नेहा कक्करला पु्न्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

नेहा कक्करला पु्न्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

नेहा कक्कर तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. नेहा तरूण मनावर अधिराज्य गाजवणारी सध्याची एक लोकप्रिय गायिका आहे. शिवाय सोशल मीडियावरही नेहा खूपच अॅक्टिव्ह आहे. तिचा चाहतावर्गही तिला सोशल मीडियावर सतत फॉलो करत असतो. नुकतंच नेहाने सोशल मीडिया स्टोरीतून तिच्या लग्नाबाबत एक हिंट तिच्या चाहत्यांसाठी दिली आहे. ज्यामुळे नेहा कक्करचं लग्न हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नेहाला तिच्या इन्स्टा स्टोरीमधून काय सांगायचं आहे -

नेहा कक्करने तिच्या एका इंन्स्टा स्टोरीमध्ये पंजाबी भाषेत लिहीलं होतं की, "चल लग्न करू या... लॉकडाऊनमुळे कमी होणार आहे खर्च" तिच्या या टेक्स्ट स्टोरीमुळे चाहत्यांना वाटलं नेहाने तिच्या लग्नाची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. तिला लॉकडाऊनमध्ये खर्च कमी करण्यासाठी लग्न करायचं आहे असाही काहींनी अर्थ लावला होता. मात्र नेहा नेमकं कोणाशी लग्न करणार हे मात्र कुणाला कळत नव्हतं. त्या लकी व्यक्तीचं नाव जाणून घेण्यासाठी चाहते तिला कंमेट करू लागले आणि नेहाच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरू झाली. 

नेहाचा प्रमोशल फंडा

नेहाच्या या पोस्टनंतर ती खरोखर लग्न करत नसून हे तिच्या 'डायमंड दा छल्ला' या नव्या गाण्यातील हे बोल आहेत हे लवकरच चाहत्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. सध्या नेहाचं हे नवं गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. “आ चल व्याह करीए...लॉकडाऊन विच कट होने खर्चे…”  नेहाच्या या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. नेहा नेहमी तिच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी अशी काहीतरी शक्कल लढवत असते. जोपर्यंत नेहा खरोखरंच लग्न करत नाही तोपर्यंत प्रमोशनसाठी तिचं लग्न हा एक सोपा मार्ग तिच्याजवळ आहे. नेहाचं डायमंड दा छल्ला हे गाणं 26 ऑगस्टला रिलीज झालं आहे. नेहाने स्वतःच डान्स आणि अॅक्टिंग करत हे गाणं गायलं आहे. तिच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यावरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे. हे गाणं तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचावं यासाठी नेहाने निरनिराळ्या प्रकारे त्याचं प्रमोशन सुरू केलं आहे. 

सोशल मीडियावरील नेहाच्या फॉलोव्हर्सचा आकडा ऐकून व्हाल थक्क

नेहाचे आतापर्यंत इंन्साग्राम अकाउंटवर जवळजवळ 40 कोटी फॉलोव्हर्स आहेत. सहाजिकच या सर्व फॉलोव्हर्सपर्यंत नेहाला हे गाणं पोहचवायचं  आहे. लॉकडाऊनच्या काळातही तिने निरनिराळ्या पद्धतीने चाहत्यांचे निखळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला होता. आता तर लॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्या चाहत्यांसाठी नेहाने स्पेशल गाणंच तयार केलं आहे. नेहा काही वर्षांपूर्वी हिमांशू कोहलीला डेट करत होती. त्या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मात्र त्याच्यासोबत असलेले तिचं अफेअर आणि ब्रेकअप दोन्हीही खूपच गाजलं होतं. या प्रसिद्धीचा नेहाला तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये फायदा झाला होता. त्यानंतर ती तिच्या गाण्यांच्या प्रमोशनसाठी याच गोष्टीचा वापर सतत करताना आढळून येते. मागच्या वर्षी ती आदित्य नारायण याच्यासोबत लग्न करणार अशी चर्चा होती. मात्र हा तिचा गाण्याचे प्रमोशन आणि शो ला टीआरपी मिळवण्याचा एक फंडा आहे हे लवकरच प्रेक्षकांच्या  लक्षात आलं होतं. आता पुन्हा या गाण्यामुळे नेहाचं लग्न हा विषय चर्चेत आहे.