या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले विषय आणि अभिनय असणारे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. विकी कौशल आणि यामी गौतमचा ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई थांबलेली नाही. रेकॉर्डतोड कमाई करत या चित्रपटाने आतापर्यंत 189.7 कोटीचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने याबाबतीत ट्विट करून माहिती दिली आहे. तरण आदर्शने संपूर्ण आकड्यांची माहिती दिली आहे. या आकड्यांनुसार उरीने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्याचं स्पष्ट होत आहे. ‘How’s the Josh, High Sir’ सारख्या संवादाने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतलेल्या या चित्रपटाची चर्चा अजूनही प्रेक्षकांमध्ये सुरु आहे. शिवाय विकी कौशलच्या कामाचीच सध्या सगळीकडे चर्चा असून विकीचा बोलबाला आहे असं म्हटल्यास, वावगं ठरणार नाही.
तरणने ट्विटरवर सांगितली उरीची कमाई
तरण आदर्शने आपल्या ट्विटर अकाऊंटवर उरी चित्रपटाचे आकडे शेअर करत सांगितले की, चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 71.26 कोटी, तर दुसऱ्या आठवड्यात 62.77 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 37.06 कोटी आणि चौथ्या आठवड्यामध्ये 18.67 कोटीची कमाई करत एकूण 189.7 कोटीचा गल्ला जमवला आहे. चौथ्या आठवड्यात 18 कोटीपेक्षा जास्त कमाई करून उरीने इतिहासच रचला आहे. शिवाय हा चित्रपट लवकरच 200 कोटीचा टप्पा पार करेल असंही तरणने स्पष्ट केले आहे. या चित्रपटाने एक बेंचमार्क बनवला असल्याचं त्याने म्हटलं आहे. आजपर्यंत देशभक्तीपर अनेक चित्रपट आले पण उरी इतकी कमाई कदाचित कोणत्याही चित्रपटाला मिळवता आलेली नाही. शिवाय या चित्रपटातील कथा ही वास्तवातील असल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी लगेच जोडले गेले आणि नक्की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय झालं होतं हे पाहण्याची उत्सुकतादेखील प्रेक्षकांना होती. केवळ देशभक्तीच नाही तर देशाचे जवान देशासाठी काय करतात हे अगदी योग्य तऱ्हेने या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. शिवाय जवान हे देशासाठी किती महत्त्वाचे असतात हेदेखील आपल्या शत्रूराष्ट्राला योग्य तऱ्हेने या सर्जिकल स्ट्राईकद्वारे भारताने दाखवून दिले होते.
#UriTheSurgicalStrike biz at a glance…
Week 1: ₹ 71.26 cr
Week 2: ₹ 62.77 cr
Week 3: ₹ 37.06 cr
Weekend 4: ₹ 18.67 cr
Total: ₹ 189.76 cr
India biz.
BLOCKBUSTER.— taran adarsh (@taran_adarsh) February 4, 2019
‘उरी’ मध्ये दिसला देशभक्तीचा जोश
काश्मीरमधील उरीच्या बेस कँम्पवर हमला करत आतंकवाद्यांनी 18 डिसेंबर, 2016 रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये भारतातील 19 जवान शहीद झाले होते. पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा आपल्या देशातील जवानांवर केलेल्या अशा भ्याड हल्ल्यामुळे पेटून उठली होती आणि यानंतरच सर्जिकल स्ट्राईकचं पाऊल उचलण्यात आलं. शहीद झालेल्या जवांनांचा बदला या सर्जिकल स्ट्राईकमधून भारताने घेतला होता. देशाच्या या ऐतिहासिक निर्णयावरच हा चित्रपट बनवण्यात आला. ‘उरी’ने पहिलं ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकायला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये विकी कौशलबरोबरच यामी गौतम, परेश रावल आणि टीव्ही अभिनेता मोहित रैना यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं असून आता आदित्य धरकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उरी हा देशभक्तीपर चित्रपट असला तरीही प्रत्येक भारतीयामध्ये जोश निर्माण करणारा चित्रपट आहे. यामध्ये विकी कौशलने अप्रतिम अभिनय केला असून प्रत्येक स्तरावर त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
सामान्य माणसाला पॉवर देणार ‘डोंबिवली रिटर्न्स’
‘आलियाबरोबरच्या नात्यात खूप चढउतार होते’ – सिद्धार्थ मल्होत्रा
तैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय