नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार 'रक्षाबंधन'

नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार 'रक्षाबंधन'

टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा संगीत रिअॅलिटी शो ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ पुन्हा सुरू झाला आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या शोचे हे पर्व खरंतर लॉकडाऊन आधीच सुरू झाले होते मात्र जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हा शो अर्धावरच बंद करण्यात आला होता. मात्र आता 18 जुलै पासून हा शो पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. या शोच्या आतापर्यंत झालेल्या नव्या आणि फ्रेश एपिसोडमधून बालस्पर्धकांनी आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. टिव्हीवर रिअॅलिटी शोमधून नेहमीच सणसमारंभ आणि काही स्पेशल दिवस साजरे केले जातात. पुढील आठवड्यात रक्षाबंधन येत असल्याने या शोचा नवा एपिसोड रक्षाबंधन स्पेशल असणार आहे. पण एवढंच नाही तर या स्पेशल एपिसोड साठी या शोची जुनी परिक्षक नेहा कक्कर येणार असून ती यंदा तिच्या भावंडांसोबत या कार्यक्रमातच रक्षाबंधन साजरा करणार आहे. 

कसा असेल हा रक्षाबंधन एपिसोड

रक्षाबंधनाच्या या विशेष भागात लोकप्रिय कक्कर भावंडे म्हणजेच नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि सोनू कक्कर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्षाबंधन साजरी करण्यासाठी ते या शोमध्ये सहभागी होतील. नेहा कक्करने या आधी 2007 सालच्या सारेगम लिटिल चॅंम्स या पर्वाची परिक्षक ही जबाबदारी सांभाळली होती. गेली अनेक वर्षे ती या शोसोबत जोडली गेलेली आहे. विशेष म्हणजे आता या पर्वात नव्याने सहभागी झालेले परिक्षक हिमेश रेशमिया आणि जावेद अली त्यावेळी सुद्धा तिच्यासोबत परिक्षकांच्या भूमिकेत होते. त्यामुळे प्रदीर्घ  काळानंतर आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या मंचावर हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार आहे. त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये या तिघांची मौजमजाही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या 2017 हे पर्व जवळजवळ आठ महिने टिव्हीवर सुरू होते. यंदाच्या पर्वात हिमेश आणि जावेदसोबत गायिका अलका याज्ञिक परीक्षकाची भूमिका सांभाळत आहेत. मात्र  काही वैयक्तिक कारणांमुळे त्या या एपिसोडमध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नेहा कक्कर या एपिसोडची परीक्षक असेल. 

तिन्ही परिक्षकांनी जागवल्या जुन्या आठवणी

2017 सालच्या पर्वात केलेली धमालमस्ती आणि त्यातील अतिशय गुणी बालगायक आणि त्यांचे सुरेल आवाज यांची नेहाला आताही खूप आठवण येत असल्याचे नेहाने या कार्यक्रमात सहाभागी झाल्यावर सांगितलं. तिन्ही परीक्षक तेव्हा एकमेकांची भरपूर चेष्टा मस्करी करीत असत. या पर्वाबाबत नेहा कक्कर म्हणाली की, “मला मी  परत माझ्या घरी आल्यासारखं वाटत आहे. मला सेटवर येण्याची खूप दिवसांपासून तीव्र इच्छा होत होती. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आल्याने मी अगदी भारावून गेले आहे.”  यावर गायक जावेद अली म्हणाला, “नेहा, हिमेश आणि माझ्यातील नात्यात कोणताही बदल झालेला नाही, हे पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. 2017 मध्ये आम्ही जिथे कार्यक्रम सोडला होता, तिथूनच पुन्हा सुरुवात करीत आहोत.” कक्कर भावंडे ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हा रक्षाबंधनाचा विशेष भाग अधिकच संगीतमय झाला होता. त्यात काही गुणी लिटल चॅम्प्सकडून अप्रतिम गाणी सादर करण्यात आली. बॉबी आणि सौम्या यांनी यावेळी ‘फूलों का तारों का’  हे बहीण-भावांवरील सुपरहिट गाणे सादर केले, तर झैद अलीने ‘मेरे रश्के कमर’  हे गीत खणखणीत आवाजात गाऊन सर्वांचं मनं जिंकलं. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या हा एपिसोड पाहताना प्रेक्षकांच्या मनात अनेक सुखद आठवणी जाग्या होतील.