राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांना अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर कागर प्रदर्शित होणार नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदनं या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
दोन वर्षांनंतर येणार रिंकूचा चित्रपट
दोन वर्षांच्या कालावधीनंतर रिंकूचा चित्रपट येत असल्याने कागरविषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कागर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं आहे. रिंकूने ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून धमाकेदार एंट्री केली. यानंतर तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे आता या नव्या चित्रपटामध्ये रिंकूची नक्की कोणती भूमिका असेल आणि या चित्रपटामध्ये रिंकूचं काम कसं असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सर्वच प्रेक्षकांना रिंकू आर्ची म्हणूनच माहीत आहे. आता आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली रिंकू दुसऱ्या भूमिकेमध्ये नक्की प्रेक्षकांना भुरळ घालू शकते का? या चित्रपटामध्ये नक्की आर्ची काय कमाल दाखवणार याबद्दल सगळीकडेच चर्चा चालू आहे. दोन वर्षांनंतर रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. यामध्ये रिंकूबरोबर कोणते सहकलाकार आहेत याचीदेखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकण्यात आलं असलं तरी आता नक्की कोणत्या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार याची मात्र कल्पना नाही.
रिंकूदेखील चित्रपटासाठी उत्सुक
रिंकूदेखील चित्रपटासाठी अतिशय उत्सुक आहे. पहिल्या चित्रपटाला दोन वर्ष झाल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर रिंकू येत आहे. यासंदर्भात ‘मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आत्ता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,’ असं रिंकूनं अगदी मनापासून सांगितलं आहे. मात्र अजूनही पुढे ढकलेली तारीख कळवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नक्की किती वाट चाहत्यांंना पाहावी लागणार आहे याचा मात्र काहीच अंदाज नाही.