नाईकांचा वाडा घाबरवण्यास सज्ज, पुन्हा 'रात्रीस खेळ चाले'

नाईकांचा वाडा घाबरवण्यास सज्ज,  पुन्हा 'रात्रीस खेळ चाले'

'कोकणातील भूता म्हणजे काय सोप्पी गोष्ट नाय?' असं तुम्ही अनेकदा कोकणातील लोकांकडून ऐकले असेल. कोकणातील हीच भूत तुम्हाला पुन्हा एकदा घाबरवण्यासाठी सज्ज झाली आहेत. कारण झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा भेटीला येत आहे. पण यंदा ही भेट जास्त घाबरवणारी असणार आहे कारण नाईकांच्या वाड्यात पुन्हा अघटीत असे काहीतरी घडत आहे . पहिल्या भागापेक्षा हा नवा भाग अधिक घाबरवणारा असाणार आहे, असे तरी सध्या या मालिकेच्या प्रोमोजमधून दिसत आहे. पौष शुद्ध अष्टमीला म्हणजेच १४ जानेवारीला ही मालिका सुरु होणार आहे.


कसे आहेत प्रोमो?


'रात्रीस खेळ चाले' मालिका सीझन २ चे प्रोमो सुरु झाले असून या मालिकेत सगळी पात्रे त्यांची नावेसुद्धा तीच आहेत. पण या मालिकेत ही सगळी पात्रे तरुण दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत अण्णा दिसत आहेत. कारण पहिल्या भागात अभिरामच्या लग्नावेळीच अण्णांचे निधन होते. पण आता या मालिकेत ते आहेत. विशेष म्हणजे वाडा तोच माणसं तीच पण यावेळी कथा नक्कीच काहीतरी वेगळी आहे. पहिल्या प्रोमोत नाईकांच्या वाड्याला बाहेरुन कुलूप दिसत आहे. खूप वर्ष या वाड्याजवळ कोणी फिरकले देखील नाही असे वाटत आहे. पण वाड्याच्या बंद घरात नाईक कुटुंब आहे आणि आतून आम्हाक भेटूक इलस?, असं मालवणी भाषेत विचारत आहेत.  सगळ्यांमध्ये अण्णांच्या दोन्ही मुलांच्या बायका दिसत नाहीत याचा अर्थ या दोघांचे अद्याप लग्न झालेले नसावे किंवा या मागेही काही गुपित असेल. शिवाय प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार नाईक वाड्यात कैद आहेत ते त्यांचे दार उघडण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे लोक संध्याकाळ झाली म्हणून नाईकांच्या वाड्याकडून जाणे टाळत आहेत. हे सगळे प्रोमो पाहिले की, अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही.

मालिकेतील तो आवाज अधिक घाबरवणारा


'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतला एक म्युझिक पीस सगळ्यात जास्त घाबरवणारा आहे. हा आवाज नेमका कसा हे सांगण्यापेक्षा तो ऐकल्यानंतर संबंध नाईकांचा वाडा अंगावर येतो. अंधार आणि त्यात येणारा हा विचित्र आवाज काहीतरी रहस्य असल्याचे दाखवून देतो. प्रत्येक प्रोमोच्या शेवटी काहीतरी अघटीत घडत आहे, याची चाहूल देणारा असा हा आवाज आहे.

आधीच्या मालिकेचा अनपेक्षित शेवट


दोन वर्षांपूर्वी रात्रीस खेळ चाले ही मालिका आली. या मालिकेतील अण्णा, सुसल्या, दत्ता,निलिमा, पांडू, नेने वकिल, अभिराम, विश्वासराव अशी पात्रे चांगलीच गाजली. या मालिकेत पांडूचे काम करणारा प्रल्हाद कुरतडकर या मालिकेचा लेखक होता. ही मालिका चांगली सुरु असताना अंधश्रद्धा पसरवण्याचे काम ही मालिका करत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले आणि या मालिकेने घाबरवण्याचा ट्रॅक सोडला आणि ही मालिका अचानक संपवण्यात आली. या मालिकेचा शेवट अनेकांना असा असेल असा अपेक्षित नव्हता. पण आता या नव्या मालिकेचे टीझर पहिल्या सीझनपेक्षा अधिक घाबरवणारे आहेत. आता तरी नाईकांच्या वाड्यातील रहस्य उलगडतील असे वाटत आहे. आता प्रेक्षकांना आठवडाभर या मालिकेची वाट पाहावी लागणार आहे. झी मराठीवर १४ जानेवारीपासून रात्री १०.३० वाजता नाईकांच्या वाड्यातील हा थरार पाहता येणार आहे.


फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम