साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सिझन, अहमचा असणार डबल रोल

साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सिझन, अहमचा असणार डबल रोल

साथ निभाना साथिया मालिका 2010 साली सुरू झाली होती. यातील गोपी बहू, राशी बहू, अहम आणि कोकिलाबेन या भूमिका आजही तितक्याच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेवर आधारित एक मीमही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या मालिकेची लोकप्रियता पाहता आता लवकरच या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे यात गोपी बहू आणि कोकिलाबेन आहेतच पण अहमचा डबल रोल असणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अचंबित करणारे अनेक बदल आणि ट्विस्ट असणार आहेत. रश्मी शर्मा टेलिफिल्म्स निर्मित या मालिकेचा दुसरा सिझन 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पाहूयात मालिकेत काय काय असणार 

अहमचा असणार डबल रोल

या मालिकेत मोहम्मद नाजिम म्हणजेच अहमचा डबल रोल असणार आहे. दोन भूमिका साकारता येत असल्यामुळे अभिनेता मोहम्मद नाजिम या मालिकेबाबत फारच उत्सुक आहे. या मालिकेत मोहम्मद अहम आणि जग्गी या दोन्ही भूमिका साकारणार आहे. अहम सारख्याच दिसणाऱ्या जग्गीला या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्येही दाखवण्यात आलं होतं. मात्र आता या सिझनमध्ये या दोन भूमिकांवर आधारित कथा गुंफण्यात आलेली आहे. याबाबत मोहम्मद नाजिमने शेअर केलं की “मला अहम आणि जग्गी या दोन्ही भूमिका साकारण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या शेड्स आणि लेअर्स आहेत. म्हणूनच मला या दोन्ही भूमिका साकारणं नक्कीच आवडत आहे.  कारण ते दोघं जरी एकसारखे दिसत असले तरी त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, काम करण्याची पद्धत आणि त्यांची नाते निभावण्याची स्टाईल एकमेकांपासून खूप वेगळी आहे. ज्यामुळे मला एकाच वेळी या दोन्ही भूमिका साकारताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मला याचा विश्वास आहे की अहमप्रमाणेच जग्गीची भूमिकाही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मला नेहमीच दुहेरी भूमिका साकारण्याची इच्छा होती. पहिल्या  सिझनमध्ये मला काही काळासाठी ती संधी मिळाली होती. मात्र आता दुसऱ्या सिझनमध्ये या दोन भूमिका साकारायला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकांचे प्रेम या मालिकेला आणि या दोन्ही भूमिकांना मिळावे अशी माझी अपेक्षा आहे. या दोन भूमिकांमधून आता या मालिकेत काय काय नवे ट्विस्ट निर्माण होतात ते पाहण्यासाठी प्रेक्षकही तयार आहेत.  आमच्या शूटिंगला सुरूवात झाली असून नव्या उत्साहात आम्ही पुन्हा एकदा प्रेश्रकांच्या भेटीसाठी आतूर झालेले आहोत”  

साथ निभाना साथिया 2 मधील इतर भूमिका

या मालिकेत गोपीची भूमिका साकारणारी देवोलिना भट्टाचार्य आणि कोकिलाबेन साकारणारी रूपल पटेल पुन्हा या सिझनमध्ये दाखवण्यात येणार आहेत. नुकताच देवोलिना भट्टाचार्यने तिच्या सोशल मीडिया  अकाऊंटवर कोकिलाबेन सोबत काम करत असलेले सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक झाले आहेत. या फोटोला तिने कॅप्शन दिली आहे की, “स्वागत नही करोगे हमारा” आता या मालिकेत काय काय नवीन पाहायला मिळणार हे मालिका सुरु झाल्यावरच समजेल. पण गोपी बहू, कोकिलाबेन आणि अहमच्या चाहत्यांसाठी ही एक नक्कीच चांगली बातमी आहे.