साजणाच्या रमाची ‘स्टाईलगिरी’

साजणाच्या रमाची ‘स्टाईलगिरी’

'साजणा' मालिकेतील रमाला म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारीला अगदी अल्पावधीतच लोकप्रियता मिळत आहे.  या मालिकेच्या निमित्ताने साधी, सालस आणि सोज्वळ अशी ही रमा, आज घराघरात जाऊन पोचली आहे. कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेली 'साजणा' ही  एक प्रेमकहाणी आहे. अभिजित श्वेतचंद्र आणि पूजा बिरारी या मालिकेत मुख्य भूमिका साकारात आहेत. गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारताना, सलवार-कमीझ, त्यावर ओढणी असा सोज्वळ पेहराव करणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र फारच बोल्ड आहे. अनेकदा कलाकारांचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आयुष्य एकसमान असतं. पूजाच्या 'स्टाईल स्टेटमेंट'च्या बाबतीत मात्र ही गोष्ट खोटी ठरते. सोशल मीडियावर असलेले तिचे फोटो बघून ही गोष्ट लगेच लक्षात येईल. मालिकेत सोज्वळ दिसणाऱ्या पूजाचे हे झकास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाने इन्स्टावर तिचे बोल्ड आणि ब्युटिफुल फोटो शेअर केले आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक वेशभूषा करणं आणि त्यात प्रत्येक वेशभूषेत सुंदर दिसणं यात पूजाला आवडतं. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री तापसी पन्नू आणि सोनम कपूर यांच्याकडे ती फॅशनमधील आदर्श म्हणून बघते. अर्थात, मराठी टेलिव्हिजन माध्यमात पूजाची फॅशनदेखील एक 'स्टाईल स्टेटमेंट' होत आहे. नेहमी पूजाला साध्या पेहरावात पाहणाऱ्या तिच्या चाहत्यांना तिचा हा 'बोल्ड लुक' नक्कीच आवडेल.

कशी आहे साजणाची खरी रमा

रमा ही एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे पुरेसं शिक्षण न घेऊ शकलेली पण तरिही स्वाभिमानी तरूणी आहे. शिक्षण नसलं तरी रमाकडे एक प्रकारचा बेडधकपणा आहे. तिची स्वप्नं इतरांपेक्षा वेगळी आणि मोठी आहेत. शिवाय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी  तिची प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आहे. तिचं प्रेम एका श्रीमंत घरातील राजबिंड्या मुलावर जडलं आहे. प्रेमाचे हे विविध रंग दाखवणारी ही मालिका सध्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रमाप्रमाणेच पूजालादेखील स्वतः आनंदी राहायला आणि इतरांना आनंदी ठेवायला आवडतं. मात्र ती तिच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात रमापेक्षा नक्कीच वेगळी आहे. 

साजणा मालिकेला नवे वळण

रमा आणि प्रताप यांची प्रेमकहाणी असलेली 'साजणा' ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. या दोघांचे निखळ आणि सोज्वळ प्रेम प्रेक्षकांना आवडलेले असले, तरीही घरच्यांपासून हे प्रेम लपवून ठेवण्याची दोघांची धडपड अजूनही सुरू आहे. मुख्य भूमिकेत असलेले पूजा बिरारी आणि अभिजित श्वेतचंद्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत. आपलं नातं घरच्यांना कळू नये म्हणून प्रताप आणि रमाची सुरू असलेली धडपड आणि उडणारी तारांबळ यामुळे सगळ्यांचे खूप मनोरंजन होते आहे. गेल्या काही दिवसात हे प्रेम अधिकाधिक फुलत असलेले प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण, या प्रेमाच्या प्रवासात एक मोठा अडथळा उभा ठाकला आहे. प्रतापची आई वसुंधरा आणि मावशी शालिनी यांनी त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. तिच्याशी प्रतापने लग्न करावं, अशी दोघींची मनापासून इच्छा आहे. या लग्नाविषयीचा त्यांचा उत्साह पाहून अखेर प्रताप गोंधळून जातो. इतके दिवस लपवून ठेवलेलं रमासोबतचं नातं, अखेर तो आईला सांगतो. त्यांच्या प्रेमाविषयी ऐकून वसुंधरा, म्हणजेच प्रतापची आई खुश होते. पण, त्याचे बाबा हे प्रेम मान्य करतील का, याची धास्ती सुद्धा तिला वाटते. त्यांच्या प्रेमकथेतील या संभाव्य धोक्याविषयी आई त्याला आठवण करून देते. त्यांच्या या प्रेमाला मिळत असलेले नवे वळण त्यांच्यासाठी यापुढच्या काळात काय काय घेऊन येईल हे जाणून घेणे आता उत्सुकता वाढवणारं आहे.