संतोष जुवेकर साकारतोय अँग्री यंग मॅन

संतोष जुवेकर साकारतोय अँग्री यंग मॅन

मराठी चित्रपटसृष्टीतला रावडी आणि डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा हिरो म्हणजे संतोष जुवेकर, ज्याला लाडाने 'संत्या' असं म्हणतात. प्रायोगिक नाटकं चित्रपट, मालिका असो वा वेबसिरीज सर्व माध्यमांमध्ये संतोष जुवेकरची एक वेगळीच छबी आपल्याला पाहायला मिळते. अशीच वेगळी छबी आता आपल्याला त्याच्या आगामी सिनेमा 'अधम' मध्ये ही दिसणार आहे. 'अधम म्हणजे विनाशाकडे जाणाऱ्या वाटेला शासन करणारा' असे या चित्रपटातील शीर्षकाचे त्याने वर्णन केले.


संतोषचा ‘अधम’

सध्या गाव आणि खेड्यांचे शहरीकरण होताना आपण पाहत आहोत. या शहरीकरणासाठी लागणारे दगड, सिमेंट हे डोंगर फोडून खाणीच्या खाणी खणून त्यातून माती काढून मिळवले जातात. खोदकामामुळे कमी होणारी पाण्याची पातळी यामुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम आणि हानी या सर्वांची जाणीव करून देणारा श्री नटराज पिक्चर्स प्रेझेन्टस 'अधम' हा चित्रपट येत्या २८ जून ला तुमच्या भेटीस येत आहे. तुषार अनिल खांडगे निर्मित आणि अभिषेक केळकर दिग्दर्शित 'अधम ' या चित्रपटाचं पोस्टर, टीझर आणि ट्रेलर नुकतंच सोशल मीडियावर लॉंच करण्यात आलं आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.


इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार संतोष जुवेकर


विक्की आणि नंदिनीची जोडी


adham-pair-1


या चित्रपटात संतोष हा 'विक्की'ची भूमिका साकारतोय. विक्की हा एक अँग्री यंग मॅन आहे. जो गावातील अनाथ आणि टपोरी मुलगा असून त्याला गावातील एका मोठ्या व्यक्तीने लहानाचे मोठे केले आहे. त्या व्यक्तीच्या मोठमोठ्या खाणींमध्ये विक्की काम करत असतो. विक्कीच्या आयुष्यात नंदिनी नावाची मुलगी येते. ती आल्यावर त्याच्या आयुष्यात घडणारे बदल आणि त्याच्यावर येणाऱ्या अडचणींवर तो कशाप्रकारे मात करतो हे या चित्रपटात बघायला मिळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्याला रुपेरी पडद्यावर संतोष आणि गौरी ही रोमॅंटिक जोडी दिसणार आहे. गौरी नलावडेसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता आणि ती अभिनेत्री म्हणूनही खूप चांगली असल्याचे संतोष म्हणाला. या चित्रपटाचं संगीत आणि गाणी ही खूप छान आणि वेगळ्या पठडीतील असल्याचे त्याने सांगितले.


रिअल लोकेशन आणि खाणीचं वास्तव

या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग पुण्याजवळील खाणींमध्ये झालेलं असून सर्व लोकेशन हे वास्तविक आहेत. शहरीकरणाच्या नावाखाली दगड आणि सिमेंट मिळवण्यासाठी खाणींची केलेली दुर्दशा ही अत्यंत वाईट असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे हे प्रमुख भूमिकेत असून किशोर कदम, शशांक शेंडे,सुहास पळशीकर, उमेश जगताप, सुहास शिरसाट, पद्मनाथ बिंड अशी कास्ट आपल्याला दिसणार आहे.


हरहुन्नरी संतोष


नाटक,मालिका आणि सिनेमा ह्या तिन्ही मनोरंजन माध्यमात संतोषने काम केले असून तिन्ही माध्यमात खूप काही महत्वाचे पैलू त्याला शिकायला मिळाले. तो पुढे सांगतो की, खऱ्या आयुष्यातील संतोष आणि चित्रपटातील विक्की या दोघांमध्ये फक्त आयुष्य आणि राहणीमानाचा फरक आहे . या चित्रपटामुळे चांगली कथा आणि चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचं त्याने सांगितलं. तसंच शूटिंगदरम्यान मजा, मस्ती करत संपूर्ण शूटिंग केल्याचे त्याने सांगितलं. एक आगळा वेगळा विषय आणि संतोष - गौरी ही नवीन जोडी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा संतोषने व्यक्त केली आहे. बऱ्याच काळानंतर येणारा संतोषचा 'अधम' हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडेल, हे येत्या २८ जूनला कळेलच.


हेही वाचा -


ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड यांचं निधन


'वेलकम होम' चित्रपटामुळे मी प्रगल्भ झाले - मृणाल कुलकर्णी