अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक

अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक

बॉलीवूडची 'लोलो' अर्थात करिश्मा कपूर पुन्हा अभिनयक्षेत्रात  कमबॅक करत आहे. एक काळ असा होता जेव्हा करिश्माच्या डान्स आणि अभिनयाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. मात्र 2012 साली 'डेंजरस ईश्क' या चित्रपटात काम केल्यानंतर करिश्माने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. खरंतर लग्न, मुलं आणि घटस्फोट या चक्रात अडकल्यापासूनच ती चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूरच गेली होती. असं असलं तरी 'लोलो' तिच्या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. तिची बहीण आणि बॉलीवूडची 'बेबो' करिना कपूरसह तीचे सतत फोटो व्हायरल होत असतात. आता बॉलीवूडची ही लोलो पुन्हा अभिनय क्षेत्रात आपला जम बसवत आहे. एकता कपूरच्या एका वेबसिरिजमध्ये करिश्मा पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.

करिश्मा लवकरच झळकणार या वेबसिरिजमध्ये


आजकाल वेबसिरीज पाहण्याचा एक ट्रेंडच झाला आहे. त्यामुळे करिश्माने वेबसिरिजमधून कमबॅक करण्याचा निर्णय घेतला असावा. ऑल्ट बालाजीच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर होणारी ही वेबसिरिज आहे. या वेबसिरिजचं नाव 'मेंटलहुड' आहे. या वेबसिरीजमधून जीवनाशी संघर्ष करत जगणाऱ्या पाच मातांची कहाणी उलगडण्यात येणार आहे. अमेरिकेतील टीव्ही सिरिज प्रिटी लिटील लायर्स वर ही कथा आधारित असण्याची शक्यता आहे. 'मेंटलहुड'मध्ये करिश्मा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या आधी या वेबसिरिजचं नाव 'मेंटल' असं ठरविण्यात आलं होतं. मात्र अभिनेता सलमान खान आणि सोहोल खान यांनी आधापासून या टायटलसाठी नोंदणी केलेली असल्यामुळे या वेबसिरिजचं नाव बदलून 'मेंटलहुड' असं ठेवण्यात आलं.

करिश्माचा अभिनय प्रवास


करिश्मा कपूरने प्रेमकैदी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हिरो नं 1, कुली नं 1, अनाडी, साजन चले ससुराल,गोपीकिशन, बीबी नं 1 सारख्या विनोदी  चित्रपटांमधून तिचं एक वेगळंच रूप दिसून आलं. राजा हिंदूस्थानी, दिल तो पागल है, फिजा, जुबैदा सारख्या चित्रपटातून तिच अभिनयकौशल्य जगासमोर आले. 2003 साली करिश्मा कपूरने उद्योगपती संजय कपूर यांच्याशी विवाह केला. पुढे तिला समीरा आणि कियान ही दोन गोंडस मुले झाली. लग्नानंतर पतीशी सूत न जुळल्यामुळे 2016 मध्ये तिने संजय कपूर यांच्याशी घटस्फोट घेतला. मात्र या सर्व चक्रात ती  अभिनय क्षेत्रापासून दुरावली गेली. आता मात्र ती पुन्हा मेंटलहुड या वेबसिरिजमधून कमबॅक करत आहे. त्यामुळे चाहत्यांवर लोलोच्या अभिनयाची जादू पुन्हा चालणार असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.


अधिक वाचाः


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


प्रेमाचा निखळ अनुभव सांगणारं ‘अजुन अजुन’ गाणं


‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम