नवोदित गायक आणि संगीतकारांसाठी हिमेश रेशमियाचा खास सल्ला, आत्मनिर्भर व्हा

नवोदित गायक आणि संगीतकारांसाठी हिमेश रेशमियाचा खास सल्ला, आत्मनिर्भर व्हा

लहान मुलांमधील गायनकलेचा शोध घेणाऱ्या सर्वात लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप लिटिल चॅम्स'चे यंदाचे पर्व लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मागच्या आठवड्यात धुमधडाक्यात सुरू झालेल्या एपिसोडमध्ये बालस्पर्धकांनी अप्रतिम गाणी सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. आता येत्या आठवड्यातील एपिसोडमध्ये ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील अरुण गोविल (राम) दीपिका चिखलिया (सीता) आणि सुनील लाहिरी (लक्ष्मण) हे प्रमुख कलाकार तसेच ‘महाभारत’ मालिकेतील दुर्योधनाची भूमिका साकारणारा अभिनेता पुनीत इस्सर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र एवढंच नाही तर या एपिसोडमध्ये चित्रपटसृष्टीतील सध्याचे वातावरण पाहता या नवोदित गायकांसाठी परिक्षक हिमेश रेशमियाने एक मौल्यवान सल्ला देखील दिला आहे. एक परीक्षक,गायक, संगीतकार या नात्याने हिमेश रेशमियाने या भागात काही स्पष्ट आणि बेधडक विधाने केली आहेत. हिमेशच्या मते सर्व नवोदित गायकांनी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपली गाणी स्वत:च तयार करावीत. एवढंच नाही तर ती ध्वनिमुद्रित आणि चित्रीतदेखील स्वतःच करावीत. “किसी भी सिंगर को बॉलीवूड का किसी अॅक्टर या डिरेक्टर का मोहताज नहीं होना चाहिये!” अशा बिनधास्त शैलीत त्याने नवोदित गायकांना #AtmaNirbhar  होण्याचा सल्ला दिला आहे. 

हिमेशला नवोदित गायकांच्या भविष्याबाबत का वाटत आहे चिंता

पुढील आठवड्यतील एपिसोडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सक्षम सोनावणे या लिटिल चॅम्पने हिमेशची गाणी गायली. हिमेश रेशमिया ‘तेरा तेरा सुरूर’  आणि  ‘झलक दिखला जा’  ही दोन अत्यंत लोकप्रिय गाणी त्याने इतक्या बहारदार प्रकारे सादर केली की स्वत: हिमेशलाही राहावले नाही आणि तोसुध्दा सक्षमबरोबर ही गाणी गाण्यासाठी मंचावर उतरला. या सर्व गुणी बालस्पर्धकांना पाहून हिमेश पुरता भारावून गेला.या मुलांमधील गायनकौशल्य वाया जाऊ नये म्हणून त्याने या नवख्या आणि होतकरू गायकांना एक मौल्यवान सल्ला भावनेच्या भरात येऊन दिला आहे. त्याच्या मते या गुणी गायकांनी पार्श्वसंगीतात एखादी मोठी संधी मिळण्यासाठी निव्वळ बॉलीवूडवर अवलंबून राहू नये. त्याऐवजी ते ज्या डिजिटल युगात जगत आहेत, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपली गाणी आपल्या आवाजात स्वतः ध्वनिमुद्रित करावीत आणि सोशल मीडियामध्ये ती प्रसारित करावी. हिमेशच्या मते असं केल्यामुळे ते संगीतप्रेमींच्या थेट संपर्कात राहू शकतील. कारण त्याच्या मते बॉलीवूडचे दरवाजे काही मोजक्याच गायकांसाठी नेहमी उघडे असतात. पण डिजिटल व्यासपीठ व्यापक असल्याने  त्याचा वापर करून ते खऱ्या संगीतप्रेमींच्या थेट संपर्कात येऊ शकतात.

सारेगमपच्या सेटवर हिमेशने व्यक्त केली खंत

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ कार्यक्रमाचा परीक्षक या नात्याने हिमेश रेशमियाने शेअर केलं की, “मी गायलेली गाणी ही बॉलीवूडच्या नेहमीच्या साच्यातील नाहीत तर ती अगदी वेगळीच आहेत. त्यामुळेच इतर कोणालाही ती गाणं सहज शक्य नाही. पण सक्षम सोनावणेने ही गाणी अफलातून पध्दतीने पुन्हा जिवंत केली आहेत. हिमेशच्या मते संगीतकाराला एखाद्या गाण्यातून काय सांगायचं आहे, ते जाणून घेणं सोपं नसतं. उदाहरणार्थ, अरिजितसिंहला कोणत्याही गाण्याची अचूक लय लगेच पकडता येते, पण ही गोष्ट सर्वांना शक्य होतेच असं नाही. आजच्या गायकांनी आपली स्वत:ची गाणी स्वत:च तयार करावीत, त्यांना संगीतही त्यांनीच द्यावं, म्हणजे मग त्यांना आपलं बलस्थान नेमकं काय आहे, ते लक्षात येईल. त्यांना त्यांच्या गायनाचा आत्मा कशात आहे ते समजेल. ज्यामुळे ते आपल्या श्रोत्यांशी थेट नातं जोडू शकतील. पूर्वी गायक आणि संगीतकार यांना गाण्यांची तालीम आणि सराव करण्यासाठी आठ-दहा तास मिळत असत. गाणं ध्वनिमुद्रित करण्यापूर्वी ते त्यावर चर्चा करीत. पण आजच्या गायकांना इतका वेळच मिळत नाही. आजकाल संगीतकार गायकाला एखादी धुन व्हॉटसअॅपवरून पाठवितात आणि मग त्याने त्यावर गाणं गावं, अशी सूचना करतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पूर्वी जशी गाण्यावर सर्वांगीण चर्चा होत असे आणि त्याचे सर्व पैलू लक्षात घेतले जात, तसं आज घडत नाही.पूर्वी मी आणि अलकाजी (अलका याज्ञिक) यांनी ‘तेरे नाम’ हे गाणं आठ तास गाऊन ध्वनिमुद्रित केलं होतं. म्हणूनच ते इतकं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. आता आजच्या बदललेल्या परिस्थितीत डिजिटल व्यासपीठ हे गायक आणि त्याच्या चाहत्यांसाठी थेट आणि अस्सल समान व्यासपीठ आहे. तुम्ही त्यावर 100 गाणी गा, 500 गाणी गा. त्यात कदाचित तुम्हाला 99 वेळा अपयश येईल, पण जे एक गाणं यशस्वी होईल, ते चिरकाळ टिकेल. "किसी भी सिंगर को बॉलीवूड का किसी अॅक्टर या डिरेक्टर या प्रोड्युसर का मोहताज ना होना पडे…"  मला मायकल जॅक्सन फार आवडतो. पण तो कधी टॉम क्रूझसाठी गायला नाही. त्याने त्याची स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सर्व गायकांसाठी माझं हेच मागणं आहे. आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.”