रितेश देशमुखने सांगितलं जेनेलियाबरोबरच्या सुखी संसाराचं गुपित

रितेश देशमुखने सांगितलं जेनेलियाबरोबरच्या सुखी संसाराचं गुपित

रितेश देशमुख आणि जेनेलिया ही बी - टाऊनमधील सर्वांचीच आवडती जोडी आहे. ‘तुझे मेरी कसम’ या आपल्या पहिल्या चित्रपटापासून एकत्र असणाऱ्या या जोडीने सुखाचा संसार कसा असावा आणि सुखाने कसं नांदावं याचा एक पायंडाच पाडून दिला आहे. दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने एकमेकांशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, यांच्या सुखी संसाराचं नक्की गुपित काय आहे? तर हे गुपित नक्की काय आहे हे सोशल मीडियाद्वारे रितेशने आता सांगितलं आहे. हे सांगताना जेनेलियादेखील रितेशबरोबर आहे. जास्त गंभीर होऊ नका. रितेश आणि जेनेलियाने सोशल मीडियावर एक जबरदस्ती मजेशीर व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

रितेश आणि जेनेलिया नेहमीच आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट शेअर करत असतात. रितेश हा तर कॉमेडी किंग असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. आपल्या अभिनयाने रितेशने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. असाच एक मजेशीर व्हिडिओ जेनेलियाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने ‘Happy Wife- Happy Life.... और जीने को क्या चाहिए!!!! ’ अशी कॅप्शन लिहिली आहे. यामध्ये रितेशने आपल्या सुखी संसाराचं गुपित तुमच्यापर्यंत पोहचवलं आहे. रितेशच्या बोलण्याने या व्हिडिओची सुरुवात होते. पहिला कॅमेरा रितेशवरच आहे. रितेश म्हणतो, ‘सुखी संसाराचा गुपित हे आहे’(Secret to happy married life is this) आणि त्यानंतर जेनेलिया ‘कुछ कुछ होता है’ असं गाते. हे चालू असताना एका बाजूला रितेश जेनेलियाचे पाय दाबून देताना दिसत आहे. दोघांचीही मस्ती चालू आहे. जेनेलिया आणि रितेश हे एकमेकांसाठीच योग्य आहेत हे नेहमीच त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमधून दिसून आलं आहे. रितेश आणि जेनेलिया एकमेकांवरील प्रेम नेहमीच सोशल मीडियावरदेखील व्यक्त करताना बरेचदा दिसून येतात.

रितेश आणि जेनेलिया नेहमीच एकत्र

Instagram

रितेश आणि जेनेलिया नेहमीच एकत्र असतात. इतकंच नाही तर आपले मस्तीचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांना योग्य शिक्षण देताना त्यांच्यावर योग्य संस्कार होतील की नाही याचीही दोघं काळजी घेताना दिसतात. रितेशने आपल्या दोन्ही मुलांना ‘आई - बाबा’च म्हणायला शिकवलं असून दोन्ही मुलं मराठी बोलतील याची दोघेही काळजी घेतात. जेनेलिया मराठी नसली तरीही तिला आता रितेशमुळे मराठी यायला लागलं असून तिने रितेशचे ‘लय भारी’ आणि ‘माऊली’ या दोन्ही चित्रपटांच्या निर्मितीची योग्य काळजी घेतली. शिवाय या चित्रपटांमध्ये दोन मराठी गाणीही तिने केली आहेत. एकमेकांची संस्कृती जपत दोघंही नेहमीच आनंदी दिसतात. तसंच जेनेलियाने रितेशच्या दोन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नींशीही अतिशय सलोख्याचे संबंध जपले असून हे कुटुंब नेहमीच एकत्र दिसतं.

रितेशचा लवकरच होणार ‘हाऊसफुल’ प्रदर्शित

रितेश देशमुखने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलीच आहेत. पण त्यातही त्याची कॉमेडी प्रेक्षकांना अधिक भावते. आतापर्यंत हाऊसफुल या चित्रपटाचे तीन भाग येऊन गेले असून चौथ्या भागातही रितेश देशमुख दिसणार आहे. गेल्यावर्षी रितेशचा ‘टोटल धमाल’ प्रदर्शित झाला होता. यातही प्रेक्षकांना त्याचं काम खूप आवडलं. दरम्यान जेनेलियाने मात्र लग्नानंतर जास्त चित्रपट केले नाहीत. आपल्या मुलांना सांभाळत प्रॉडक्शन हाऊस सांभाळायचं काम जेनेलिया करत आहे. पण या दोघांची जोडी खऱ्या आयुष्यात मात्र हिट आहे. तर याव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही चित्रपट येत असून रितेश भूमिका साकारणार आहे असं म्हटलं जात आहे. पण याबद्दल अजूनही ठोस माहिती मिळालेली नाही.