#rakshabandhan2019 मराठी कलाकारांनी शेअर केल्या रक्षाबंधनच्या 'खास आठवणी'

#rakshabandhan2019 मराठी कलाकारांनी शेअर केल्या रक्षाबंधनच्या 'खास आठवणी'

रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहीण-भावासाठी खास असतो. कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये सण-समारंभ साजरे करण्यासाठी वेळ मिळतोच असं नाही. मात्र राखीचा सण अनेकजण अगदी आठवणीने आणि प्रेमाने साजरा करतात. काही मराठी कलाकारांनी त्यांच्या रक्षाबंधनच्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या आहेत. 

शिवानी सुर्वे

बिगबॉस मध्ये सर्वात जास्त नाव गाजत आहे ते म्हणजे ‘शिवानी सुर्वे’. शिवानी सुर्वेला छोटी लहान बहीण आहे. या दोघी बहीणी एकमेकांना राखी बांधून हा सण साजरा करतात. तसंच त्यांच्या मावसभावाला देखील त्या दोघी राखी बांधतात. या वर्षी शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरात असल्यामुळे ती तिच्या भावंडांना नक्कीच मिस करणार आहे. लहानपणापासूनच शिवानीचं तिच्या भावंडांसोबत चांगलं बॉंडिंग आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सर्व मावस आणि चुलत भावंडे एकत्र येतात आणि मौजमजा करत हा दिवस एकमेकांच्यासोबत घालवतात

दीप्ती भागवत

अभिनेत्री दीप्ती भागवतने तिच्या भावासोबतच्या काही गोड आठवणी शेअर केल्या. "माझ्या सख्या भावाला रघुनंदन बर्वेला एका रक्षाबंधनाच्या वेळी मी साखर भात खाऊ घातला होता जो भात वाजवीपेक्षा जास्त गोड झाला होता.आग्रह करकरून त्याला खाऊ घातला.आणि त्याने तो माझ्या प्रेमापोटी खाल्ला देखील. मात्र त्याचा केविलवाणा चेहरा मला आजही आठवतोय. शिवाय लहान असताना दादाला आकाराने मोठ्या स्पंजच्या राख्यांची आवड होती. मी सगळ्यात मोठी राखी दादाला बांधत असे. त्याचा हात राख्यांनी भरून जायचा. या वर्षी रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आहे. या दिनामुळे आपल्या देशबांधवांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम आणि आदराची भावना दृढ होते. या वर्षी माझ्या मामाची तब्येत बरी नसल्याने घरातील वातावरण वेगळं आहे ... तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. या वर्षी मी गजर कीर्तनाचाच्या शूट मधून वेळ काढून त्यांच्यासाठी पुरणपोळ्या करणार आहे. माझी नणंद ,दिर ही माझ्या घरी येणार आहेत  तसंच रक्षाबंधनाला साक्षी ठेवत पूरग्रस्त बांधवांना मी मदत करायची ठरवली आहे. "

कार्तिकी गायकवाड

लिटील चॅंम्पची प्रथम विजेती आणि महाराष्ट्राची एक लाडकी गायिका कार्तिकीनेही आपल्या भावंडाच्या गमतीजमती शेअर केल्या. "कौस्तुभ आणि कैवल्य असे मला दोन भाऊ आहेत. ज्यामुळे माझ्यासाठी रक्षाबंधन माझ्यासाठी नेहमीच एक खास सण आहे. दोन-दोन गिफ्ट्स या दिवशी मला मिळतात, हे सुद्धा त्यामागचं एक कारण आहे.अर्थात, रक्षाबंधनाचा सुरुवात आमच्या घरात होते, ती माऊलींच्या दर्शनापासून! सकाळी उठल्यावर, मी विठूमाऊलींच्या मंदिरात जाते व त्यांना राखी बांधते. घरी आल्यावर, दोन्ही भावांना ओवाळून त्यांना राखी बांधते. भावाच्या उज्वल भविष्यासाठी बहिणीने प्रार्थना करणं, बहिणीचं रक्षण करण्याचे वचन भावाने तिला देणं, या परंपरा आपल्याकडे चालत आल्या आहेत. भावाबहिणींचे मजामस्तीचं हे नाते अधिक घट्ट करणारा हा सण मला खूपच आवडतो. भावांसोबतच्या आठवणी सांगायच्या झाल्या, तर अगदी रोजच्या आयुष्यातील काही ना काही गोष्टी सांगता येतील. आम्ही भावंडं खूप भांडतो, मस्ती करतो, याचा आईबाबांना सुद्धा कधी कधी त्रास होतो. मी मोठी असल्याने सगळ्यात जास्त ओरडा मी खात असले तरीही खोड्या मात्र हे दोघेही खूप करत असतात. यामुळे रोजच एखादी नवी आठवण या यादीत समाविष्ट होते. तरीही, एखादी खास आठवण सांगायची झाली तर, ती तानपुऱ्याची सांगता येईल. घरात दोन तानपुरे आहेत, पण बाबा कार्यक्रमासाठी जर तानपुरा घेऊन गेले, तर रियाजाला आधी कुणी बसायचं, या गोष्टीवरून सुद्धा आमच्यात भांडणं होतात. एका रक्षाबंधनाच्या दिवशी कौस्तुभने मुद्दाम याच विषयावरून माझ्याशी भांडण केलं. हे भांडण वाढल्यावर मी त्याच्यावर रागावले. त्याने शांतपणे एक तंबोरा काढून माझ्या हातात ठेवला. अशा निराळ्या पद्धतीने त्याने मला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं. कैवल्य आमच्या घरातील शेंडेफळ आहे. पण, लहानपणापासूनच तो अत्यंत आध्यात्मिक आहे. त्यामुळे अनेकदा हा आमच्यापेक्षा लहान आहे की मोठा, असा प्रश्न आम्हाला पडतो. माझ्या या दोन्ही गोड भावांना सुखसमृद्धीचे आयुष्य लाभो अशी प्रार्थना मी माऊलींच्या चरणी करते."

अभिनय बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा आणि नवोदित अभिनेता अभिनय बेर्डे सध्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनयची बहीण स्वानंदी सतत अभिनयच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते. मराठी चित्रपटसृष्टीतील बहीण-भावाची ही एक क्युट जोडी आहे. रक्षाबंधनसाठी दोघंही एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढतात. स्वानंदीला फॅशनबाबत चांगली माहिती असल्यामुळे अभिनयने कोणती स्टाईल कॅरी करावी याबाबत ती त्याला नेहमी सल्ला देत असते. अभिनयने त्यांच्या लहानपणीचे  अनेक मजेशीर किस्से शेअर केले. शिवाय स्वानंदीला आयुष्यात जे जे चांगलं आहे ते सर्व मिळो सदिच्छा दिली. 

ऊर्मिला निंबाळकर

ऊर्मिला सांगते की, तिच्या भावाला लाडाने ती 'भैया' किंवा 'भनू' असं म्हणते. तिचा भैया म्हणजेच वैभव निंबाळकर हे 'भारताचे एक यंगेस्ट आय.पी.एस ऑफिसर’ आहेत. त्यामुळे त्यांची भारतात विविध ठिकाणी कामासाठी सतत बदली होत असते. वैभव निंबाळकर यांच्या सरकारी नोकरीमुळे मागील जवळजवळ अकरा वर्षे घरापासून दूर आहे. ज्यामुळे ही दोघं भावंडे गेली अकरा वर्षे रक्षाबंधनसाठी भेटू शकले नाहीत. यंदा तर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी असल्याने त्यांना रक्षाबंधनासाठी एकमेकांना भेटणं शक्यच होणार नाही. वैभव आणि ऊर्मिलाला आपल्या वैयक्तिक नात्यापेक्षाही देशसेवा किती महत्त्वाची आहे हे यातून दिसून येतं. लहानपणी मात्र त्याचं हे नातं फारच वेगळं होतं. शाळेत असताना शाळेतील इतर मुली ऊर्मिलाच्या  दादाला राखी बांधत असत. मात्र स्वभावाने पझेसिव्ह असलेल्या ऊर्मिलाला तिच्या लाडक्या भावाच्या हातावर फक्त आणि फक्त आपलीच राखी असावी असं वाटत असे. तिच्या भावाचंही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. म्हणूनच शाळेतून घरी येण्यापूर्वीच वैभव निंबाळकर त्याच्या मनगटावरील इतर बहीणींनी बांधलेल्या राख्या काढून ठेवत असे. अशा प्रकारे तो आपल्या छोट्या बहीणीचे मन राखत असे. 

ऊर्मिलाने शेअर केलं की, "यंदाच्या रक्षाबंधनसाठी मी भनूला बॅट आणि बॉल असलेली एक क्यूट राखी आणि मनातील भावना व्यक्त करणारं छोटंसं पत्र पाठवलं आहे. माझा भाऊ क्रिकेटवेडा आहे म्हणून मी त्याच्या आवडीनुसार त्याच्यासाठी ही खास राखी निवडली होती. भैयाला ती नक्कीच आवडेल. तो माझ्यापासून दूर असल्यामुळे माझ्या मनातील भावना मी त्या पत्रात व्यक्त केल्या आहेत."

ह्रता दुर्गुळे

ह्रता दुर्गुळेने रक्षाबंधनसाठी व्यक्त केल्या तिच्या मनातील भावना

"माझा लहान भाऊ फारच समजूतदार आणि प्रेमळ आहे. तो त्याच्या कामाबद्दल फारच सिरीयस असतो. त्यामुळे तो जे काम करतो ते अगदी प्रामाणिकपणे करतो. माझ्यापेक्षा लहान असूनही एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे माझी काळजी घेतो. रक्षाबंधनची आम्ही दोघंही अगदी आवर्जून वाट पाहत असतो. आमच्या लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. मात्र आजच्या दिवशी त्याचे फक्त भरपूर लाड करावेसे वाटतात. भविष्यात त्याला सुख आणि समाधान मिळावं यासाठी शुभेच्छा."

अधिक वाचा

#rakshabandhan2019 : तुमच्या लाडक्या भावाच्या राशीनुसार बांधा त्याला ‘या’ रंगाची राखी

राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या 'या' भेटवस्तू

यंदाचा रक्षाबंधन करा खास.. पाठवा शुभेच्छासंदेश

फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम