या. दुसऱ्या कढईत तूपावर शेंगदाणे, काजू आणि मनूका तळून घ्या. सुकामेवा काढून त्यात हिरवी मिरची तळून घ्या. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात चवीनूसार मीठ आणि लिंबू पिळा. गरमागरम मखाणा चिवडा तयार आहे. चालत असल्यास तुम्ही यात हळद आणि तिखटदेखील वापरू शकता.


mahashivratri chivda 1


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम