अॅक्शनचा तडका असलेला ‘माऊली’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

अॅक्शनचा तडका असलेला ‘माऊली’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

रितेश देशमुखने हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला त्यानंतर त्याने ‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि एक वेगळाच मसालेदार चित्रपट प्रेक्षकांना दिला आणि आता ‘माऊली’च्या रूपात पुन्हा एकदा मराठीमध्ये अॅक्शनचा तडका असलेला चित्रपट रितेश देशमुख घेऊन आला आहे. आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेला हा भन्नाट चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत  आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 3.30 कोटीचा गल्ला जमवला असून आता या आठवड्यामध्ये हा चित्रपट किती कमाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. रितेशने नेहमीप्रमाणेच आपला वावर चित्रपटामध्ये उत्कृष्ट ठेवला असून जितेंद्र जोशीही या चित्रपटामध्ये भाव खाऊन गेला आहे.


mauli 1
विठूमाऊली, पोलीस आणि गुंडाभोवती फिरणारी कथा


या चित्रपटाची कथा ही मुख्यत्वे विठूमाऊली, पोलीस आणि गुंडाभोवती फिरणारी आहे. मराठी चित्रपट रसिकांची नस ओळखून या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. विठूमाऊलीच्या साक्षीने पंढरपुरात जन्मलेल्या दोन जुळ्या मुलांची ही कथा आहे. मात्र कथा तीच असली तरीही रसिकांची मानसिकता लक्षात घेऊन देवभाबडा असा हा समाज, त्यामध्ये होणारे चमत्कार आणि अॅक्शनचा भडीमार असा हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करणारा आहे. कापूर गावातील सर्वात मोठा गुंड अर्थात जितेंद्र जोशी आणि पोलीस सर्जेराव अर्थात रितेश देशमुख यांच्यातील संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. असे संघर्ष हिंदी चित्रपटांमधून दिसले असले तरीही त्याला एक मराठी पार्श्वभूमी आणि मसाला असल्यामुळे हा चित्रपट अजिबात कंटाळवाणा ठरत नाही. मात्र संयमी खेर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून ती जास्त छाप पाडू शकलेली नाही.


अजय - अतुलने केली निराशा


अजय - अतुल आपल्या संगीतासाठी प्रसिद्ध आहे. अशा देवांच्या पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात तर अजय - अतुलने नेहमीच अप्रतिम संगीत दिलं आहे. मात्र यावेळी निराशा झाली आहे. जेनेलिया आणि रितेशचं ‘धुवून टाक’ हे गाणं सोडल्यास, कोणतंही गाणं पटकन ओठांवर रूळत नाही. असं असलं तरीही या चित्रपटात असलेल्या मसाल्यामुळे आणि रितेशच्या अभिनयामुळे या चित्रपटाचा गल्ला नक्कीच चांगला भरेल असं म्हणायला हरकत नाही.

फोटो आणि व्हिडिओ सौजन्य - Instagram