'इश्क सुभान अल्लाह’मध्ये ईशा सिंगचा कमबॅक, जुनीच झारा आता नव्या अवतारात

'इश्क सुभान अल्लाह’मध्ये ईशा सिंगचा कमबॅक, जुनीच झारा आता नव्या अवतारात

मार्च महिन्यापासून कोरोनामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. देशात आता अनलॉक 2 चा टप्पा सुरू झाला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सर्व काही पूर्ववत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. गेले तीन महिने बंद असलेल्या मालिकांच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. ज्यामुळे रोज शिळे एपिसोड पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना आता नवीन एपिसोडची मेजवानी मिळण्याची शक्यता आहे. एका हिंदी मालिकेमध्ये लॉकडाऊननंतर एका नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. टेलिव्हिजनवरील ‘इश्क सुभान अल्लाह’मध्ये झारा सिद्दिकीची भूमिका साकारणारी मूळ अभिनेत्री ईशा सिंग पुन्हा परत येणार आहे. 

झाराचा कमबॅक कसा असेल

‘इश्क सुभान अल्लाह’च्या पहिल्या सीझनचा समारोप झाराचा (ईशा सिंग) कड्‌यावरून गाडी कोसळून मृत्यू झाल्याच्या धक्कादायक वळणासह झाला होता. प्रेक्षकांना आशा होती की नाट्‌यमय पद्धतीने कबीर (अदनान खान) आणि झारा पुन्हा एकदा भेटतील. पण दुसऱ्या सीझनची सुरूवात मात्र नव्या वळणांसह झाली ज्यात दुःखी कबीर आणि नवीन झारा पाहायला मिळाली. मात्र आता लॉकडाऊननंतरच्या एका नव्या ट्विस्टसह ईशा सिंग नवीन अवतारात परत येणार आहे. ज्यामुळे मालिकेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसरणार आहे. आत्तापर्यंत सर्वांचा झारा मरण पावली असा समज होता, पण आता खरी झारा ऊर्फ ईशा सिंग कबीर परत आल्याने या मालिकेतील परिवाराच्या आनंदाला पारावार राहणार नाही. जुनी झारा नव्या स्वरूपात एका म्युझिक हीलरच्या रूपात येणार आहे. संगीताच्या असाधारण वेदनाशामक शक्तीवर तिचा विश्वास आहे. संगीतात अगदी नैराश्याचा झटका आलेल्या व्यक्तीलाही बरे करण्याची ताकद आहे.  मात्र धर्माने लावलेल्या अर्थानुसार संगीत हे हराम आहे अशी कबीरची मानसिकता असते. झारा कबीरच्या या बुरसट विचारांना आवाहन देणार आहे. मात्र सध्या तरी ती त्याच्या आयुष्यातील खरी झारा असण्याला नकार देणार आहे.

ईशा सिंग जवळजवळ एक वर्षाने करत आहे कमबॅक

आपल्या व्यक्तिरेखेमध्ये परत येण्याबद्दल अभिनेत्री ईशा सिंगने आपल्या भावना या पद्धतीने व्यक्त केल्या. तीने शेअर केलं की, “मी माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे या मालिकेतून बाहेर पडले होते, पण अर्थातच माझ्या हृदयात खोल कुठेतरी ही मालिका नेहमीच होती.  ही मालिका म्हणजे जणू माझे बाळच होते आणि त्यामुळे झाराच्या व्यक्तिरेखेमध्ये परत येताना मला खूपच छान वाटतंय. हे माझ्यासाठी अगदी घरी परत येण्यासारखे आहे. ‘इश्क सुभान अल्लाह’ हा माझा झी टीव्हीवरील दुसरा शो असून सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ मला माझ्या घरच्यांसारखे आहेत. माझा सहकलाकार अदनान खानची मी अगदी जवळची मैत्रीण आहे. आमचे छान जमते आणि मला खात्री आहे की झारा आणि कबीरसोबत रीकनेक्ट होण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असतील. मी अनेक आठवणींसह गेले होते आणि आता पुन्हा नवीन काही आठवणी निर्माण करण्यासाठी परत आले आहे.” या शो च्या नवीन इनिंग्समध्ये झारा आणि कबीर यांच्यात रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे झाराच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू चाहत्यांना पाहता येईल.‘इश्क सुभान अल्लाह – एक नया मोहब्बतनामा’ ही मालिका पुन्हा एकदा 13  जुलैपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी टिव्हीवर सुरू होत आहे.