संदीप कुलकर्णी हे नाव मराठी काय अगदी हिंदी चित्रपटसृष्टीलाही नवं नाही. आपल्या भारदस्त अभिनयाने संदीप कुलकर्णीने रसिक प्रेक्षकांवर नेहमीच छाप पाडली आहे. संदीप कुलकर्णीला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी आपलंसं करून घेतलं आहे. आता संदीप कुलकर्णी एका नव्या भूमिकेत येत असून ही भूमिका चित्रपटात नाही तर एक निर्माता म्हणून संदीप आपल्यासमोर येणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, ‘डोंबिवली रिटर्न’ हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी संदीपला सर्वांनीच ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून अफलातून अभिनय साकारताना पाहिलं आहे. आता संदीप ‘डोंबिवली रिटर्न’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आशयसंपन्न चित्रपट बनवण्याची इच्छा
‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ अशा अनेक चित्रपटांमुळे संदीपची अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं. मात्र, ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कलाकृती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार असल्याचं संदीपनं सांगितलं आहे.
‘डोंबिवली रिटर्न’ आजच्या काळातील गोष्ट
‘डोंबिवली रिटर्न’ ही आजच्या काळातली गोष्ट असून एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट असून त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं चित्रपटाच्याबाबत सांगितलं आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.तसंच संदीप आणि त्याचे मित्र महेंद्र अटोले यांनी ‘कंरबोला क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. दोघांची आवड सारखीच असल्यानं दोघांनी एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली असल्याचंही संदीपनं यावेळी स्पष्ट केलं. आता ‘डोंबिवली फास्ट’ प्रमाणेच ‘डोंबिवली रिटर्न’लादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का हे लवकरच कळेल.