आज थुकरट वाडीत रंगणार 'रात्रीस खेळ चाले'चा थरार

आज थुकरट वाडीत रंगणार 'रात्रीस खेळ चाले'चा थरार

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा शो महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी परदेशातही आवर्जुन पाहिला जातो. आज या शोमध्ये रात्रीस खेळ चाले या आणखी एका लोकप्रिय मालिकेचे पाहुणे प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ 2 ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला. या दुसऱ्या भागावरदेखील प्रेक्षक तितकाच प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बच्चे कंपनी आणि शेवंता व अण्णा आता थेट ‘थुकरट वाडीत’ सज्ज होणार आहेत. सगळे कलाकार थुकरट वाडीत येणार असल्याने चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी देखील मनोरंजनासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांसोबत ‘धमालमस्ती’


आजच्या भागात रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेवर आधारित एक धमाल विनोदी स्पूफ चला हवा येऊ द्याचे विनोदवीर सादर करणार आहेत. ज्यात भाऊ कदम 'अण्णा', श्रेया बुगडे 'शेवंता', कुशल बद्रिके 'माई' आणि बाकी कलाकार बच्चे कंपनी साकारणार आहे. हा एपिसोज पाहूनआज प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतील यात शंकाच नाही.

चला हवा येऊ द्याची वाढतेय ‘क्रेझ’


रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही वेळ मनमुराद हसण्यासाठी काढणं फारच गरजेचं झालं आहे. यामुळे कामाचा ताण-तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते. सध्या प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा 'चला हवा येऊ द्या' हा शो यावर एक रामबाण उपाय ठरत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.आपल्या विनोदशैलीमध्ये सतत नवनवीन बदल करून या शो मधील कलाकार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होऊ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात सर्वसामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा शो अधिकच लोकप्रिय होत आहे. 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम