पुन्हा डेट करत असल्याच्या अफवेवर नेहा कक्कर भडकली

पुन्हा डेट करत असल्याच्या अफवेवर नेहा कक्कर भडकली

बॉलीवूडची सिंगिंग क्वीन असणारी नेहा कक्कर सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी अॅक्टिव्ह असल्याने तिची चर्चा चालू असते. पण नेहा सध्या काही कारणाने त्रस्त आहे. तिला सोशल मीडियावर सतत ट्रोल करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी नेहाचं अभिनेता हिमांशु कोहलीबरोबर ब्रेकअप झालं होतं.  त्यावरून तिला ट्रोल करण्यात येत होतं. तर आता तिचं ‘इंडियन आयडॉल’फेम गायक विभोर याच्यासह लिंकअप करण्यात येत असून ट्रोल करण्यात येत आहे. 

बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा

नेहा ट्रोलर्सवर भडकली

Instagram

या सगळ्या लिंकअप आणि ट्रोलिंगवर शेवटी नेहाने वक्तव्य केलं असून तिने सोशल मीडियावर एक मोठी पोस्टच शेअर केली आहे. नेहा या सगळ्या प्रकरणावर चिडली असून तिने आपलं मत यातून व्यक्त केलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत नेहाने आपल्याला नक्की काय वाटतं हे सांगतिलं आहे. नेहाने लिहिलं आहे की, ‘हे सर्व लिहायला मला अजिबात आवडत नाहीये. ना मी शारीरिकरित्या व्यवस्थित आहे ना मानसिकरित्या. पण मला हे बोलावं लागत आहे. मी पण कोणाची तरी बहीण अथवा मुलगी आहे याचं लोकांना भान नाही का? मी माझं पूर्ण आयुष्य मेहनतीने घालवलं आहे. जेणेकरून मी माझ्या कुटुंबासाठी काही चांगलं करू शकेन त्यांना अभिमानित करू शकेन तसंच त्यांच्याबरोबर त्या व्यक्तींसाठीही काही करू शकेन जे माझ्या कुटुंबाचा भाग नाहीत.’ तर पुढे दुसऱ्या स्लाईडमध्ये नेहाने लिहिलं की, ‘कोणताही विचार न करता लोक कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवात ज्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. मग एक सेलिब्रिटी असले तरीही. सेलिब्रिटी असले तरीही मी एक माणूस आहे. दगडाच्या काळजाचे होऊ नका. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल बोलणं बंद करा. कोणाच्याही चारित्र्यावर बोलण्याचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाही. कोणालाही जज करणं बंद करा आणि कोणालाही इतकंही ट्रोल करू नका की, त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या आयुष्यावर होईल. तुम्ही कोणाचे वडील आणि भाऊ आहात, तुम्हीही तुमच्या मुलगी अथवा बहिणीबरोबर असंच कराल का?’ असा संतप्त सवाल करत तिने तिसऱ्या स्लाईडमध्ये लिहिलं की, तिच्याजवळ देव आहे आणि देवासारखं कुटुंबही आहे. 

गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण

गायक विभोरबरोबर जुळवलं होतं नातं

काही दिवसांपूर्वीच नेहा आणि विभोर पराशर या दोघांचं नाव जोडण्यात आलं होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत होतं. या दोघांचे सोशल मीडियावरील फोटो पाहून असा अंदाज काही लोकांनी व्यक्त केला होता. एका कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं. पण नेहा आणि विभोर या दोघांनीही ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. नेहा हिमांशूपासून वेगळी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तिने याआधी म्हटलं होतं. तसंच हिमांशूच्या बाबतीतील नेहाने उचललेलं पाऊल बऱ्याच जणांना आधी पटलं नव्हतं. त्यावरूनही तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. तर हिमांशूने कधीही याबाबतीत कोणतंही वक्तव्य केलं नाही. नेहाने ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर मन मोकळं केलं होतं. पण त्यानंतर ती आपली सर्वात मोठी चूक होती असंही तिने म्हटलं होतं.

नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल