मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी नुकताच हृदयसम्राट बाळासाहेबांचा एक किस्सा शेअर केला. बाळासाहेबांना कलेबद्दल असणारं प्रेम आणि कलावंताचं कौतुक याबाबतचा हा किस्सा. वाचा हा बाळासाहेबांबाबतचा अनोखा किस्सा.
आवाजातील जरब…मोडेन पण वाकणार नाही हा बाणा आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम या गोष्टींमुळे बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल मला खूपच कुतूहल होते,पण कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. 2007 मध्ये माझ्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमाचा पहिला शो पुण्यात झाला आणि दुसरा मुंबईत. हा शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांमधून त्याच्या बातम्या आणि फोटो छापून आले. ‘सामना’ पेपरमध्ये पहिल्याच पानावर मोठा फोटो आणि ठळक बातमी आली.ते पाहून मलाही आनंद झाला. तीन-चार दिवसांनी मला ‘मातोश्री’वरून फोन आला. “साहेबांनी भेटायला बोलावलंय”. मी जरा गोंधळून विचारलं, “कोणत्या साहेबांनी बोलावलंय”? उत्तर मिळालं. “बाळासाहेबांनी बोलवलंय” असं उत्तर ऐकूनच हातातील फोन खाली पडायचा बाकी होता. मी त्यावेळी पुण्यात होतो,काम असेल त्याचवेळी मुंबईला येत असे. मुंबईला गेल्यावर बाळासाहेबांना भेटायचं ठरलं.
मातोश्रीवर जाण्याची माझी पहिलीच वेळ
मातोश्रीवर जाण्याची माझी पहिलीच वेळ, लिफ्टमधून वरती जाताना एक धाकधूक होती. बाळासाहेबांनी आपल्याला का बोलवलंय,आपल्या हातून काही चूक तर झाली नाही ना? असे अनेक प्रश्न माझे मलाच पडलेले, दरवाजातून आत गेल्यावर “या टिळेकर” या खणखणीत आवाजाने माझं स्वागत झालं. समोर खुर्चीत बसलेले बाळासाहेब दिसले. मी वाकून नमस्कार केल्यावर पाठीवर आशिर्वादाची थाप पडली. “छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदर तहाच्या वेळी मदत करणाऱ्या काही लोकांमध्ये टिळेकरांचा उल्लेख आहे, ते टिळेकर कोण तुमचे” असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारल्यावर “ते आमचे पूर्वज आहेत”, असं मी उत्तर दिलं. त्यावर हजरजबाबी बाळासाहेब बोलले “तरीच एवढ्या सगळ्या हिरॉईन्स एकत्र आणून कार्यक्रम करण्याचं धाडस केलं तुम्ही. सामनात तुमच्या कार्यक्रमाचा फोटो पाहिला तेव्हा वाटलं कोण आहे हा मराठी माणूस. जो एवढ्या सगळ्यांना एकत्र आणून कार्यक्रम करतो. तुमचं कौतुक वाटलं म्हणून बोलावलं भेटायला”.
कलाकारांबद्दल बाळासाहेबांना असणारं प्रेम
कलाकारांबद्दल बाळासाहेबांना असणारं प्रेम ऐकून होतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. ओळख नसतानाही,माझ्यासारख्या एखाद्या नवीन कलाकाराला बोलावून त्याच्या कामाचं कौतुक करायला फक्त नावानं, कर्तुत्ववानं मोठं असून उपयोगाचं नाही. तर त्यासाठी मोठया हृदयाचा माणूस असणंही गरजेचं आहे. तसे बाळासाहेब होते म्हणूनच त्यांना हृदयसम्राट म्हणतात. माझी इतर चौकशी केल्यावर मनमोकळ्या गप्पा सुरू असताना त्यांच्या घरातील ‘थापा’ या इसमाने चहा,खाण्याचे पदार्थ आणून समोर ठेवले. “घ्या टिळेकर”, असं बाळासाहेब म्हणाले. पण साहेबांशी बोलण्यातच इतका आनंद मिळत होता की, काही खाण्याची इच्छाच राहिली नाही. मी काही नको म्हटल्यावर “तुम्ही पुणेकर असून लाजताय कसले, पुणेकर…. असतात ना? चहा तरी घ्याच. मी पुणेकरांसारखं चहा घेणार का असं खवचट विचारलं नाही, चहा ‘घ्याच’ म्हणालोय. तुम्हाला आवडतो ना चहा की सिनेमा लाईनमधले आहात म्हणून बाकीचे पेय आवडतात? साहेबांचे हे बोलणे ऐकून इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू बाहेर आलं आणि मग माझ्याबरोबर साहेबपण हसू लागले. दिलखुलास बाळासाहेब पाहून नकळतपणे त्यांच्या भेटण्याआधी जी भीती होती ती कुठल्या कुठे निघून गेली.
त्या भेटीनंतर माझं ‘मराठी तारका’ पुस्तक भेट म्हणून देण्यासाठी आमच्या मराठी तारका टीमला घेऊन मी पुन्हा एकदा बाळासाहेबांना भेटलो. तेव्हाही त्यांनी सगळ्यांचे कौतुक केलं आणि तुमचं मराठी तारका पुस्तक माझ्या कलेक्शनमध्ये नव्हतं, बरं झालं तुम्ही ते दिलं, असं ते म्हणाले. मराठीतील पहिल्या अभिनेत्रीपासून पुढच्या सगळ्या पिढीच्या अभिनेत्रींची माहिती, दुर्मिळ फोटो पुस्तकात होते. ते सगळं वाचून पुन्हा साहेबांनी न विसरता माझे कौतुक केलं. पुन्हा पुन्हा आमची भेट होत राहिली. दरवेळी भेटायला गेल्यावर ते विविध पदार्थ खाऊ घालायचे. तारका शो ची प्रगती सुरू होती. त्यावेळी मुंबईत माझे आणि आमच्या टीममधील काही कलाकारांचे स्वतःचे घर नव्हते. शासनाकडून आम्हाला घर मिळावे, यासाठी बाळासाहेबांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. पण प्रयत्न करून चकरा मारूनही काम झाले नाही. बाळासाहेबांना एकदा भेटल्यावर मी हे सांगितले. तेव्हा त्यांच्या ठाकरे शैलीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचा तो बिनधास्तपणा मात्र मला आवडला. सिनेमा,नाटक,साहित्य, खेळ असं विविध गोष्टीबद्दल त्यांना असलेली आवड आणि ज्ञान, त्यांना भेटताच जाणवायचे. बोलताना मध्येच ते ज्या स्टाईलमध्ये इंग्लिश बोलत ते पाहून भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व जाणवायचं. ‘वन रूम किचन’ हा माझा सिनेमा त्यांनी टीव्हीवर अर्धाच पाहिला होता म्हणून सिनेमाची डीव्हीडी द्यायला मी गेलो. जाताना माझ्याबरोबर साहेबांना भेटायची इच्छा असलेले विजू खोटे, आशालता,अभिजित यांनाही घेऊन गेलो. तेव्हा आमची गप्पांची मस्त मैफल रंगली होती.
प्रयत्न करून शेवटी एकदाचे 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून घर मिळाले. माझ्याबरोबर इतर कलाकार,तंत्रज्ञ असे मिळून 11 कलाकारांनाही मी माझ्या प्रयत्नाने मुंबईत लोखंडवाला इथं घरं मिळवून दिली. बाळासाहेबांना ही बातमी सांगितल्यावर त्यांनाही आनंद झाला. “टिळेकर तुम्ही फक्त स्वतःचा फायदा न बघता तुमच्या बरोबरच्या इतर कलाकारांनाही घर मिळवून दिलीत. हे मोठं काम केलं. यातले कुणी तुम्हाला नंतर टिळा लावणार नाही याची फक्त खबरदारी घ्या”. अभिनंदन करीत मोलाचा सल्ला देत बाळासाहेबांनी काही मदत लागली तर बिनधास्त सांगायचं, असंही आपलेपणाने सांगितलं. घरासाठी कलाकार म्हणून कर्ज मिळायला अडचण येत असताना बँकेच्या संचालकांना बाळासाहेबांनी शिफारस करून माझी अडचण दूर केली.
अडचणीच्या वेळी कलाकारांना असं हक्काने मदतीचा हात देणारे बाळासाहेब ठाकरे फक्त हृदयसम्राट नव्हते तर’दिलदार’ही होते.