दबंग सलमान खान बनला बॉलीवूड 'किंग' तर देसी गर्ल प्रियांका बॉलीवूड 'क्वीन'

दबंग सलमान खान बनला बॉलीवूड 'किंग' तर देसी गर्ल प्रियांका बॉलीवूड 'क्वीन'

सलमान खान आणि प्रियांका चोप्रा जोनाससाठी नववर्षाच्या सुरूवातीलाच एक चांगली बातमी आहे. प्रियांकासाठी तर 2018 खासच होतं, कारण प्रियांका करिअर आणि व्यक्तिगत आयुष्यही या दोन्ही गोष्टीत तिने बाजी मारली. सलमानला मागच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर खास काही करता आलं नाही पण तरीही 2019 सुरू होताच चित्र बदलल्याचं दिसतंय. चला तर पाहूया काय आहे ही चांगली बातमी.


देसी गर्ल आणि दबंग झाले क्वीन आणि किंग


स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात सलमान आणि प्रियांका हे 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते, असं समोर आलंय. 1 जानेवरी 2018 पासून ते 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 वर्षातले ‘बॉलीवूड ट्रेंडसेटर’ ठरलेत. गेल्या वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 ह्या कालावधीत) सुपरस्टार सलमान खान 52 आठवड्यांपैकी 24 आठवडे तर प्रियांका 20 आठवडे नंबर वन स्थानी विराजमान असल्याने दोघंही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचं दिसून आलं. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.


वर्षभर चर्चा फक्त प्रियांका आणि सलमानची


गेल्या वर्षात प्रियांका चोप्रा जोनास आणि सलमान खान दोघंही सातत्याने चर्चेत राहिले. चर्चा मग ती सलमानचे विवाद असो कोर्टाचे खटले असो किंवा त्याचे सिनेमे असो. सलमान सातत्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर झळकत होता. तिच गोष्ट देसीगर्ल प्रियांका चोप्राचीही आहे. अमेरिकन पॉपस्टार आणि अभिनेता निक जोनाससोबतच्या प्रियांकाच्या अफेअरपासून ते जोधपूरमध्ये झालेल्या ग्रँड लग्नापर्यंत प्रियांका सातत्याने लाईमलाईटमध्ये होती. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत साहजिकच वाढ झाली. म्हणूनच प्रियांका आणि सलमान दोघांच्याही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसून आलं.


प्रियांका आणि सलमानची अजब केमिस्ट्री


कोण जाणे पण प्रियांका आणि सलमानमध्ये अजब केमिस्ट्री आहे. त्यांच्यात दुरावा आला तरी नशिब मात्र त्यांना पुन्हा एकत्र आणतंच. आता हा अहवालच बघा ना प्रियांका क्वीन तर सलमान झाला किंग. प्रियांकाच्या लग्नाची चर्चा सुरू होताच तिने दबंग सलमानचा भारत सोडला आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये कटुत्व निर्माण झाल्याच्या बातम्या रंगल्या. पण लग्नानंतर निकयांका (#nickyanka)ने मुंबईत दिलेल्या रिसेप्शनला भाई सलमानने एंट्री केली आणि दोघांमधला दुरावा मिटल्याचं कळलं. आतातर दोघांसाठी ही एकाच वेळी ही खूशखबरसुद्धा आली.  


कशी ठरते ही आकडेवारी


14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या लिंकसने हा डेटा गोळा केला जातो. ज्यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट आणि सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. अशाप्रकारे आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींचं स्कोर आणि रँकिंग ठरवतो, अशी प्रतिक्रिया स्कोर ट्रेंड्सच्या सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी दिली.


आता पाहूया या किंग आणि क्वीनसाठी 2019 हे नववर्ष अजून कोणती खूषखबर घेऊन येतं ते. कारण सलमानच्या फॅन्सना त्याच्या लग्नाची उत्सुकता आहे तर प्रियांका चोप्रा जोनासकडून गोड बातमीची.