दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि रणविर सिंह सिंबानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. लवकरच रोहीत शेट्टी 1982 साली प्रदर्शित झालेला क्लासिक कॉमेडी चित्रपट 'अंगूर' या चित्रपटाचा रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊनमध्ये रोहीतने या चित्रपटाच्या रिमेकवर खूप कामही केलं आहे. चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याने स्टापकास्टही निवडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहीतच्या या रिमेकचा मुख्य हिरो रणवीर सिंह असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू होती. रोहीत आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र एका चित्रपटात काम करणार हे जाहीर झालं असलं तरी अजूनही या चित्रपटाचे नाव आणि इतर गोष्टींची अधिकृत घोषणा झालेली नाही.1982 साली प्रदर्शित झालेल्या अंगूरमध्ये संजीव कुमार आणि देवेन वर्मा हे दोन अभिनेते मुख्य भूमिकेत होते. रोहीतच्या रिमेकमध्ये संजीव कुमार यांच्या भूमिकेत रणवीर सिंह असेल. मात्र इतर कलाकारांची निवड करणं अजूनही बाकी आहे. अंगूर हा चित्रपट ऐंशीच्या काळातील असल्यामुळे तो कॉमेडी असला तरी साधा चित्रपट होता. मात्र या रोहीत शेट्टी बनवत असलेला रिमेक साधा नक्कीच नसेल त्यात खास रोहीत शेट्टी स्टाईल तडका असणार हे सांगायला नकोच. रोहीत शेट्टीने अमोल पालेकर यांच्या गोलमाल या चित्रपटातून प्रेरणा घेत गोलमालचे अनेक सिक्वल तयार केले. त्याचप्रमाणे अंगूर चित्रपटाच्या रिमेकमध्येही रोहीत काहीतरी नवीन नक्कीच करणार.
चित्रपटगृह सुरू होताच रोहीत शेट्टीची सुर्यवंशी लवकर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांना रोहीतच्या या आगामी चित्रपटाची नक्कीच प्रतिक्षा राहणार आहे. एक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करणं ही तर रोहीतची जुनीच स्टाईल आहे. या आगामी चित्रपटाबाबत रोहीत आणि रणवीर दोघंही नक्कीच उत्सुक आहेत. कारण त्या दोघांनाही हे सांगलच माहीत आहे की अंगूर सारख्या क्लासिक कॉमेडी चित्रपटाचा रिमेक बनवणं नक्कीच जबाबादारीचं काम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात रणवीरचा डबल रोल असण्याचीदेखील शक्यता आहे. असं असेल तर रणवीर पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट बॉलीवूडमधील आतापर्यंतची सर्वांत मोठा कॉमेडी चित्रपट असण्याची शक्यता आहे.
अंगूर चित्रपटाचा रिमेक तयार करण्याची इच्छा रोहीतच्या मनात अनेक वर्षांपासून सुरु होती. 2015 साली त्याला हा चित्रपट शाहरूख खानसोबत करायचा होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. पुढे रोहीतने शाहरूखसोबत दिलवाले हा चित्रपट तयार केला. या चित्रपटानंतर तो गोलमाला पुढील सिक्वल, सिंबा आणि सुर्यवंशी यामध्ये इतका गुंतला की या चित्रपटाकडे लक्ष देणं शक्यच नव्हतं. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला या चित्रपटावर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. या चित्रपटानंतर त्याला पुन्हा गोलमालचा पाचवा सिक्वलही बनवायचा आहे. त्यामुळे आता लागोपाठ रोहीत शेट्टीचे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.