अभिनेत्री रतन राजपूत तिच्या लॉकडाऊन व्हिडिओजमुळे काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत होती. आता रतन आता पुन्हा एकदा संतोषी माता मालिकेतून कम बॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. एण्ड वाहिनीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथांए'मध्ये रतन राजपूतचे संतोषी माँच्या अंश रुपात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांना संतोषी माँ (ग्रेसी सिंग)चा अंश म्हणजेच 'संतोषी' या भूमिकेत रतन राजपूतला पाहायला मिळणार आहे. रतनच्या मालिकेतील प्रवेशासह रोमहर्षक ड्रामा या मालिकेत निर्माण होणार आहे. केवळ काही परिस्थितींना नाट्यमय वळण देण्यासाठी या मालिकेत हा ट्रॅक टाकण्यात आलेला आहे.
'संतोषी माँ सुनाएं व्रत कथांए'मध्ये आता संतोषी (रतन राजपूत) पृथ्वीवर येऊन स्वातीला मदत करणार आहे आणि योग्य न्याय करत स्वातीच्या स्थितीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना ती शिक्षा करणार आहे. यात तिची दोन रूपे असणर आहेत - एक देवीचे व दुसरे एका सामान्य स्त्रीचे. सध्या या मालिकेत इंद्रेश (आशिष कडियन) व डॉ. निधी (धरती भट्ट) यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. देवी पौलोमी (सारा खान) तिच्या दुष्ट उपाययोजनांसह इंद्रेश व डॉ. निधी यांच्यामध्ये जवळीक निर्माण करत त्यांचा विवाह घडवून आणण्यामध्ये यशस्वी झाली आहे. पण स्वातीने या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे आणि संतोषी माँवरील तिचा विश्वास तिला या स्थितीचे निराकरण करण्यामध्ये मदत करणार आहे.
'संतोषी'च्या भूमिकेबाबत बोलताना रतन राजपूत म्हणाली, ''मला या भूमिकेमुळे जवळजवळ दोन वर्षांनंतर घरी परतल्यासारखे वाटत आहे. मला पुन्हा एकदा टेलिव्हिजवर परतण्याचा आनंद झाला मला नक्कीच आहे आणि एण्ड टीव्हीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं या मालिकेमध्ये परतल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. मी माझे प्रेक्षक व चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज येथे परत आले आहे. त्यांचे प्रेम व आवडीनेच मला या मालिकेमध्ये पुन्हा आणले आहे. मी प्रेक्षकांकडून असेच प्रेम व पाठिंबा मिळत राहण्याची आशा करते. संतोषी माँ तिची निस्सीम भक्त स्वातीच्या बाबतीत अन्याय होताना पाहून खूप क्रोधित झाली आहे. म्हणूनच संतोषी माँने तिचे अंश रूप तयार केले आहे. हा सीक्वेन्स पाहणे अत्यंत रोमांचक असणार आहे.
जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा रतन राजपूत बिहारमधील एका गावात अडकली होती. तिने कमी सुविधांमध्ये लॉकडाऊनचा काळ एका खेडेगावात एकटीने काढला होता. सुरक्षेसाठी तिने ती राहत असलेले ठिकाण गुप्त ठेवले होते. मात्र ती सोशल मीडियावर व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. चुलीवर स्वयंपाक करण्यापासून ते शेतातून भाजी निवडण्यापर्यंत अनेक कामं तिने या काळात केली होती. एका खेडेगावामध्ये सुखसुविधा नसताना कसं राहावं लागतं ते तिने या काळात चाहत्यांना दाखवून दिलं होतं. या काळात तिने अनेक गोष्टी नव्याने शिकल्या आणि प्रेक्षकांना शिकवल्या. अनलॉक सुरू झाल्यावर ती परत तिच्या घरी मुंबईत परतली आहे.लॉकडाऊनमध्ये शिकलेल्या या गोष्टींचा तिला पुढे एखादी भूमिका साकारताना नक्कीच फायदा होऊ शकतो. आता शूटिंगला पुन्हा नव्याने सुरूवात करत ती आता संतोषी मॉं मालिकेतून प्रेक्षकांना भेटण्यासाठी येत आहे.