राजकुमार राव पहिल्यांदाच साकारणार सायको किलरची नकारात्मक भूमिका

राजकुमार राव पहिल्यांदाच साकारणार सायको किलरची नकारात्मक भूमिका

गेल्या कित्येक दिवसांपासून कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विवादांमध्ये अडकला आहे. मात्र निर्माती एकता कपूरने हे विवाद मिटवण्याचं काम केलं असून आता हा चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच यामधील राजकुमार रावची नक्की भूमिका काय आहे हे समोर आलं आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर या चित्रपटाचे अनेक पोस्टर्सही समोर आले जे अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे ही उत्सुकता नक्कीच ताणली गेली. यामध्ये नेमकी कंगना आणि राजकुमार रावची काय भूमिका असेल याचाही अंदाज बांधण्यास प्रेक्षकांनी सुरुवात केली होती. 

पहिल्यांदाच राजकुमार साकारणार नकारात्मक भूमिका

Instagram

राजकुमार रावने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. त्याने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या असून पहिल्यांदाच राजकुमार नकारात्मक भूमिका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात एका सायको किलरची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे. या चित्रपटाचं ट्रेलर 19 जूनला प्रदर्शित होणार होतं. पण चित्रपट बऱ्याच कारणांनी विवादात अडकल्यामुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली.

काय झाले वाद?

Instagram

निर्माती एकता कपूरच्या या चित्रपटाच्या नावावर आणि पोस्टर्सवर डॉक्टर्सने विरोध दर्शवला आहे. ‘इंडियन सायकॅट्रिक सोसायटी’ (आयपीएस) यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला असून सीबीएफसीला पत्र लिहून डॉक्टर्सने कंगना राणौत आणि राजकुमार राव यांनी अभिनय केलेल्या ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या पोस्टर्समधून मनोरूग्णांना चुकीच्या तऱ्हेने प्रेक्षकांसमोर आणण्यात येत आहे असं सांगितलं होतं. त्यावरून या चित्रपटाचं नाव बदलण्याचं फर्मान निर्मात्यांना देण्यात आलं होतं. पण अजूनही याबाबत काही घडलं नाही. तर दुसरा वाद हृतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर 30’ देखील याच तारखेला प्रदर्शित होणार होता. पण कंगना आणि हृतिकचा वाद पुन्हा यावरून चिघळला आणि हृतिकला आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलावी लागली. 

राजकुमार आणि कंगना ही जोडी पुन्हा एकत्र

राजकुमार आणि कंगना या जोडीने यापूर्वी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी आधीही पाहिली आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. मात्र याआधी या चित्रपटासाठी करिना कपूरला विचारण्यात आलं होतं. पण यातील बोल्ड सीनमुळे करिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर कंगनाला या चित्रपटाची विचारणा झाली. कंगना नेहमीच वेगळ्या भूमिकांना प्राधान्य देते. त्यामुळे या चित्रपटामध्ये आता ही जोडी काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 

कंगनाची भूमिका खास

राजकुमार रावप्रमाणेच या चित्रपटामध्ये कंगनाचीही खास भूमिका आहे. कंगनाला या चित्रपटामध्ये मानसिक रूग्ण दाखवण्यात आलं आहे. पोस्टर्समध्ये हे दोन्ही कलाकार अतिशय प्रभावी दिसून येत आहेत. या चित्रपटात कंगना आणि राजकुमार व्यक्तिरिक्त अभिनेत्री अमायरा दस्तूरचीही महत्त्वाची भूमिका आहे. ज्यासाठी तिने आपल्या भावाची मदत घेतली आहे. पण नेहमीप्रमाणे या चित्रपटाच्या कथा अथवा अन्य कोणत्याही गोष्टीबाबत जास्त चर्चा झालेली नाही. बऱ्याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ही जाणून राहिली आहे.