मुंबईच्या डब्बेवाल्यांवरच उपासमारीची वेळ, या अभिनेत्यांनी पुढे केला मदतीचा हात

मुंबईच्या डब्बेवाल्यांवरच उपासमारीची वेळ, या अभिनेत्यांनी पुढे केला मदतीचा हात

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे अनेकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. या दुष्टचक्रात मुंबईचा डब्बेवालाही सुटला नाही. गेली एकशे सत्तावीस वर्ष हे डब्बेवाले मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोकांना वेळेवर डब्बे पोहचवण्याचं काम करत आले आहेत. ज्यामुळे दररोज जवळजवळ दोन लाखांहून अधिक लोकांना भुक लागल्यावर ऑफिसमध्ये वेळेवर डब्बा मिळत असतो. मात्र आज लॉकडाऊनमुळे या डब्बेवाल्यांनाच घरी अन्न मिळणं मुश्किल झालं आहे. मुंबईतील या डब्बेवाला भावंडाच्या मदतीसाठी आता बॉलीवूडचे दोन कलाकार पुढे आले आहेत. 

संजय दत्त आणि सुनिल शेट्टी करणार मुंबईच्या डब्बेवाल्यांची मदत

बॉलीवूड कलाकारांनी लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत अनेकांची मदत केली आहे. आता बॉलीवूडचे हे दोन कलाकार मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता संजय दत्त आणि सुनिल शेट्टी यांनी कॅबिनेट मंत्री असलम शेख यांच्या साथीने या डब्बेवाल्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघांच्या मदतीने आता मुंबईच्या डब्बेवाल्यांना रेशन देण्याची सोय करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री असलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत या दोन अभिनेत्यांच्या सहकार्यांने होत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. शिवाय जर इतर कोणाला मुंबईच्या डब्बेवाल्यांना मदत करायची असेल तर त्यांनी या अभियानात सहभागी व्हावं असंही आवाहन सोशल मीडियावर #Dabbawalas आणि #premachaDabba शेअर करत ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. ज्यावर अभिनेता सुनिल शेट्टीने प्रतिक्रिया देत "तुम्हाला या कामात अधिक बळ मिळो" असं म्हटलं आहे. 

800 रेशन किट पुण्याच्या दिशेने रवाना

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठशे रेशन किट मुंबईच्या डब्बेवाल्यांपर्यंत पोहचवण्यात आलेले आहेत. मुंबईच्या डब्बेवाल्यांसाठी पुण्यात कॅंम्प उभारण्यात आलेले आहेत. यासाठीच या कलाकारांनी पुण्यातील आपल्या या प्रेमळ डब्बेवाल्यांपर्यंत फूड ट्रकच्या माध्यमातून हे रेशन किट पोहचवले आहेत. आठशे रेशन किटमध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या तांदूळ, डाळ, साखर, पीठ आणि तेल या जीवनावश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कॅम्पसच्या मदतीसाठी सेव्ह दी चिल्ड्रेन ही सेवाभावी संस्था ग्राऊंड लेवलवर कार्यंरत आहे. सुनिल शेट्टीने दिलेल्या माहितीनुसार या संस्थेपकडून सर्व या लोकांच्या देखरेखीचे काम व्यवस्थितपणे करण्यात येत आहे. या कलाकारांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कुटुंबियासाठी पुढील तीन महिन्यांपर्यंत अन्नपूरवठा करण्याचं प्लॅनिंग केलं आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ पाच हजार कुटुंबियांना मदत करण्याचा सुनिल शेट्टी आणि संजय दत्तचा प्रयत्न असणार आहे. 

संजय आणि सुनिलच्या 'दस'ला पंधरा वर्षेपूर्ण

आठ जुलैला संजय दत्तच्या 'दस' या चित्रपटाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये संजयसह सुनिल शेट्टी, अभिषेक बच्चन, दिया मिर्झा, बिपाशा बासू हे कलाकार होते. #15YearsOfDus असं शेअर करत त्याने या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला होता. ज्यामध्ये त्याने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या गोष्टींचा उल्लेख केला होता. लवकरच संजय दत्त महेश भट यांच्या सडक 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्त च्या सडक हा चित्रपट खूप सुपरहिट झाला होता. त्यामुळे त्याला पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूरसह या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.