कियारा आडवाणी सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तिला मिळालेली लोकप्रियता आणि यश यामुळे तिच्याकडे सध्या मोठ मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत. मात्र हे यश तिला गेल्या दोन वर्षात मिळालेलं आहे. या यशाचा सर्वात मोठा वाटा आहे कबिर सिंह या चित्रपटाला. कारण निर्माता मुराद खेतानी याने कियाराला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि कियाराचं नशीबच पालटलं. कबिर सिंह हिट झाल्यामुळे कियाराकडे मोठ मोठ्या प्रोजेक्टची रांग लागली. स्वतः मुराद खेतानीनेच तिला पुन्हा भूल भुलैया 2 या लोकप्रिय सीक्वलमध्ये पुन्हा मुख्य भूमिका दिली. म्हणजे भूलभुलैयामध्ये कियारा मुराद खेतानीसोबत दुसरा चित्रपट करत आहे. मात्र याच बॅनरच्या तिसऱ्या चित्रपटात मात्र तिने काम करण्यास चक्क नकार दिला आहे. जाणून घ्या काय आहे कारण
कियाराने का नाकारला कबिर सिंहच्या निर्मात्याचा चित्रपट
कियारा आडवाणीसोबत तिसऱ्या चित्रपटात काम करण्यासाठी कबिर सिंहचे निर्माते मुराद खेतानी खूपच उत्सुक होते. मुराद लवकरच एक महिला केंद्रित चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटाचं नाव अपूर्वा असून या चित्रपटात एका महिलेच्या जीवनाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अपूर्वा एक रोमांचक थ्रीलर चित्रपट असणार आहे. मुराद खेतानीला या चित्रपटात कियाराने मुख्य भूमिका साकारावी असं वाटत होतं. त्याने या चित्रपटाची ऑफर कियारा दिली. मात्र कियाराने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार कियाराने हा चित्रपट कमी बजेटचा असल्यामुळे नाकारलेला आहे. कियारा आणि तिच्या टीमला या चित्रपटाची कथा आवडली होती. मात्र कियारा आता यशाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. त्यामुळे या टप्प्यावर असताना तिच्याकडे असलेल्या बिग बजेट चित्रपटांसोबत जर तिने एक कमी बजेटचा चित्रपट केला तर हे तिच्या करिअरसाठी घातक ठरू शकतं. कियारा आणि तिची टीम एवढी मोठी रिस्क घेण्यास तयार नाहीत. या कारणासाठी कियाराने कबिर सिंह सारखा चित्रपट बनवणाऱ्या आणि तिला यशाच्या शिखरावर पोहचवणाऱ्या निर्मात्याच्या चित्रपटाला चक्क नकार दिला आहे.
कियाराचे आगामी बिग बजेट चित्रपट
कियारा सध्या मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट एका पाठोपाठ एक साईन करत आहे. तिच्याकडे सध्या आशुतोष गोवारीकरच्या प्रॉडक्शनचा करमकुर्रम आहे. त्याचप्रमाणे मुराद खेतानाचीच भूलभुलैया ती कार्तिक आर्यनसोबत करत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या शमशेरामध्ये ती लवकरच झळकणार आहे. त्याचप्रमाणे वरूण धवनसोबत जुग जुग जियोचं ती शूटिंग करत आहे. रणवीर सिंहसोबत दिग्दर्शक शंकरचा आगामी चित्रपटही तिने साईन केला आहे. या सर्व मोठ्या बॅनरच्या चित्रपटाच्या गर्दीत आता मुरादचा एक कमी बजेटचा चित्रपट करणं तिला नक्कीच मान्य नाही. मात्र कियारा असं करताना हे विसरून गेली आहे की या चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याच्या कबिर सिंहच्या यशामुळेच तिला असे बिग बजेट चित्रपट आज ऑफर होत आहेत. मुराद खेतानीला आशा होती की कमी बजेट असलं तरी कियाराच्या प्रसिद्धीचा फायदा त्याच्या आगामी अपूर्वाला होऊ शकतो. असो आता मुराद खेतानीचा आगामी अपूर्वा नक्की कोणाच्या पदरात पडणार हे पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे. कदाचित मुरादच्या याही चित्रपटालाही प्रेक्षक डोक्यावर घेतील आणि त्यात काम करणाऱ्या एखाद्या नव्या अभिनेत्रीला यशाचे दरवाजे उघडे होतील.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अभिनेता विद्युत जामवालचा शिवशंकर अवतार, चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
परिणीतीआधी श्रद्धा कपूर साकारणार होती सायना, या कारणांमुळे सोडावी लागली संधी
स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर