टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका

टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका

काही टेलीव्हिजन मालिका प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवतात. कितीही वर्षे झाली तरी त्यातील पात्र आपल्याला विसरता येत नाहीत. नव्वदच्या दशकातील ‘हम पांच’ ही हिंदी मालिका त्यापैकीच एक आहे. ‘आनंद माथुर आणि त्यांचं  विनोदी कुटूंब’ आजही अनेकांना विसरता येत नाही. माथुर दांपत्यांच्या निरनिराळ्या स्वभावाच्या पाच मुली आणि त्यांच्यामुळे दररोज घडणाऱ्या विनोदी घडमोडी यांवर आधारित ही मालिका होती. या कॉमेडी मालिकामध्ये दाखवली जाणारी प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटू लागली होती. त्या काळात ही मालिका टेलीव्हिजनवर प्रचंड गाजली मात्र नियमानुसार काही काळाने ती बंद झाली. त्यामुळे प्रेक्षकांना आनंद माथुर यांच्या कुंटूबाला निरोप द्यावा लागला होता. आता मात्र आनंद माथुर आणि त्यांच्या कुंटूबावर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यांसाठी आणि एक खूशखबर आहे. कारण आता ही मालिका पुन्हा नव्या स्वरुपात टेलीव्हिजनवर येत आहे. ‘हम पांच फिरसे’ असं या मालिकेचं नाव असणार असून ही मालिका एस्सेल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत प्रसारित केली जाणार आहे.

Subscribe to POPxoTV

आनंद माथुरच्या कुंटूंबाचा फॅमिली ड्रामा


माथुर कुंटूंब आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. हम पांच मालिकेत आनंद माथुर, बीना माथुर, त्यांची स्वर्गीय पत्नी आणि पाच मुली अशी प्रमुख पात्र होती. 1995 ते 2006 या काळात या मालिकेने टेलीव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अभिनेता अशोक सराफ, प्रिया तेंडूलकर, शोभा आनंद, भैरवी रैचुरा, वंदना पाठक अशा अनेक मोठ्या कलाकारांनी त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन, मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेत्री राखी विजन यांनी या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात प्रथमच पदार्पण केलं होतं. नव्याने सुरू होणाऱ्या 'हम पांच फिरसे' मालिकेमध्ये आता कोण नवीन कलाकार प्रमुख भूमिका साकारणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. साधारण या वर्षी मे महिन्यापर्यंत ‘हम पांच फिरसे’ मालिका प्रसारित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आनंद माथुरच्या फॅमिलीमधला ड्रामा पुन्हा टेलीव्हिजनवर सुरू होणार असला तरी त्यामुळे पूर्वीप्रमाणेच मनोरंजन होणार का हे पाहणं आता उत्सुकता वाढवणारं आहे.


अशोक सराफांनी साकारलेले ‘आनंद माथुर’ अविस्मरणीय


हम पांच मध्ये अभिनेता अशोक सराफ यांनी साकारलेलं आनंद माथुर हे पात्र खरंतर कधीच विसरता येणार नाही. बॅंकेत काम करणाऱ्या एका सामान्य व्यक्तिमत्वाची ही भूमिका होती. पण अशोक सराफ यांच्या सक्षम अभिनयाने या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं होतं. आनंद यांचं त्यांच्या पाच मुलींवर असलेलं प्रेम, त्यांचं स्वर्गीय पत्नीसोबत गप्पा मारणं अशा अनेक गोष्टींमुळे या मालिकेला एक मनोरंजक वळण मिळालं होतं. माथुर कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये निरनिराळी असल्यामुळे घरात सतत विनोदी वातावरण घडत असे. शिवाय एखाद्या घरात जेव्हा पाच मुली असतात तेव्हा नेमकं काय काय घडू शकतं हे या मालिकेमधून पाहता आलं होतं. अनेकदा काही सामाजिक विषयांनादेखील या मालिकेतून वाचा फोडण्यात आली होती. त्यामुळे बीना माथुर, राधिका, स्वीटी, काजल भाई अशा प्रमुख पात्रांच्या भूमिका आता कोणत्याही नवीन कलाकारांना तितक्याच हुबेहुब रंगवणं आव्हानात्मक ठरणार आहे.


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम