‘कलंक’ ट्रेलर प्रदर्शित, गुंतागुंतीच्या नात्याची कहाणी

‘कलंक’ ट्रेलर प्रदर्शित, गुंतागुंतीच्या नात्याची कहाणी

बहुचर्चित ‘कलंक’ या करण जोहरच्या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं. अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून नात्यांची गुंतागुंत दिसून येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आमनेसामने दिसणार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य तर होतंच. पण अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करण्यात आल्याचं या ट्रेलरवरून स्पष्ट होतंय. करण जोहरचे चित्रपट हे नेहमीच भवदिव्य असतात. त्याप्रमाणे हा चित्रपटदेखील भव्यदिव्य आहे. पण तरीही यामध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे हे नक्की. प्रेम, हव्यास आणि गुंतागुंत याभोवती ही कथा गुंफण्यात आल्याचं दिसून येत आहे.

Subscribe to POPxoTV

आलियाच्या संवादाने ट्रेलरची सुरुवात


आलिया भट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. आलियाने फारच कमी कालावधीमध्ये आपल्यातील अभिनय सिद्ध केला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी असल्याचं तिच्या संवादावरून आणि तिच्या ट्रेलरमधील वावरावरून जाणवत आहे. या ट्रेलरची सुरूवातच तिच्या संवादाने होत आहे. या एकाच संवादावरून चित्रपटाचा गाभा काय असेल हे लक्षात येईल. ‘मेरे गुस्से में लिए गए एक फैसले ने हम सबकी जिंदगी बर्बाद कर दी’ या संवादाने ट्रेलरला सुरुवात होते. तर दुसऱ्या बाजूला आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी दाखवण्यात आली आहे. आलियाशी आदित्य बोलत असताना मी माझ्या बायकोवर अतिशय प्रेम करतो असं म्हणताना दाखवण्यात आला आहे. पण तरीही आलिया आणि आदित्यचं लग्न होताना दिसत आहे. त्यामुळे नक्की या चित्रपटामध्ये काय असणार याची कल्पना आली असली तरीही ती कशा प्रकारे मांडण्यात आली आहे याची उत्सुकता या ट्रेलरने नक्कीच राखून ठेवली आहे.


वरूण आणि आलियाची केमिस्ट्री


kalank FI


यामध्ये लग्न झालेल्या आलिया आणि वरूणचं प्रेमही दाखवण्यात आलं आहे. तर रूप अर्थात आलिया आणि देव अर्थात आदित्य यांच्या आयुष्यापासून दूर राहण्याची धमकी देताना संजय दत्त दाखवण्यात आला आहे. पूर्ण कथा ही या सहा भूमिकांभोवतीच फिरणारी असून आलिया आणि वरूण हे महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट होतंय. याशिवाय या चित्रपटामध्ये अभिनेता कुणाल खेमूही मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.


करणचे वडील यश जोहर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट


‘कलंक’ हा चित्रपट करण जोहरचे वडील यश जोहर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता असं याआधीही करणने स्पष्ट केलं आहे. शिवाय बऱ्याच वर्षांनंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा आमनेसामने आल्यामुळे प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 1940 सालातील ही घडणारी कथा असून हा करणाचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचंही त्याने म्हटलं होतं. आतापर्यंत वरूण आणि आलियाने अभिनय केलेले करण जोहरचे सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. शिवाय याची स्टारकास्टही खूप मोठी आहे. कसलेल्या अभिनेत्यांना पाहायला प्रेक्षक येणार का हे आता लवकरच कळेल.


फोटो सौजन्य - Instagram, Youtube


हेदेखील वाचा -