आणि काय हवं.. म्हणतेय प्रिया आणि उमेशची जोडी

आणि काय हवं.. म्हणतेय प्रिया आणि उमेशची जोडी

रिअल लाईफ कपल जेव्हा रीलमध्येही एकत्र येतात तेव्हा त्यांना पाहणं पर्वणी असतं. असंच काहीसं आहे मराठीतील लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामतबद्दल. तब्बल सात वर्षानंतरही ही जोडी ‘आणि काय हवं’ या रोमँटीक वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. याबद्दलची पोस्टही उमेशने इन्स्टावर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, ‘7 वर्ष वाट पाहावी लागली या अभिनेत्रीसोबत काम करायला.... तेवढीच वर्ष लागली अनिश जोग आमि रणजीत गुगले यांच्यासोबत काम करायला. हा योग जुळवून आणला मुरांब्यासारख्या गोड वरूण नार्वेकरने आणि काय हवं?...’ तर प्रियानेही या वेबसीरिजचं ट्रेलर ‘लऽऽऽऽऽय excited!’ असं म्हणत शेअर केलंय.

वेबसीरिजचा जमाना

View this post on Instagram

No caption needed ❤️

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

प्रियाला वेबसीरिज हे माध्यम नवं नाही. कारण तिने नुकतंच सिटी ऑफ ड्रीम्स या दिग्दर्शक नागेश कुकूनूरच्या वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. पण उमेशची मात्रही पहिलीच वेबसीरिज आहे. याबाबत उमेश कामत याने सांगितलं की, ‘आता वेबसीरिजचा जमाना आहे. वेळेनुसार मनोरंजनाच्या साधनांमध्ये बदल होत आहे. आजच्या काळात आयुष्य खूपच बिझी झालं आहे. कमी वेळामुळे आता वेबसीरिजचं चलन वाढलं आहे.’ त्यामुळे आश्चर्य नाही की, या जोडीने ही संधी मिळताच ती स्वीकारली. 

जुई आणि साकेतची जोडी

या वेबसीरिजमध्ये एका नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये जुई आणि साकेतचं लग्न होतं. लग्नानंतर या दोघांमध्ये छोटी-मोठी भांडण होत राहतात. बायकोचं नवऱ्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलणं, नवऱ्याचं बायकोला बोलणं, पहिल्या सणांचा उत्साह, घरातील नव्या वस्तूंची एकत्र केलेली खरेदी आणि नवविवाहीत कपलमधील अशा छोट्या पण अनमोल क्षणांना या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. एका साधारण कपलशी निगडीत कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तसंच मुख्य म्हणजे हे दोघंही जण एकमेकांबाबतच्या जुन्या गोष्टीही यात शेअर करतात. ज्यामुळे नात्यात दुरावाही येत नाही. कारण दोघांचंही असं म्हणण असतं की, नातं जितकं पारदर्शक असेल तितकं ते मजबूत असतं. या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीला सुंदर पद्धतीने सादर करण्यात आलंय.

सात वर्षानंतर पुन्हा एकत्र

या दोघांची जोडी 'टाईम प्लीज' या मराठी चित्रपटानंतर म्हणजेच तब्बल सात वर्षानंतर एकत्र वेबसीरिजमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार या वेबसीरिजबाबत उत्सुक आहेत. या वेबसीरिज दिग्दर्शन वरूण नार्वेकरने केलं असून निर्मिती अनिश जोग यांची आहे. या वेबसीरिजमध्ये तब्बल 6 एपिसोड असून ही वेबसीरिज 16 जुलैपासून पाहता येईल.