‘दहा बाय दहा'ने नाटकाचा सुवर्ण महोत्सवी टप्पा

‘दहा बाय दहा'ने नाटकाचा सुवर्ण महोत्सवी टप्पा

'दहा बाय दहा' ची चौकट मोडणारे 'दहा बाय दहा' हे लोकप्रिय नाटक सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर आले आहे. या नाटकाचा 50 वा प्रयोग लवकरच डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणार आहे. स्वरुप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. च्या सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर यांनी नाटकाची निर्मिती केली आहे.

चौकट मोडणाऱ्या कुटुंबाचं नाटक

या नाटकामध्ये घाडीगावकर नावाच्या अतिशय साध्या आणि पारंपरिक चौकटीत जगणाऱ्या कुटुंबांची गोष्ट मांडण्यात आली आहे. पण हीच पारंपरिक चौकट मोडण्याची त्यांची प्रेरणा आणि धडपड हाच नाटकाचा केंद्रबिंदू आहे. कम्फर्ट झोन सोडून वेगळं काही करण्याचा, मिळवण्याचा विचार देणाऱ्या या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. म्हणूनच या नाटकानं 50 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे.

जबरदस्त स्टारकास्ट

या नाटकात अभिनेते विजय पाटकर, दगडू फेम प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे, विधीशा म्हसकर, गौरव मालणकर, अमीर तडवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी लेखन, अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आशुतोष वाघमारे यांनी संगीत, विजय गोळे यांनी प्रकाश योजना, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, हितेश पवार यांनी रंगभूषा आणि रश्मी सावंत यांनी वेशभूषा केली आहे.

टीममध्ये आनंदाचं वातावरण

आतापर्यंत झालेल्या ५० प्रयोगांचा अनुभव अतिशय आनंददायी आहे. या नाटकातून केवळ घाडीगावकर कुटुंबच नाहीतर आम्हालाही नवा विचार मिळाला आहे. आमचा आणि प्रेक्षकांचा हा प्रवास धमाल आणि उत्साहवर्धक असाच आहे. ५० प्रयोगांचा टप्पा पुढे जाऊन शंभर, पाचशे, हजार प्रयोगांचा होईल अशी खात्री आहे, अशी भावना नाटकाच्या टीमनं आणि निर्मात्यांनी व्यक्त केली.

विजय पाटकर यांचं कमबॅक

'दहा बाय दहा' नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकातून तब्बल 20 वर्षांनी अभिनेते विजय पाटकर रंगभूमीवर परतले आहेत. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचं हे नाटक असून, नाटकामधल्या कुटुंबातली मोहन घाडीगावकर ही वडिलांची व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. याबाबत सांगताना ते म्हणाले की, 'मधल्या काळात सिनेमांमुळे नाटकाला पुरेसा वेळ देऊ शकेन की नाही असं वाटत होतं. आता मात्र मी पूर्ण वेळ नाटकाला दिला आहे. तालमीसाठी वेळ मिळावा म्हणून मी कुठलंही शूटींग वगैरे करत नाही. सतत सिनेमांमध्ये काम केल्यामुळे कामात तोचतोचपणा येत होता. नाटक ही गोष्ट मला अभिनेता म्हणून ताजंतवानं करणारी आहे. हे नाटक माझ्या अभिनयाला साजेसं आहे. नाटकातले अनेक प्रसंग मी स्वतः वैयक्तिक आयुष्यात अनुभवले आहेत. म्हणून मी हे नाटक करण्याचा निर्णय घेतला. माझं काम आवडतंय की नाही, याची थेट पोचपावती प्रेक्षकांकडून इथे मिळते.'

प्रथमेशचं पहिलंच नाटक

एकीकडे या नाटकातून विजय पाटकरांनी रंगभूमीवर कमबॅक केलं आहे तर टाईमपास या चित्रपटातील दगडू ही धमाल भूमिका साकारलेल्या प्रथमेश परबचं हे पहिलंच नाटक आहे. त्याच्या या पहिल्या नाटकाला मिळालेला प्रतिसाद नक्कीच आनंददायी आहे. दगडूने त्याच्या टाईमपास या चित्रपटातील भूमिकेतूनही प्रेक्षकांना हसवता हसवता रडवलं होतं. तसंच काहीसं या नाटकाच्या बाबतीतही आहे. या नाटकांमध्येही हसवत हसवता प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या गंभीरतेकडे नेण्यात दहा बाय दहाची टीम यशस्वी होते.  

POPxoMarathi कडून 'दहा बाय दहा'च्या संपूर्ण टीमला खूपखूप शुभेच्छा.

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सूटदेखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.