‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार

‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार

बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. अर्थात देव जोड्या बनवतो. पण लहान पडद्यावर अर्थात टीव्ही वर अशा बऱ्याच जोड्या आहेत ज्यांची गाठ एकता कपूरमुळे बांधली गेली आहे. त्यामुळे रबने नाही तर एकता कपूरने बनवली जोडी असंच म्हणायला हवं. टीव्हीवरील रिल लाईफ कपल हे रियल लाईप कपल्स बनले ते एकता कपूरच्या मालिकांसाठी चित्रीकरण करता करता. या जोड्या कधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या आणि एकमेकांच्या सहवासात आयुष्यभरासाठी बांधल्या गेल्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

एकता कपूरने बनवली जोडी

Instagram

आम्ही तुम्हाला याठिकाणी अशा 5 प्रसिद्ध जोड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं प्रेम मालिकेचं चित्रिकरण सुरु असताना सुरु झालं. दिवसातील बरेच तास एकमेकांबरोबर असणारे हे कलाकार एकमेकांच्या जवळ आले आणि रिल लाईफ कपल्स रिअल लाईफ कपल्स बनले. एकता कपूरच्या मालिकांमधूनच त्यांना आपल्या जीवनाचे साथीदार मिळाले. कशी आहे यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया. 

दिव्यांका त्रिपाठी- विवेक दाहिया

Instagram

टीव्हीवरील सर्वात आवडती जोडी म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया. एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली. दिव्यांका या मालिकेची लीड अभिनेत्री आहे, तर विवेक या मालिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत काही काळासाठी दिसला होता. दोघेही खूपच कमी वेळासाठी या सेटवर होते. पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कॉमन फ्रेंडने त्यांच्या घरच्यांना या दोघांच्या लग्नासाठी विचारलं आणि दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचंही अरेंज मॅरेज असल्याचं नेहमी सांगण्यात येतं. 

हितेन तेजवानी- गौरी प्रधान

Instagram

वर्ष 2001 मध्ये हितेन तेजवानी आणि गौरी प्रधानची पहिली भेट झाली ती "कुटुंब" या मालिकेच्या सेटवर. दोघेही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे होते. हितेन सर्वांशी मिळून मिसळून राहायचा तर सीन कट झाल्यानंतर गौरी आपल्या पुस्तक वाचनात व्यग्र होऊन जायची. पण काही दिवसांनी गौरी आणि हितेनला एकमेकांचा सहवास आवडू लागला. तर त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2004 मध्ये मालिका "क्योंकि सास भी कभी बहू थी" चालू असताना हे दोघे विवाहबद्ध झाले. आता हितेन आणि गौरी आपल्या जुळ्या मुलांसह सुखी संसारात व्यस्त आहेत. 

रित्विक धनजानी- आशा नेगी

Instagram

रित्विक धनजानी आणि आशा नेगी यांचं अजून लग्न झालं नसलं तरीही गेले कित्येक वर्ष हे दोघंही नात्यात आहेत. दोघेही 2011 मध्ये एकता कपूरची प्रसिद्ध मालिका "पवित्र रिश्ता" च्या सेटवर एकमेकांना भेटले. मालिकेमध्ये रोमान्स करता करता ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांनाही कळलं नाही. 8 वर्ष दोघांच्या नात्याला झाली असून ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं समजतं. तर बऱ्याचदा या दोघांचे व्हेकेशन फोटोही व्हायरल होत असतात. 

राम कपूर- गौतमी कपूर

Instagram

अप्रतिम अभिनेता राम कपूर आणि त्याची पत्नी गौतमी कपूर यांची ओळख झाली ती 2000 मध्ये एकता कपूरच्या "घर एक मंदिर" या मालिकेच्या सेटवर. काहीच दिवसात रिल लाईफ प्रेम हे रिअल लाईफ स्टोरीमध्ये बदललं. पण फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की, गौतमी कपूरचं त्यावेळी लग्न झालं होतं आणि तिने राम कपूरशी दुसरं लग्न केलं आहे. पण गेले कित्येक वर्ष हे दोघंही सुखाने संसार करत आहे. आपल्या दोन्ही मुलांसह हे दोघेही आनंदी आहेत.   

यश टोंक- गौरी यादव

Instagram

एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये "कहीं किसी रोज़" या मालिकेचंही नाव घेता येईल. या मालिकेमध्ये यश टोंकने मुख्य भूमिका साकारली होती. यश टोंकची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. कारण त्याने बऱ्याच मालिकांमधून काम केलं असून चित्रपटांमधूनही काम केलं आहे. याच मालिकेत यशच्या भावाच्या पत्नीच्या भूमिकेत गौरी यादवने काम केलं होतं. या मालिकेदरम्यान दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला आणि त्यांनी त्यानंतर लगेचच लग्न केलं. आता आपल्या दोन्ही मुलींसह दोघेही संसारात आनंदी आहेत.