मोहित मलिक त्याच्या आगामी मालिकेसाठी शिकतोय 'ही' भाषा

मोहित मलिक त्याच्या आगामी मालिकेसाठी शिकतोय 'ही' भाषा

मालिका आणि प्रेक्षकांचे एक अतूट नाते असते. त्यामुळे निरनिराळ्या वाहिन्या प्रेक्षकांशी हे नातं जपण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. जुन्या मालिकांचा टीआरपी वाढवण्यासोबतच प्रेक्षकांची नवीन मालिकांची मेजवानी ते सतत देत असतात. एखादी नवी मालिका किती लोकप्रिय होणार हे त्यात असलेल्या कलाकारांवर अवलंबून असते. त्यामुळे या मालिकांमधील कलाकारही आपली पात्र हुबेहुब निभावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. हिंदी मालिकांमधील सर्वांचा आवडता अभिनेता मोहित मलिक आता त्याच्या नव्या मालिकेसाठी चक्क एक नवीन भाषा आत्मसात करत आहे.

काय असणार या नव्या मालिकेत

लवकरच स्टार प्लस या लोकप्रिय वाहिनीवर एक नवी कोरी प्रेम कथा दाखवली जाणार आहे. या आगामी मालिकेचं नाव लखनऊ की लव्ह स्टोरी असं असून ही मालिका 31 ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेमध्ये रोमांस आणि ड्रामा अशी मिश्र फोडणी असणार आहे. लखनऊ की लव्ह स्टोरी ही प्रयागराज भुमीवरील प्रेमकथा आहे. ज्यामध्ये मोहित मलिक (ध्रुव) तर सना सैयद (सोनम) या  लव्ह बर्डसची भूमिका साकारणार आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रभावित तर करेलच शिवाय ही प्रेमकथा इतर कथांपेक्षा नक्कीच वेगळी असेल. 

मोहित मलिक यासाठी शिकतोय ही भाषा

हिंदी मालिकांमध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारा मोहित मलिक या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका लखनऊमधील असल्यामुळे यासाठी मोहितला त्याच्या भाषेत खूप बदल करावा लागणार आहे. या मालिकेसाठी सध्या तो अलाहबादी भाषा शिकत आहे. मोहितच्या मते ही भाषा त्याच्यासाठी नवीन नाही. कारण त्याला याआधी ही भाषा येत होती. मात्र कोणत्याही भाषेत एखादी भूमिका करण्यासाठी त्या भाषेतील बारकावे शिकणे गरजेचं असतं. म्हणूनच त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने या भाषेचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.  मोहितला जेव्हाा या मालिकेची ऑफर मिळाली तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं. लॉकडाऊनच्या काळात घरी असताना त्याने वेळेचा सदुपयोग करत ही भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या स्क्रिप्ट राईटरसोबत ऑनलाईन वर्क शॉप्स करत होता. ज्यामुळे या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याला पुरेसा वेळ नक्कीच मिळाला आहे. सहाजिकच मोहितला या नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणारच. मोहित मलिकने यापूर्वी कुल्फी कुमार बाजावाला, डोली अरमानो की, बनू में तेरी दुल्हन, मिली, मन की आवाज प्रतिज्ञा, फुलवा, परि हू में, सुर्या गी सुपर कॉप अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्याच्या फिटनेस आणि लुक्समुळे तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. 

या मालिकेत आहेत आणखी कोणकोण कलाकार

लखनऊ की लव्ह स्टोरीमध्ये मोहित मलिकसोबत सना सैयद, विजय त्यागी, जयति भाटिया, दीपिका उपाध्याय, आशुतोष तिवारी, राकेश कुकरोती, कशिस दुग्गल, अनन्या खरे आणि नाजिया हसन हे कलाकार असणार आहेत. लॉकडाऊननंतर आता शूटिंगला पुन्हा नव्याने सुरूवात झाल्याने या सर्व कलाकारांची नवी कोरी मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर झाले आहेत. मोहितने एवढी मेहनत घेतल्यावर आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनात उतरते का हे मालिका सुरू झाल्यावरच समजेल.