हेमा मालिनी आणि इशा देओल यंदा असं करणार बाप्पाचं स्वागत

हेमा मालिनी आणि इशा देओल यंदा असं करणार बाप्पाचं स्वागत

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मजा काही औरच  असते. जस जसा गणेशोत्सव जवळ येऊ लागतो तस तसं भक्ताच्या उत्साहाला अधिकच  उधाण येऊ लागतं.गणेशोत्सव छोट्या पडद्यावर ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण आणि जल्लोष कमी असणार आहे. त्यामुळे घरी बसून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनेक वाहिन्यांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी हिंदी वाहिनी स्टार प्लस गणेशोत्सवासाठी विषेश कार्यक्रम आयोजित करते. यंदाही स्टारने बाप्पाच्या  स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे या उत्सवात हेमामालिनी आणि इशा देओल या मायलेकींचा एकत्र नृत्याविष्कार प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार आहे. एवढंच नाही तर या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांचे परफॉर्मन्स दाखवले जाण्याची शक्यता आहे.

हेमा आणि इशाची गणेश वंदना

या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिग्गज अभिनेत्री हेमामालिनी आणि त्यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री इशा देओल एकत्र डान्स करताना दिसत आहेत. दोघीही त्यांच्या नृत्यातील पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. त्यांचे लुक्स आणि नृत्यातील पाहून या शोमधील हा डान्स सर्वात बेस्ट असेल याची जाणिव होत आहे. हेमामालिनी आणि इशादेओल या उत्तम डान्सर आहेत ज्यामुळे या व्हिडिओला खूप लाईक्स आणि शेअर सध्या मिळत आहेत. हा कार्यक्रम 23  ऑगस्टला रविवारी संध्याकाळी 8 वाजता स्टार वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये घरातील सर्वजण एकत्र बसून या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात.

हेमामालिनीबाबत पसरली होती अफवा -

2020 हे वर्ष कोरोनामुळे फारच वाईट गेलं आहे. बॉलीवूडचे तर यामुळे फारच नुकसान झालं. अनेक सेलिब्रेटी कोरोनाचे बळी ठरले. काहीजण यातून सुखरूप घरी परतले तर काहींनी या जगाचा निरोप घेतला. मात्र यामुळे अनेक अफवांनाही खूप उधाण आलं होतं. मागच्या महिन्यात अभिनेत्री हेमामालिनी यांची तब्येत अचानक बिघडल्याची अफवा देखील पसरली होती. ड्रिम गर्लच्या आजारपणाच्या बातमीमुळे चाहतेही निराश झाले होते. मात्र ही बातमी एक अफवा असून हेमामालिनी यांची तब्येत व्यवस्थित आहे. कारण हेमामालिनी यांची मुलगी इशाने सोशल मीडियावरून तिच्या आईची खुशाली सर्वांना तेव्हाच सांगितली होती. शिवाय हेमामालिनी आता स्वतः इशासोबत या कार्यक्रमात सहभागी होत आहेत म्हणजे ही अफवा होती हे चाहत्यांना नक्कीच पटू शकेल. ईशा देओल हेमामालिनी यांची खूप काळजी घेते. बऱ्याचदा हेमामालिनी इशाच्याच घरी राहतात. त्या दोघींचं बॉन्डिंग खऱ्या आयुष्याप्रमाणेच डान्समध्येही दिसून येतं. इशा आईप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री होऊ शकली नसली तरी ती एक उत्तम डान्सर आणि हेमा यांच्याप्रमाणेच उत्तम आईदेखील आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर ती आता पुन्हा तिच्या नृत्य करिअरवर फोकस करत आहे असंच या कार्यक्रमातून दिसत आहे. ईशा देओलने भरत तख्तानी यांच्यासोबत 2012 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर ती बॉलीवूडपासून दूर गेली. लग्नानंतर तिने बॉलीवूडमधील तिचं करिअर सोडून दिलं असलं तरी ती तिच्या नृत्याचा सराव आजही करत आहे. शिवाय हेमामालिनी आणि इशाचे एकत्र शो नेहमी पाहायला मिळतात. त्यामुळे आता या कार्यक्रमात हेमामालिनी आणि इशाला पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.