केजोने केला सलमान खानच्या लग्नाचा गौप्यस्फोट

केजोने केला सलमान खानच्या लग्नाचा गौप्यस्फोट

सलमान खान जिथे जाईल तिथे त्याला गेले कितीतरी वर्ष लग्न कधी करणार हा प्रश्न सतत विचारला जातो. नुकताच सलमानने आपल्या पनवलेच्या फार्म हाऊसवर 53 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती. आता तुम्हाला वाटत असेल की, करणने तिथेच त्याच्याबरोबर प्रश्न - उत्तरांचा खेळ खेळला की काय? तर तसं नाहीये. सलमानच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर करणने नेहा धुपियाच्या शो मध्ये दिलं आहे. सलमान नेहमीच या प्रश्नाचं उत्तर टाळत आला आहे किंवा बऱ्याचदा त्याने मस्करीमध्ये काहीही उत्तरं दिली आहेत. मात्र आता करणला या प्रश्नाचं उत्तर कसं माहीत आणि त्याने नक्की नेहाला काय उत्तर दिलं याची उत्सुकता नक्कीच ताणली गेली असेल ना?


salman karan
हजरजबाबी करण


करण आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. एक उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक आणि निवेदक म्हणूनच करणची ओळख नाही तर, कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही स्क्रिप्टशिवाय करण अतिशय उत्स्फूर्तपणे उत्तरं देऊ शकतो आणि वातावरण खेळकर बनवू शकतो. नुकताच करण नेहा धुपियाच्या शो मध्ये पाहुणा म्हणून आला होता. नेहाने त्याला सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता, सलमान 2019 मध्ये लग्न करणार असल्याचं करणने पटकन सांगितलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली की, सलमान नक्की कोणाबरोबर लग्न करणार आहे? पण क्षणातच करणने खुलासा केल्यानंतर नेहाला आपलं हसू थांबवता आलं नाही. कारण करणच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये सलमान खान तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांसह लग्न करणार आहे. यानंतर दोघेही अगदी मनापासून हसले. मात्र सलमानचं लग्न हा संपूर्ण जगाचा प्रश्न झाल्यासारखंच वातावरण आहे. करण आणि सलमान दोघेही हजरजबाबी आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळीही दोघेही एकमेकांची मस्करी करत असतात. आता करणने सलमानबद्दल असं विधान केल्यानंतर सलमान यावर प्रतिक्रिया देणार की नाही हेदेखील बघणं उत्सुकतेचं असणार आहे. यापूर्वीही दोघांनी अशा तऱ्हेने काही शो मध्ये मस्करी केलेली आहे. 


bharat
सलमानचा ‘भारत’ 2019 ईदला होणार प्रदर्शित


सलमानचा यावर्षी रेस ३ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता 2019 ईदला सलमानचा ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून सलमान आणि प्रेक्षकांनाही खूप अपेक्षा आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून या चित्रपटामध्ये कतरिना आणि दिशा पटानी या दोघींचीही महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जाफर यानं केलं आहे. आतापर्यंत अलीबरोबर सलमानने केलेले सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. शिवाय अली, सलमान आणि कतरिना ही त्रयी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे सलमानसाठी 2019 हे नववर्ष काय घेऊन येणार आहे हे बघावं लागेल. मात्र तरीही सलमानच्या लग्नाच्या प्रश्नाचं उत्तर नक्की कोण देऊ शकेल हे सांगता येत नाही. वास्तविक खुद्द सलमानही या प्रश्नाचं उत्तर कधी देऊ शकेल की नाही हाच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतो.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम