रोहित कोकाटे मराठीतील खतरनाक खलनायक

रोहित कोकाटे मराठीतील खतरनाक खलनायक

नायक सर्वांनाच साकारायचा असतो. पण खलनायकाची भूमिका फार कमी अभिनेते साकारतात आणि मुळात खलनायक म्हणून त्या भूमिकेमध्ये चपखल बसणारे अभिनेते फारच कमी आहेत. त्यातही मराठी चित्रपटांमध्ये तर ही संख्या फारच कमी आहे. पण आता मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगला खलनायक मिळाला आहे. ज्याचं नाव आहे, रोहित कोकाटे. अभिनेता म्हणून सर्व प्रकारच्या भूमिका साकारता आल्या पाहिजेत. शिवाय एकाच साच्यात न राहता वेगळं करण्याचा प्रयत्न तरी किमान करायला हवा. त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेतून आपलं अभिनय कौशल्य दाखवता आलं पाहिजे हे मनाशी पक्क करून अभिनेता रोहित कोकाटेने झी5 च्या ‘डेट विथ सई’ या वेबसिरीजमध्ये हिमांशु या सभ्य व्यक्तीच्या मागे असलेला खरा चेहरा रघुनाथ हा खलनायक साकारला आहे. प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आणेल असा हा रघुनाथ रोहितने साकारलाय. हिमांशु या साध्या चेहऱ्यामागचा रघुनाथ आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रोहितने उभा केलाय. त्यामुळे मराठीमध्ये आता अजून एक नवा आणि खतरनाक खलनायक मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.


Rohit Kokate Villain Look-1
खलनायकाची भीती वाटणे अर्थात उत्तम अभिनय


खलनायकाची भीती वाटणे अथवा त्याचा राग येणे अर्थातच अभिनेत्याने ते पात्र चांगलं साकारलं आहे असं आपण सहसा म्हणतो. रोहितच्या या खलनायकातून अर्थातच ही भीती प्रेक्षकांना जाणवते. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी रोहितच्या अभिनयाचं कौतुक करत त्याला शाबासकी दिली आहे. वास्तविक मराठी चित्रपटसृष्टी आणि इंंडस्ट्रीमध्ये फारच कमी कलाकारा आहेत, जे खलनायक साकारतात. त्यामध्ये आता रोहितचं नाव घेतलं जाईल. यापूर्वी अगदी पूर्वीपासून मराठीमध्ये काही खलनायक होऊन गेले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आजही छाप सोडली आहे. त्यापैकी निळू फुले, सयाजी शिंदे, कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर, नाना पाटेकर ही काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नावं आहेत. त्यामध्ये आता नव्या पिढीत शरद केळकर हे नावही घेतलं जातं. पण शरदने आतापर्यंत केवळ एका मराठी चित्रपटामध्ये खलनायक साकारला आहे. रोहित कोकाटेने पहिल्यांदाच या वेबसिरीजमधून खलनायक साकारला असून आपल्या अभिनयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 


Rohit Kokate Villain Look-2
खलनायक साकारताना चौकटीची गरज नाही - रोहित


रघुनाथ हे पात्र का निवडावं वाटलं ? यावर रोहितचं उत्तर होतं, ‘खलनायक साकरत असताना एका चौकटीत राहण्याची गरज भासत नाही. त्यामुळे पात्र खरं वाटण्यासाठी कलाकार त्याला जमेल ते करू शकतो. वास्तविक सध्या नायकाइतकाच भाव खलनायकालाही असतो. खलनायक साकारताना मला कोणतंही दडपण नव्हतं. कारण माझं संपूर्ण लक्ष हे अभिनयावर होतं आणि पुन्हा भविष्यात खलनायकाची भूमिका साकारण्याची वेळ आल्यास, मी ती आनंदाने साकारेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेबसिरीजमध्ये मी केलेल्या अभिनयाचं कौतुक माझे सहकलाकार, मराठी इंडस्ट्री, मीडिया आणि मित्र परिवार या सगळ्यांनीच केल्यामुळे मी त्यांचा आभारी असून मला खूप आनंद होत आहे. ’ रोहित कोकाटेने त्याच्या भावना अगदी मनापासून व्यक्त केल्या. खलनायक म्हणून पहिल्यांदाच रोहित प्रेक्षकांसमोर आला आहे. आता पुन्हा एकदा कोणत्या खलनायकाची छटा रोहित साकारेल का हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम