श्रीदेवीच्या ‘चालबाज’प्रमाणे जान्हवी कपूर ‘या’ चित्रपटात साकारणार डबलरोल

श्रीदेवीच्या ‘चालबाज’प्रमाणे जान्हवी कपूर ‘या’ चित्रपटात साकारणार डबलरोल

दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाचा वारसा आता तिची मुलगी जान्हवी कपूर पुढे नेत आहे. जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र तिचा हा पहिला चित्रपट पाहण्याआधीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे जान्हवीकडून तिच्या आईसारख्याच अभिनयकौशल्याच्या अपेक्षा प्रेक्षक आता करत आहेत. जान्हवी कपूर सध्या तिच्या आागामी चित्रपटाची तयारी करत आहे. लवकरच ती 'रूहअफ्जा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रुहअफ्जामध्ये जान्हवी राजकुमार रावसोबत एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या उत्तराखंडमध्ये सुरू आहे. या चित्रपटातील जान्हवीचे काही लुक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावरून ती या चित्रपटात डबलरोल साकारणार असल्याचं दिसत आहे.

Instagram

रुहअफ्जामध्ये जान्हवीची कशी असणार भूमिका

जान्हवी कपूरचे रुहअफ्जामधील काही  लुक व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती काही ठिकाणी अगदी साध्या वेशभूषेमध्ये दिसत आहे. तर काही फोटोजमध्ये फारच ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये दिसत आहे. यावरून जान्हवी रुहअफ्जामध्ये डबलरोल साकारणार असल्याचा अंदाज येत आहे. सूत्रांनी माहितीनुसार जान्हवी यामध्ये दोन निरनिराळ्या भूमिका साकारणार आहे. त्यापैकी एक भूमिका ही नॉन ग्लॅमरस असेल तर दुसरी याच्या अगदी उलट ग्लॅमरस आणि हॉट लुकची असेल. सहाजिकच यामुळे जान्हवीला पाहून श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटाची प्रेक्षकांना नक्कीच आठवण येऊ शकते.

रुहअफ्जामध्ये जान्हवीचा असा असेल डबलरोल

रुहअफ्जाच्या शीर्षकावरून या चित्रपटाची कहाणी ही दोन मुलींच्या जीवनावर आधारित  असेल. ज्यामध्ये एकीचं नाव रूह आणि दुसरीचं नाव अफ्जा असणार आहे. रुहअफ्जा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे यात जान्हवी नेमकी कोणत्या भूमिका साकारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. शिवाय श्रीदेवीच्या अभिनयातील विविध गुण आणि पैलू जान्हवीमध्येदेखील पाहायला मिळतील का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Instagram

श्रीदेवीप्रमाणे डान्स करण्यासाठी जान्हवी करतेय अशी मेहनत

काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिच्या इंस्टा अंकाऊंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती बेली डान्स करताना दिसत होती. जान्हवीने एका डान्स शोच्या डान्स चॅंलेजसाठी हा बेली डान्स केला होता. टेलीव्हिजन शो ‘डान्स दिवाने’च्या दुसऱ्या पर्वासाठी तिने हा डान्स केला. जान्हवीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला  होता ज्यावर चाहत्यांनी तिला चांगल्या कंमेट्स दिल्या. डान्स दिवानेच्या सिग्नेचर ट्यून वर जान्हवीने हा डान्स केला होता . जान्हवीच्या या डान्स मूव्हज पाहून ती तिच्या नृत्यकलेवर फार मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. वास्तविक बेली डान्स करण्यासाठी तुमचे शरीर सुडौल असणं आणि बेली मूव्हज करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. सहाजिकच या डान्स व्हिडिओवरून जान्हवी श्रीदेवीप्रमाणे नृत्यकलेत निपूण होण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत आहे.

श्रीदेवीचा चालबाज आजही लोकांच्या स्मरणात

श्रीदेवी बॉलीवूडची एक दिग्गज अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने तिने अनेक चित्रपट हिट केले होते. चालबाज चित्रपटात श्रीदेवीने डबलरोल साकारला होता. ज्यात तिची एक साधी आणि एक ग्लॅमरस अशा दुहेरी भुमिका होत्या. या चित्रपटातील दोन्ही भूमिकांना श्रीदेवीने तिच्या अफलातून अभिनयाने न्याय दिला होता. या दोन्ही भूमिका चाहत्यांच्या स्मरणात आजही आहेत. श्रीदेवीच्या अचानक जाण्याने अभिनयक्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली होती. आता तिची मुलगी जान्हवी पहिल्यांदाच डबलरोल साकारत आहे. त्यामुळे जान्हवीकडून चालबाजप्रमाणे श्रीदेवीसारख्या अभिनयाची अपेक्षा चाहते करत आहेत.

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी सध्या रूह अफ्जाच्या शूटिंगमध्ये व्यस्त  आहे. यानंतर ती करण जोहरच्या तक्त या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसंच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येदेखील असणार आहे. थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत. मात्र आता या आगामी चित्रपटांकडून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.