हॉलीवूड सेलिब्रिटी दिसणार अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’मध्ये

हॉलीवूड सेलिब्रिटी दिसणार अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’मध्ये

हॉलीवूडमधील स्टार्स आता बॉलीवूडमध्ये दिसणं ही नवी गोष्ट नाही. आता अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’मध्येही बॉलीवूडची सेलिब्रिटी दिसणार आहे. आता तुम्ही विचार कराल की, नक्की कोण आहे ही सेलिब्रिटी? काही दिवसांपूर्वीच अजय देवगणच्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्यामध्ये ही सेलिब्रिटी अजय देवगणच्या खांद्यावर बसलेली दाखवण्यात आली आहे. आलं का लक्षात? होय तुम्ही जो विचार करताय तीच आहे ही सेलिब्रिटी. या फोटोमध्ये दिसत आलेली माकडीण ही हॉलीवूडची सेलिब्रिटी असून तिचं नाव क्रिस्टल आहे. तिचा थाट कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. गेल्या तेवीस वर्षांपासून ती कॅमेऱ्यासमोर काम करत असून तिच्यासाठी डेट्स घ्याव्या लागतात. शिवाय कोणत्याही हिरो अथवा हिरॉईनपेक्षा तिचं मानधन हे जास्त आहे. क्रिस्टल ही नावाजलेली अॅनिमल सेलिब्रिटी आहे.


ajay and crystal
क्रिस्टलचा पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये प्रवेश


गेल्या तेवीस वर्षांपासून क्रिस्टल हॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे. क्रिस्टल ही कॅपुचिन जातीची माकडीण आहे. हॉलीवूडमध्ये ती खूपच प्रसिद्ध असून तिने अनेक चित्रपट गाजवले आहेत. मात्र पहिल्यांदाच ‘टोटल धमाल’मधून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अजय देवगणबरोबर ही क्रिस्टल माकडीण प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्टल ही ट्रेंड माकडीण आहे. ती माणसांप्रमाणेच वावरते. तिला सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरता येतं. इतकंच नाही तर आपण रोज जी कामे करतो ती कामंदेखील ती सराईतपणे करू शकते. आश्चर्याची बाब म्हणजे माणसांनी बोललेलं तिला सर्व काही कळतं आणि ती त्यावर आपल्या प्रतिक्रियादेखील देते. तिच्या याच वेगळेपणामुळे तिची अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलकडून मुलाखतही घेण्यात आली होती. क्रिस्टल ही अशी पहिलीच अॅनिमल सेलिब्रिटी आहे जिची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी सर्वांनाच क्रिस्टलचं कौतुक वाटलं होतं.


crystal hollywood
क्रिस्टल अभिनयात निपुण


क्रिस्टलने हॉलीवूडमध्ये आतापर्यंत ‘जॉर्ज ऑफ जंगल’, ‘हँग ओव्हर 2’, ‘नाईट अॅट ए म्युझियम’ या प्रसिद्ध चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. या तीनही चित्रपटांमध्ये क्रिस्टलने उत्तम अभिनय केला असून ती अभिनयात निपुण असल्याचं प्रेक्षकांना तिने दाखवून दिलं आहे. ती हॉलीवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळेच ती इतर आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच मानधन घेते. आताही तिचं मानधन हे कोणत्याही आघाडीच्या अभिनेत्रीइतकं आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी क्रिस्टलने एका मालिकेच्या प्रत्येक भागासाठी सात लाखापेक्षाही अधिक मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी ‘टीव्ही गाईड मॅगझीन’ने अशा स्वरूपाची माहिती दिली होती. यावरूनच आताही तिच्या कमाईचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो.


crystal 1
‘टोटल धमाल’मध्येही क्रिस्टल करणार धमाल


‘टोटल धमाल’ हा धमाल या चित्रपटाचा सिक्वल आहे. धमाल हा चित्रपटही खूप गाजला होता. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर ‘टोटल धमाल’ करण्यासाठी क्रिस्टलदेखील तयार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक आता क्रिस्टलचं काम बघण्यासाठी उत्सुक आहेत. इतर सेलिब्रिटीजच्या बरोबरीने आता क्रिस्टलही काय धमाल करणार हे ट्रेलर आणि चित्रपट आल्यानंतर कळेलच. पण तोपर्यंत प्रेक्षकांना या चित्रपटाची नक्कीच आतुरता लागून राहिली आहे.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम