रामायणमधील ‘लवकुश’ सध्या काय करतात, एक आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता

रामायणमधील ‘लवकुश’ सध्या काय करतात, एक आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही पौराणिक मालिका सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. लॉकडाऊनमुळे मालिकांचे शूटिंग बंद आहे. यासाठीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनने नव्वदच्या दशकातील 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांचे पुनःप्रक्षेपण सुरू केले. आश्चर्य म्हणजे या मालिकांना नव्वदच्या दशकातच नव्हे तर आजही तितकीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकांची लोकप्रियता पाहून दूरदर्शन आणि इतर अनेक मनोरंजन वाहिन्यांनी पुन्हा आणखी काही जुन्या गाजलेल्या मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नव्वदच्या दशकात रामायण मालिका पाहण्यासाठी लोक अक्षरशः आतूर असायचे. सध्या प्रसारित होणाऱ्या रामायणामध्ये लवकरच ‘लवकुश’ची एन्ट्री होणार आहे. रामानंद सागर यांच्या रामायणामधील ‘लवकुश’ साकारणारे बालकलाकार सध्या काय करतात हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 

instagram

'कुश' आहे मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय

रामायणामध्ये ‘लवकुश’ची भूमिका बालकलाकार ‘स्वप्नील जोशी’ आणि ‘मयुरेश क्षेत्रमाडे’ने साकारली होती. यातील कुशची भूमिका साकारणारा स्वप्नील जोशी आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेला आता जवळजवळ 33 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे एवढ्या वर्षात या दोन्ही बालकलाकारांच्या आयुष्यात आता अनेक बदल झाले आहेत. स्वप्नीलने बालकलाकार म्हणून मालिकांमध्ये वयाच्या नवव्या वर्षी काम करायला सुरूवात केली होती. पौराणिक मालिकांचा विचार केल्यास त्याने ‘कृष्णा’ या आणखी एका पौराणिक मालिकेत बालकृष्णाची भूमिका साकारली होतीत. त्यामुळे काही काळ त्याच्याकडे अशाच भूमिकांसाठी विचारणा होत असे. मात्र त्यानंतर किशोरवयात स्वप्नीलने अमानत, दिल विल प्यार व्यार, हद कर दी आपने, भाभी, देश में निकला होगा चांद अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. 'गुलाम ए मुस्तफा' मधून त्याने नाना पाटेकरसोबत हिंदी चित्रपटातदेखील नाव मिळवलं. त्यानंतर अनेक मराठी मालिकांमधून तो झळकू लागला. आणि आता तर त्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची चॉकलेट बॉय अशी ओळख निर्माण केली आहे. मितवा, दुनियादारी, मुंबई पुणे मुंबई, मोगरा फुलला अशा अनेक चित्रपटांमधील त्याने साकारलेल्या रोमॅंटिक भूमिका गाजल्या आहेत. 

Instagram

लव सध्या काय करतो...

रामायणामधील लवची भूमिका साकारणारा ‘मयुरेश’ आता अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. मयुरेश एका नामांकित कंपनीमध्ये सीईओचे पद सांभाळत आहे. यापूर्वीदेखील त्याने मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केलं आहे. त्याने त्याच्या क्षेत्रात मोठं यश नक्कीच गाठलं आहे. रामायणानंतर मात्र तो अभिनयक्षेत्रातून दूर गेला आणि एका वेगळ्या क्षेत्रात त्याने स्वतःचा ठसा उमटवला. असं असलं तरी स्वतःचा एक छंद तो मात्र आजही जपत आहे. मयुरेश एक उत्तम लेखक असून त्याने ‘स्पाईट ऑफ डेव्हलपमेंट’ हे पुस्तक त्याच्या आणखी काही परदेशी लेखकांच्या मदतीने लिहीलं आहे.

'रामायण'ची वाढतेय क्रेझ

रामायण मालिकेची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोनामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊनच्या काळात वाढ होतेय. तर दुसरीकडे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षक आपलं मन रामायण आणि महाभारत मालिकांमध्ये गुंतवत आहेत. या मालिका पाहताना अनेकजण आपले सेल्फी शेअर करत आहेत. रामायण आणि महाभारतावर अनेक मजेशीर मीम्सदेखील व्हायरल होताना दिसत आहेत.