प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज

प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज

प्रियांका चोप्राचे बॉलीवूड आणि हॉलीवूड असे जगभरात चाहते आहेत. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांकने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर नुकतीच तिने तिच्या  करिअरची वीस वर्षे यशस्वीपणे पूर्ण देखील केली आहेत. विश्व सुंदरी ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांकाचा प्रोफेशनल प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. या प्रवासाचं वर्णन करणारं आत्मचरित्र लवकरच प्रसारित केलं जाणार आहे. प्रियांकाच्या या आत्मचरित्राचं नाव ‘अनफिनिश्ड’ असून तिने त्याची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

नवीन वर्षी प्रकाशित होणार आत्मचरित्र

प्रियांकाने नुकतंच तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने तिच्या आत्मचरित्राची जॅकेट कॉपी हातात घेत एक फोटो तिच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबत तिने शेअर केलं आहे की, " जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचं पुस्तक हातात घेता तेव्हाच्या भावना, मी मस्करी करत आहे, कारण आता माझ्या हातात फक्त माझ्या पुस्तकाचं जॅकेट आलं आहे. जे काही दिवसांमध्ये माझ्या आत्मचरित्रावर गुंडाळलं जाईल. मी फक्त अनुभवत होती की पुस्तक हातात घेतल्यावर मला नेमकं कसं वाटेल. खरंतर आता वाट पाहणं खूप कठीण झालं आहे, माझं पुस्तक पुढच्या महिन्यात लॉंच होत आहे. मात्र तुमची कॉपी तुम्ही आधीच बूक करून ठेवू शकता" यासाठी प्रियांकाने तिचं पुस्तक बुक करून ठेवण्यासाठी बायोलिंकमध्ये डिटेल्स शेअर केले आहेत.

या वर्षी ऑगस्टमध्ये प्रियांकाने तिचं आत्मचरित्र लिहून पूर्ण केलं होतं. त्यावेळी देखील तिने पुस्तकाचं एक रफ मुखपृष्ट चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. सोबत तिने लिहीलं होतं की, "पूर्ण झाले...पहिल्यांच या शब्दांना कागदावर छापलेलं पाहणं  किती अद्भूत भावना आहे. #Unfinished  लवकरच येत आहे" प्रियांकाचे आत्मचरित्र पेंग्विन पब्लिकेशन प्रकाशित करत आहे. प्रियांका च्या मते तिच्या आत्मकथेत ते सर्व काही असेल जे तिने जगलं, आचरणात आणलं आणि तिला प्रेरणादायी ठरलं. त्यामुळे ते इतरांसाठीही प्रोत्साहन देणारं ठरेल. तिच्या मते तिच्या आयुष्यात असं बरंच काही घडलं आहे जे चाहत्यांना सविस्तर वाचायला आवडेल. कारण प्रियांकाने वयाच्या सतराव्या वर्षीच मनोरंजन विश्वात आपलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती  मिस इंडिया झाली आणि तिचा प्रवास बॉलीवूड पासून पार सातासमुद्रापार हॉलीवूडपर्यंत झाला. या क्षेत्रात नवीन येणाऱ्या लोकांसाठी हा प्रवास आत्मचरित्राच्या माध्यमातून अनुभवणं हे नक्कीच प्रेरणादायी असू शकतं. मात्र यात तिने नेमके काय आणि कोणते खुलासे केले आहेत ते पुस्तक प्रकाशित झाल्यावरच समजेल. कारण तिच्याही आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्याचा परिणाम तिच्यासोबत अनेकांच्या आयुष्यावर झाला होता.

प्रियांका आणि निकच्या नात्याला झाली दोन वर्षे पूर्ण

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने प्रियांकाने तिच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. प्रियांकाने 2018 साली डिसेंबर महिन्यात निक जोनससोबत हिंदू आणि ख्रिस्चन पद्धतीने विवाह केला होता. हा विवाहसोहळा कुटुंबिय आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत जोधपूरच्या उमेद भवनमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता.