फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. एका दशकानंतर भारताला ऑस्कर मिळालं आहे. लॉस एंजिलीसमध्ये सुरू असलेल्या 91 व्या ऑस्कर सोहळ्यात निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या ‘पीरियड: द एंड ऑफ सेंटेंस’ला ऑस्कर मिळालं आहे. भारतातील ग्रामीण भागातील मासिक पाळी संबंधातील महिलांच्या समस्या, गैरसमज आणि सॅनेटरी पॅडची उपलब्धता नसण्यावर बनवण्यात आलेली ही शॉर्ट फिल्म होती. या शॉर्ट फिल्मला’डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
गुनीत मोंगा यांनी ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला. गुनीत यांनी आत्तापर्यंत 30 फिल्म्सची निर्मिती केली असून यामध्ये द लंचबॉक्स, गँग्स ऑफ वासेपूर आणि मसान यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
WE WON!!! To every girl on this earth… know that you are a goddess… if heavens are listening… look MA we put @sikhya on the map ❤️
— Guneet Monga (@guneetm) February 25, 2019
या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन रायका जेहताब यांनी केलं असून भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. ही डॉक्युमेंट्री ‘ऑकवुड स्कूल इन लॉस एंजलीसचे विद्यार्थी आणि त्यांची शिक्षक मिलिसा बर्टन यांच्या तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘द पॅड प्रोजेक्ट’ चा भाग आहे.
ईराणी-अमेरिकन असलेल्या जेहताब यांना हा पुरस्कार स्वीकारताना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी सांगितलं की, ‘माझा विश्वास बसत नाही की, मासिक पाळी या विषयावरील शॉर्ट फिल्मही ऑस्कर जिंकू शकते.’
तर बर्टन यांनी हा पुरस्कार आपल्या शाळेला समर्पित केला आणि सांगितलं की, या योजनेची सुरूवातच यासाठी झाली की, लॉस एंजलीसमधील माझे विद्यार्थी आणि भारतातील लोकांना बदल हवा आहे. या डॉक्युमेंट्रीची कथा ही दिल्लीजवळच्या ग्रामीण भागातील हापूर गावाची आहे. 26 मिनटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये उत्तर भारतातील हापुरमधील महिला आणि त्यांच्या गावात लावण्यात आलेल्या एका पॅड मशीनबाबतच्या अनुभवांचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. या डॉक्युमेंटरीच्या ट्रेलरमध्ये दिल्लीजवळील एक गाव दाखवण्यात आलं आहे. जिथे मासिक पाळीबाबत कोणतीही जागरूकता नाही. स्थानिक महिला याबाबत बोलायला लाजत आहेत. तर काहींना सॅनिटरी नॅपकीन माहीतच नाही. काहीजणी फक्त कापड वापरत असल्याचं मान्य करतात. अशा गावात सॅनिटर नॅपकिनची निर्मिती करणार मशीन लावल्यावर काय घडतं ते दाखवण्यात आलंय.
या आधी ए आर रहमान आणि साउंड इंजिनीयर रसूल पुकुट्टी यांच्या ‘स्लमडॉग मिलीनियर’ला या चित्रपटाला 2009 मध्ये अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.