रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे. कधीकाळी या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. शिवाय या दोघांची केमिस्ट्री इतकी चांगली आहे की, त्यानी केलेला प्रत्येक चित्रपट गाजला आहे. आता पुन्हा एकदा या दोघांना चित्रपटामध्ये एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. बचना ए हसीनो, ये जवानी है दिवानी आणि तमाशा या चित्रपटांमध्ये अफलातून काम केल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या जोडीने खास जागा निर्माण केली. रणबीरने दीपिकाला सोडून कतरिनाचा हात धरला आणि त्यानंंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली. पण त्यातूनही बाहेर पडत तिने आपलं करिअर एका उंचीवर नेलं आणि तिला त्यामध्ये साथ दिली ती रणवीर सिंगने. इतकं असूनही दीपिकाने कधीही रणबीरबद्दल मनामध्ये कोणताही कडवटपणा न ठेवता व्यावसायिकदृष्ट्या नेहमीच रणबीरबरोबर काम केलं. त्यांचं नातं तुटलं असलं तरीही ते दोघं आजही चांगले मित्र आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही जोडी पाहायला मिळणार आहे. या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यायचा निर्णय घेतला आहे.


deepika ranbir
दीपिका आणि रणबीर करणार एका ब्रँडसाठी जाहिरात


चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहायचं हे जरी खरं असलं तरीही त्यांना चित्रपटासाठी नक्कीच थांबावं लागणार आहे. दीपिका आणि रणबीर हे पुन्हा एकत्र येणार असले तरीही ते चित्रपटासाठी नाही तर एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी. हे वाचून नक्कीच चाहत्यांची निराशा होईल. पण असं असलं तरीही जाहिरातीमधून या दोघांच्या केमिस्ट्रीची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडच्या जाहिरातीसाठी या दोघांनीही चित्रीकरण सुरु केलं आहे. पण नक्की हा ब्रँड कोणता असणार याची मात्र माहिती मिळू शकलेली नाही. याशिवाय दीपिका आणि रणबीर ही जोडी लवकरच लव रंजनच्या आगामी चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर काम करणार असल्याच्या बातम्या थोड्या दिवसांपासून येत आहेत. मात्र या बातमीवर कोणतंही शिक्कामोर्तब अजूनपर्यंत झालेलं नाही. जर हे खरं असेल तर, हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे असंही म्हटलं जात आहे.


दीपिका छपाक चित्रीकरणात व्यग्र


दीपिका सध्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी ‘छपाक’ या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट अॅसिड अटॅक झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. लक्ष्मीची भूमिका दीपिका साकारत आहे. तर सध्या रणबीर कपूर आपली सध्याची गर्लफ्रेंड आलिया भटबरोबर ‘ब्रम्हास्त्र’ या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात रणबीरबरोबर अमिताभ बच्चन यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. रणबीर आणि आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत?


ranbir aalia


रणबीर आणि आलिया सध्या बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत असून त्यांचे आई - वडीलदेखील नेहमीच एकत्र दिसतात. रणबीर आणि आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र रणबीर याआधी दीपिका आणि कतरिनाबरोबरचं नातं टिकू शकलेलं नाही. त्यामुळे आलियाबरोबर रणबीरचं नातं कसं असेल याच्याही चर्चा बऱ्याचदा रंगताना दिसतात. पण आता हे दोघं लवकर लग्न करत आहेत की नाहीत याकडे नक्कीच त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


वरूण धवनचा ‘स्ट्रीट डान्सर’ मधला फर्स्ट लुक रिलीज


सोशल मीडियावर नवा ट्रेंड : अनुष्कापाठोपाठ आलियाच्या लुक-अ-लाईकचा व्हिडीओ व्हायरल


Box Office वर ‘उरी’ने रचला इतिहास, विकी कौशलचा बोलबाला