भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर

भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर

बॉलीवूडचा खिलाडी असणारा अक्षयकुमार याने 13 वर्षांपूर्वी साकारलेला भुलभुलैय्या या चित्रपटाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून चर्चा होती. या चित्रपटात अक्षयची भूमिका बॉलीवूडचा लेटेस्ट क्रश कार्तिक आर्यन साकारणार असल्याचं काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झालं होतं. आता कार्तिकचा पहिला लुक समोर आला आहे. तेव्हापासूनच प्रेक्षक आणि कार्तिकचे चाहते या चित्रपटाचा एक लुक पाहायला मिळावा यासाठी आतुर होते. तर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून कार्तिकचा या चित्रपटातील पहिला लुक समोर आला आहे. 

कसा आहे कार्तिकचा लुक

कार्तिकचा हा लुक अक्षयच्या लुकशी मिळताजुळता आहे. कार्तिक या लुकमध्ये पिवळ्या कुरता आणि धोतरामध्ये दिसत आहे. यामध्ये त्याने गळ्यात आणि हातात रूद्राक्षाच्या माळा अडकवल्या आहेत. इतकंच नाही तर एक क्षण हा अक्षय कुमारच आहे की काय असा भास होतो. इतका हुबेहूब कार्तिक आर्यन या लुकमध्ये दिसून येत आहे. या लुकबरोबर जास्त प्रयोग करण्यात आलेला नाही. दरम्यान या पोस्टरवर ‘13 साल बाद...द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं लिहिण्यात आलं आहे. तर त्याच्या चारही बाजूला सांगाडेही दिसून येत आहे. गॉगल लावून कार्तिकने पोस्टरवर पोझ दिली आहे. त्यामुळे आता यामध्ये कार्तिकही अक्षयप्रमाणेच भूमिका साकारणार की काय असा एक कुतूहलाचा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. 

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट

कार्तिकसाठी या चित्रपटात काम करणं स्वप्नवत

नुकतंच एका मुलाखतीमध्ये कार्तिकने सांगितलं की, भुलभुलैया हा आपला नेहमीच आवडता कॉमेडी सुपरनॅचरल थ्रिलर होता आणि आता या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने आपण खूपच आनंदी असून स्वप्नवत असल्याचं म्हटलं. विशेषत: कार्तिक आर्यन हा अक्षय कुमारचा चाहता आहे आणि त्याने केलेल्या चित्रपटात काम करायला मिळणं हे त्याच्यासाठी विशेष जबाबदारीचं काम असल्याचंही त्याने म्हटलं आहे. ही एक चांगली कथा असून अनीस बज्मीने ही कॉमेडी एका दुसऱ्याच लेव्हलला नेली असल्याचंही कार्तिकने म्हटलं आहे. भुलभुलैय्याच्या पहिल्या भागात अक्षयकुमारच्या तोडीला तोड अभिनय करत विद्या बालनने भूमिका साकारली आहे. दोघांनीही या चित्रपटात आपल्या अभिनयाने मन जिंकून घेतलं होतं. पण नव्या भागामध्ये कार्तिकबरोबर ही भूमिका कोण साकारणार हे अजूनही फायनल झालेलं नाही. यासाठी अनन्या पांडे, सारा अली खान आणि जान्हवी कपूर या तिघींच्या नावाचा विचार चालू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण अजूनही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. 

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’

पहिल्या चित्रपटाचा पगडा

पहिला भुलभुलैय्या हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अक्षयकुमार आणि विद्या बालनसह शायनी आहुजा आणि अमिषा पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. याशिवाय परेश रावल, राजपाल यादव यांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे आता या नव्या भागात कोणकोणत्या व्यक्तिरेखा असतील आणि त्या भूमिका कोण साकारणार याबद्दल चर्चांना सुरुवात झाली आहे. तसंच या चित्रपटाचा पगडा अजूनही कायम असल्यामुळे या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची जबाबदारीही निश्चितच वाढली आहे. कार्तिक आता ही भूमिका कशी पेलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. हा चित्रपट 31 जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

कार्तिक आर्यनने मिळवली अजून एक तगडी भूमिका